-संध्या पेडणेकर
खलील जिब्रान यांची एक छोटी कथा आहे.
कथेचं नाव आहे - डोळे.
कथा अशी-
एकदा डोळे म्हणाले, 'या समोरच्या दरीपलीकडे एक डोंगर आहे. किती सुंदर दिसतोय तो. पाहा तर, आत्ता त्याला चारही बाजूंनी दाट धुक्यानं वेढलंय. पण एकूण दृश्य फारच सुरेख दिसतंय.'डोळ्यांचं बोलणं ऐकून कान म्हणाले, 'डोंगर? कुठे आहे डोंगर? मला कोणताही डोंगर ऐकू येत नाहीए!'
कानांचं म्हणणं ऐकून हात म्हणाले, 'हो रे कानूटल्यांनो. डोळोबांचं बोलणं ऐकलं आणि मी डोंगराला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण मला डोंगर जाणवत नाहीय. डोंगर असेल असं मला तरी वाटत नाही!'
यावर नाक म्हणालं, 'बरोबर बोललात हातभाऊ. डोंगर कुठेही नाहीय. असता तर मला त्याचा वास नसता का आला?'
या सगळ्यांचं बोलणं ऐकून डोळे उदास झाले. त्यांनी डोंगरावरून नजर वळवून बाजूला नेली. आता त्यांच्यालेखीही डोंगर दृष्टीआडची सृष्टी झाले.
डोळ्यांनी नजर वळवली आणि लगेच इतरांची आपापसात कुजबूज सुरू झाली - डोळ्यांना बहुतेक भ्रम झालाय. डोळ्यांमध्ये काहीतरी बिघाड झालाय राव. घोटाळा आहे.
---
गोष्ट इथेच संपते.
अहंभावनेमुळे कुणालाही आपल्यापलीकडचं काही दिसतंच नव्हतं. इतरांचंही म्हणणं बरोबर असू शकतं हे मानायला कुणीही तयार नव्हतं. श्रद्धेची कमतरता, पुराव्याशिवाय निर्णयाप्रत पोहोचण्य़ाची आणि अनुभवाविना आपलं मत व्यक्त करण्याची चूक ते सगळेच करत होते. डोळ्यांकडे आत्मविश्वास नव्हता.
खरं तर त्यांना भ्रम झाला नव्हताच. छातीठोकपणे आपलं म्हणणं मांडणं त्यांना जमलंच नाही.
इतरांना मात्र आपल्या सीमारेखांपलीकडे जाऊन विचार करणं काही जमलं नाही.
No comments:
Post a Comment