-संध्या पेडणेकर
दुर्वास ऋषी अतिशय कोपिष्ट.
एकदा ते श्रीकृष्ण-रुक्मिणीच्या महालात गेले. श्रीकृष्ण-रुक्मिणीनं त्यांचा खूप
आदर-सत्कार केला. दुर्वासांसारख्या शीघ्रकोपी ऋषींचं मन जिकून घेणं अतिशय कठिण. पण
श्रीकृष्ण-रुक्मिणीनं घरी आलेल्या अतिथीच्या आदरसत्कारात यत्किंचितही उणीव येऊ
दिली नाही.
एकदा संध्याकाळच्या वेळी
दुर्वासा श्रीकृष्णाच्या रथात बसले. त्यांची फेरफटका मारण्याची इच्छा
श्रीकृष्णानं ओळखली. श्रीकृष्ण सारथ्याला
रथ हाकण्याचा इशारा करणार तेवढ्यात दुर्वास ऋषी म्हणाले की, रथ तू आणि रुक्मिणी
दोघांनी मिळून खेचायचा.
श्रीकृष्ण-रुक्मिणीनं मग
घोड्यांची जागा घेतली.
त्या दोघांच्या सेवेनं
दुर्वास मुनी प्रसन्न झाले.
त्यांनी श्रीकृष्णाला एक
प्रकारचा लेप दिला आणि सांगितलं की, हा पायस लेप आहे. हा लेप शरीराच्या ज्या भागावर
लावशील त्या भागावर अस्त्र-शस्त्रांचा परिणाम होणार नाही.
श्रीकृष्णानं आपल्या संपूर्ण
शरीरावर तो लेप लावला पण पायांच्या तळव्यांवर लेप लावणं विसरला. शिवपुराणात
उल्लेख आहे की यामुळेच श्रीकृष्णाचे तळवे कमजोर राहिले. म्हणूनच जरा व्याधाचे बाण
त्यांना भेदू शकले. आणि यादवकुळाचा नाश झाला.
बाण लागला त्यावेळी श्रीकृष्ण
एका झाडाखाली पहुडले होते. एका पायाच्या उभ्या केलेल्या गुडघ्यावर त्यांनी दुसर्या
पायाचं पाऊल टेकवलं होतं. रात्र झाली तशी त्यांच्या तळव्यावरील पद्म लकाकू लागलं.
त्यावेळी जरा व्याध शिकार
करण्यासाठी निघाला होता. श्रीकृष्णाच्या पावलावरील चमकतं पद्म त्याला हरिणाच्या
लुकलुकणार्या डोळ्यांसारखं वाटलं आणि त्यानं नेम धरून बाण सोडला. याच बाणानं
श्रीकृष्णाची इहलीला समाप्त झाली.
---
No comments:
Post a Comment