Wednesday, April 18, 2012

बिन बुडाचं भांडं

-संध्या पेडणेकर
एक  शिष्य एकदा एका योग्याला भेटायला आला. त्यानं मागणी केली, 'मोक्ष मिळावा अशी इच्छा घेऊन खूप दूरवरून मी आपल्यापाशी आलोय. मला मार्गदर्शन करा.'
योग्यानं त्याला विचारलं, 'श्रद्धा आहे का मनात? कारण श्रद्धा नसेल तर सत्य तुला पेलवणार नाही.'
शिष्य तरुण होता. त्यानं म्हटलं, 'श्रद्धेनं परिपूर्ण मन घेऊन मी आपल्यापाशी आलोय. आपण जे सांगाल ते मी स्वीकारेन.'
योग्यानं म्हटलं, 'ठीक आहे. आत्ता मी विहिरीवरून पाणी भरून आणायला निघालोय. चल माझ्या मागनं. मी जे काही करेन त्याचं निरीक्षण कर. प्रश्न विचारायचा नाही. श्रद्धा ठेवायची मनात आणि फक्त पाहायचं.'
तरुणाला वाटलं, 'यात काय अवघड आहे? हे तर आपण सहज करू.'
तो त्या योग्यामागे निघाला.
विहिरीजवळ पोहोचल्यावर योग्यानं एक घागर विहीरीच्या काठावर ठेवली. तरुणाला थोडं आश्चर्य वाटलं कारण त्या घागरीला बूड नव्हतं. दुसर्‍या घागरीच्या गळ्यात दोर बांधून योग्यानं ती घागर विहिरीत लोटली. पाण्यानं भरलेली घागर शेंदून वर घेतली आणि त्यातील पाणी बिनबुडाच्या घागरीत ओतलं.
सगळं पाणी लागलीच वाहून गेलं. पण योग्यानं तिकडे लक्ष दिलं नाही. त्यानं पुन्हा घागर विहिरीत सोडली, पाणी उपसलं आणि बिनबुडाच्या घागरीत भरलेली घागर रिकामी केली, पाणी पुन्हा वाहून गेलं.
असं एकदा घडलं, दोनदा घडलं, तीनदा घडलं....
तो तरुण हळूहळू अस्वस्थ होऊ लागला. त्याला वाटलं, ' हा माणूस वेडा आहे का? पाणी सगळं वाहून जातंय तिकडे याचं लक्षच नाही. हा आपला घागरींवर घागरी ओततोय त्या बिनबुडाच्या घागरीत. कशी भरणार ती घागर? आणि कधी?'
चौथ्यांदा योग्यानं घागर रिकामी केली, पाणी वाहून गेलं तेव्हा आपल्याला गप्प राहायचंय हे तो तरुण विसरला. त्यानं योग्याला विचारलं, 'अशा रीतीनं जन्मभर पाणी ओतत राहिल्यानंतरही हे पात्र कधी नाही भरणार. या घागरीला तर तळच नाहीय.'
योगी म्हणाला, 'बस्स! तुझा माझा संबंध संपला. मी तुला आधीच बजावलं होतं, मनात श्रद्धा ठेव. फक्त पाहा. काहीही बोलू नकोस. अरे, बुडाशी आपल्याला काय प्रयोजन? आपल्याला फक्त ही घागर भरायची होती. पाणी कधी वर येईल याकडे माझं लक्ष होतंच.'
'आपण जे करताय ते मला उलगडत नाहीय....' तो तरुण म्हणाला.
योगी त्याला म्हणाला, '.....जा तू आता. पुन्हा इकडे परतू नकोस. पहिल्याच परीक्षेत नापास झालास. पुढे याहून मोठमोठ्या परीक्षा व्हायच्या होत्या.'
तो तरुण माघारी परतला.
......पण त्याला चैन पडेना.
चैन पडेना, झोप येईना, भूक लागेना....
त्याच्या मनात आलं, 'बिनबुडाच्या घागरीत पाणी भरणं शक्य नाही ही कुणाही सोम्या-गोम्याच्या लक्षात येईल अशी गोष्ट. या माणसाला वेगळंच काहीतरी समजावायचं असणार. मी गप्प रहायला हवं होतं. किती वेळ असं चाललं असतं? मी घाई केली विचारायची. चुकलंच माझं.'
दुसर्‍या दिवशी तो तरुण पुन्हा त्या योग्याकडे परतला. पाय धरून त्यानं योग्याकडे क्षमा मागितली. योगी त्याला म्हणाला, 'हा विचार करण्यात तू जेव्हढा शहाणपणा दाखवला तेव्हढा जीवनातही दाखवला असतास तर तुला माझ्याकडे यावंच लागलं नसतं. मला तुला एव्हढंच सांगायचं होतं. बूड नसलेलं पात्र भरता येत नाही. आजपर्यंत या शरीर रूपी पात्रात तू इच्छा-वासनांची भर घालत राहिलास. कधी हे पात्र भरलं का?  इच्छा-वासनांनी आपण जे भरायचा प्रयत्न करतोय ते शरीराचं पात्र  बिनबुडाचं आहे, असा विचार कधी तुझ्या मनात आला का?'
योगी जे बोलला ते ऐकून त्या तरुणाचे डोळे उघडले.  श्रद्धेनं तो गुरुचरणी लीन झाला.

No comments: