Tuesday, March 27, 2012

सूडाची आग

-संध्या पेडणेकर
पंचतंत्रात भरुंड नावाच्या एका पक्षाची गोष्ट आहे.
भरुंडला दोन डोकी होती. म्हणजे धड एकच, पण त्या धडावर दोन माना, त्या मानांवर दोन डोकी, आणि या दोन डोक्यांवर प्रत्येकी दोन डोळे, दोन तोंडं, दोन चोची आणि दोन कान.
आपल्या या दोन डोक्यांच्या शरीरामुळे भरुंड इतरांमध्ये उठून दिसायचा. त्यामुळं तो नेहमी वेगळ्याच ताठ्यात असायचा. स्वतःला नेहमी इतरांपेक्षा श्रेष्ठ मानायचा.
एकदा भरुंडचं एक तोंड एक फळ खात होतं. खाता खाता ते तोंड उद्गारलं, 'वाः! किती स्वादिष्ट आहे हे फळ. अमृततुल्य चव आहे या फळाची. तोंडात सुखाची नुसतं कारंजं फुटतंय. चंदनाच्या की पारिजातकाच्या झाडाचं असेल?... कोणत्या झाडाचं फळ आहे कुणास ठाऊक. आधी मला हे खाऊन संपवू दे.'
मग ते डोकं फळ खाण्यात अगदी पूर्णपणे रंगून गेलं.
पण त्याचं बोलणं ऐकून इकडे दुसर्‍या डोक्याच्या तोंडाला पाणी सुटलं. दुसर्‍या डोक्यानं पहिल्या डोक्याला म्हटलं, 'मलासुद्धा चव घेऊ दे ना रे, थोडं दे मला.'
पहिल्या डोक्यानं म्हटलं, 'मी खाल्लं काय न् तू खाल्लं काय, सारखंच आहे. शेवटी फळ पोटातच जाणार ना? खाऊ दे मला. चवच घ्यायची म्हणतोयस तर तुला देऊन काय उपयोग, तू आणि मी एकच तर आहोत.' बोलता बोलता पहिल्या डोक्यानं पूर्ण फळ एकट्यानं फस्त केलं.
तेव्हापासूनच पहिल्या डोक्याबद्दलचा राग दुसर्‍या डोक्यात धुमसू लागला. सूड उगविण्याची संधी कधी मिळते याची दुसरं डोकं वाट पाहू लागलं.
एके दिवशी दुसर्‍या डोक्याला एक विषारी फळ मिळालं. ते फळ त्यानं पहिल्या डोक्याला दाखवलं आणि म्हटलं, 'स्वार्थी डोक्या, हे फळ किती विषारी आहे हे ठाऊक आहे का तुला? खाल्लं की पार गारद होणार खाणारा. आता मी हे फळ एकट्यानं खाणार आणि तुला चांगली अद्दल घडवणार.'
पहिल्या डोक्यानं दुसर्‍या डोक्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. परोपरीनं त्याला पटवण्याचा प्रयत्न केला की बाबारे, तू हे फळ खाल्लंस तर आपल्या दोघांचेही प्राण निघून जाणार.
पण दुसर्‍या डोक्याला सूड उगवायचा होता. सुडाच्या आगीत तो अगदी आंधळा झाला होता.
त्यानं पहिल्या डोक्याचं म्हणणं अजिबात ऐकलं नाही आणि ते विषारी फळ खाल्लं.
अशा रीतीनं दोन डोक्यांचा तो पक्षी मरण पावला.
सूडाच्या आगीत सर्वस्वाची राखरांगोळी होते.

Friday, March 23, 2012

शाश्वत सुखच खरं सुख

http://www.aoc.gov/images/solon.jpg 
- संध्या पेडणेकर
ख्रिस्तपूर्व 638-558 च्या काळात ग्रीसमध्ये सोलन नावाचे विचारक होऊन गेले. ते नेहमी खूप विचारपूर्वक, शब्द न शब्द तोलून-जोखून बोलायचे असं म्हणतात. ग्रीक सम्राट कारुंसुद्धा सोलन यांना खूप मानायचे. आपला भव्य राजमहाल, विशाल साम्राज्य आणि अपार संपदा सोलनने पाहावी, दोन कौतुकाचे शब्द बोलावे अशी त्यांची फार इच्छा होती. कारूंना वाटे, सोलनने आपल्याबद्दल म्हणावं की कारूंसारखा सुखी कुणी नाही. त्यांनीच असं म्हणावं अशी कारुंची इच्छा होती कारण ते कधीही तोंडदेखलं बोलत नाहीत अशी सोलन यांची ख्याती होती. कारुंला वाटायचं, सोलननी असं मत व्यक्त केलं तर लोकांचा आपल्याबद्दलचा आदर दुणावेल.
शेवटी एकदा कारुंनं सोलनला बोलावणं धाडलं.
सम्राटानं बोलावलं तेव्हा सोलन आले. त्यांनी सम्राटाचं सारं वैभव पाहिलं. प्रत्येक गोष्ट दाखविल्यानंतर सोलन काहीतरी बोलतील म्हणून कारूं वाट पाहायचे, पण सोलन काहीही बोलले नाहीत. उलट त्यांच्या चेहर्‍यावरचा गंभीर भाव आणखी आणखी वाढत गेला. शेवटी शेवटी तर त्यांचा चेहरा झाकोळू लागला.
कारुंना आश्चर्य वाटलं. दुःखही झालं. ते सोलनला म्हणाले, 'आपण काही बोलत का नाही? मी सुखाची परमावधी गाठलीय असं नाही का वाटत आपल्याला?'
यावर सोलन कारुंना म्हणाले, 'मी गप्प आहे हेच उत्तम आहे. कारण माझं बोलणं तुम्हाला सहन होणार नाही.' तरीही सम्राट कारुंनी सोलनला बोलतं करण्याचा प्रयत्न सोडला नाही. शेवटी सोलन म्हणाले,'जे क्षणभंगुर आहे त्याला मी सुख मानत नाही. जे शाश्वत नाही ते सुखावह होऊच शकत नाही.'  
झालं. सोलन यांचं बोलणं ऐकताच सम्राट कारुंच्या रागाचा पारा चढला. त्यांनी लगेच सैनिकांना बोलावून सोलनचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिला. मारण्याआधी सम्राटांनी सोलनला बर्‍याच वेळा म्हटलं, 'वाटल्या सअजूनही माफी माग. आणि म्हण की - सम्राट कारुं सगळ्यात जास्त सुखी आहे. आत्ता तुला मुक्त करतो.'
पण सोलन आपल्या मतावर अढळ होते. निश्चिंत मनानं ते सम्राटाला म्हणाले, 'मला माझे प्राण गमवावे लागले तरी बेहेत्तर, मी खोटं बोलू शकत नाही.'
सोलनना माफ करण्याएवढं सम्राट कारुंचं मनही मोठं नव्हतं. शेवटी सोलनचं शीर धडावेगळं करण्यात आलं.
काही वर्षांनी पारस देशाचा राजा सायरसनं  सम्राट कारुंला युद्धात पराजित केलं आणि त्यांच्या राज्यावर ताबा मिळविला. त्यानं कारुंला एका खांबाला बांधलं आणि आपल्या सैनिकांना आज्ञा दिली- 'याच्या शरीराच्या चिंधड्या करा.'
तेव्हा सम्राट कारुंला सोलनच्या म्हणण्यातील शब्द न् शब्द पटला. सोलनचे शब्द आठवल्यानं शेवटच्या क्षणीसुद्धा सम्राट कारुंच्या चेहर्‍यावर स्मितहास्य होतं. शेवटी त्यांच्या  तोंडून शब्द निघाले - 'सोलन, मला माफ करा. आपलं म्हणणं बरोबर होतं.'
कारुंचं बोलणं ऐकून सायरसनं कारुंकडे सोलनबद्दल विचारपूस केली. सोलनबद्दल ऐकून सायरस इतका प्रभावित झाला की त्यानं सम्राट कारूंला जीवनदान दिलं.
---

  • गोष्ट काही ऐतिहासिक तथ्यांवर आधारित असली तरी पूर्णपणे काल्पनिक असावी. 
  • सोलनबद्दल ऐतिहासिक माहितीसाठी लिंक - http://en.wikipedia.org/wiki/Solon#Constitutional_reform

Thursday, March 22, 2012

शांती

-संध्या पेडणेकर 
मिथिलेचे राजा नेमी यांनी कधी शास्त्राभ्यास केला नव्हता. किंवा त्यांना आध्यात्मातही रस नव्हता. म्हातारपणी त्यांना घोर दाहक ज्वर झाला. 
थोडा थंडावा मिळावा म्हणून त्यांच्या राण्या त्यांना चंदन आणि केशराचा लेप लावू लागल्या. 
लेप लावताना त्यांच्या हातातील बांगड्या वाजू लागल्या. नेमींना तो आवाज त्रासदायक वाटू लागला. राण्यांना त्यांनी हातातील बांगड्या काढून मगच लेप लावायला सांगितलं. 
बांगड्या म्हणजे सौभाग्याचं लक्षण. राण्यांना पेच पडला, बांगड्या उतरवायच्या कशा? 
पण सम्राटाचं म्हणणं टाळताही येत नव्हतं. 
म्हणून मग त्यांनी सौभाग्याचं निशाण म्हणून एक एक बांगडी हातात ठेवून बाकीच्या बांगड्या उतरवल्या. 
बांगड्यांचा आवाज येणं थांबलं.
सम्राटाचं मन शांत झालं आणि त्यांच्या मनात एक विचार आला - 'हातात दहा-दहा बांगड्या होत्या तेव्हा त्या वाजत होत्या. एक एक राहिली आणि आवाज बंद झाला.'
नेमींना साक्षात्कार झाला. 
अनेक असतील तर गजबजाट अटळ असतो. शांती हवी असेल तर एकच असणं अपरिहार्य आहे.
महाराज नेमी उठून बसले. म्हणाले, 'मला जाऊ द्या.'
राण्यांना भोगी राजा नेमी ठाऊक होते, योगी नेमींना त्या ओळखत नव्हत्या. 
त्यांना वाटलं, तापामुळे महाराज विक्षिप्त झाले. त्या घाबरल्या. 
नेमींना रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 
महाराज नेमींनी त्यांना समजावलं - 'घाबरू नका. मला ज्वर झाल्यानं मी बरळत नाहीय. ही सगळी तुमच्या बांगड्यांची कृपा आहे. ईश्वर कोणत्या माध्यमातून ज्ञान देईल ते सांगता येत नाही. तुम्ही बर्‍याच बांगड्या घातल्या होत्या. आजारपणामुळे त्यातून येणारा कर्कश्श आवाज मला सहन होत नव्हता. एक एक बांगडी उरली आणि तो कर्कश्श आवाज बंद झाला. यावरूनच मला बोध झाला. मनात जोवर बर्‍याच आकांक्षा आहेत तोपर्यंत असा आवाज येतच रहाणार. एकच आकांक्षा असायला हवी- मुक्तीची. वासना अनंत. अभीप्सीत एकच असायला हवं- परमात्याच्या मीलनाचं. 
जागरुकता हवी, संकेत कुठूनही मिळू शकतो. 
---

Wednesday, March 21, 2012

अंगुलीमाल

-संध्या पेडणेकर
बौद्ध त्रिपिटकात अंगुलीमालची कथा आहे.
अंगुलीमाल अतिशय क्रूर होता. तो जंगलात रहायचा आणि जाणा-येणार्‍या वाटसरूंना आधी लुटायचा आणि मग ठार मारून त्यांच्या बोटांची माळ गळ्यात बांधायचा. एक हजार लोकांना मारून त्यांच्या बोटांची माळ गळ्यात बांधायची त्यानं प्रतिज्ञा केली होती. त्यामुळेच त्याचं नाव अंगुलीमाल पडलं होतं. त्यानं नऊशे नव्याण्णव लोकांना ठार मारलं होतं. प्रतिज्ञा पूर्ण होण्यासाठी फक्त एकाचीच उणीव होती.
त्या दरम्यान भगवान बुद्ध भ्रमण करत त्या भागात पोहोचले होते. ज्या रस्त्यावर  अंगुलीमालशी गाठ पडायची शक्यता होती त्या रस्त्यानं ते निघाले तेव्हा गावकर्‍यांनी त्यांना पुढे न जाण्याविषयी सांगितलं. बौद्ध भिक्षुंनीही त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.
भगवान बुद्ध म्हणाले,  'मला माहीत नसतं तर कदाचित मी दुसर्‍या मार्गानं गेलोही असतो, पण आता अजिबात नाही. या वाटेनं मलाच गेलं पाहिजे. इतर कुणी जाणार नाही.'
भगवान बुद्ध निघाले. सोबत भिक्षुही निघाले पण नेहमी बुद्धांची सावली होऊन चालणारे शिष्य घाबरून चार पावलं मागेच चालत होते. बुद्ध एकटेच अंगुलीमालच्या भेटीला निघाले.
त्यांना येताना पाहून अंगुलीमाल दुरूनच ओरडला, 'भिक्षु, आहेस तिथेच थांब! मी कोण आहे हे कदाचित तुला माहीत नाही असं दिसतंय!'
त्याचं बोलणं ऐकून भगवान बुद्ध हसले.  म्हणाले, 'तुलाही कदाचित मी कोण आहे हे माहीत नाही असं दिसतंय! खरं तर, आपण कोण हे ही तुला ठाऊक नाहीय!'
गौतम बुद्धांचं उत्तर ऐकून अंगुलीमाल चपापला. एवढ्या आत्मविश्वासानं बोलणारा माणूस त्यानं याआधी पाहिला नव्हता.
तेवढ्यात गौतम बुद्ध त्याच्या पुढ्यात येऊन उभे राहिले. म्हणाले, 'हे पाहा, कसलीही घाई नाही. मला तू निवांतपणे कधीही मारू शकतोस. पण मारण्याआधी माझी एक छोटीशी इच्छा पूर्ण कर. या झाडाची काही पानं मला तोडून आणून दे.'
अंगुलीमाल वृक्षाची मोठी फांदीच तोडून घेऊन आला.
भगवान बुद्ध त्याला म्हणाले, 'माझी अर्धी इच्छा पूर्ण झाली. आता उरलेली इच्छाही पूर्ण कर. ही पानं पुन्हा झाडाला जोड.'
अंगुलीमाल म्हणाला, 'तुटलेली फांदी पुन्हा झाडाला जोडणार कशी?'
भगवान बुद्ध त्याला म्हणाले, 'जोडू शकत नाहीस तर तोडण्याचं काम का करतोस? एवढ्या लोकांना मारलंस तू, पण एखाद्या मुंगीला तरी जिवंत करता येतं का तुला? ज्याला आपण पुन्हा जिवंत करू शकत नाही त्याला मारण्याचा अधिकार आपल्याकडे आहे का?'
भगवान बुद्धांचं बोलणं ऐकून अंगुलीमालला आपली चूक जाणवली. त्याच्या हातून फरसा निखळला. आणि त्यानं भगवान बुद्धांच्या पायांवर लोटांगण घातलं.

---


Saturday, March 17, 2012

मिथ्या अभिमान

-संध्या पेडणेकर
युद्धचातुरी आणि अफाट ताकदीमुळे भरत चक्रवर्ती सम्राट बनला. सम्राट झाल्यानंतर त्याला आपल्या या गुणांबद्दल गर्व झाला. आपली बरोबरी इतर कोणताही राजा करू शकत नाही असं त्याला वाटायचं. अमर होण्याचे विचार त्याच्या मनात घोळू लागले आणि त्यासाठीच्या उपायांच्या शोधास तो लागला.
वृषभ पर्वताच्या उंच शिखरावर आपलं नाव लिहून अमर होण्याचा मार्ग त्याला पटला. त्यानुसार आपल्या प्रचंड लव्याजम्यानिशी तो वृषभ पर्वतावर गेला. या पर्वताची चढण अतिशय कठीण होती. त्याला वाटत होतं, या पर्वताचं शिखर काबीज करणारे आपण केवळ एकमेव. पण शिखरावरील दृश्य पाहून त्याची थोडी निराशा झाली. आपली समजूत चुकीची होती हे त्याच्या लक्षात आलं. वृषभ पर्वत पादाक्रांत करणार्‍या कित्येक चक्रवर्ती सम्राटांची नावं त्या दुरूह शिखरावर आधीपासूनच अंकित केलेली होती. आणखी एखादं नाव जोडण्यासाठीसुद्धा तेथे जागा शिल्लक नव्हती.
भरत खिन्न झाला. पण आपलं नाव तिथे अंकित करायचंच  हा त्याचा निर्धार होता. शेवटी त्यानं शिखरावरील एका सम्राटाचं नाव पुसून त्या जागी आपलं नाव कोरलं आणि तो आपल्या राज्यात परतला.
त्यानंतर बराच काळ लोटला तरी त्याच्या मनातून वृषभाचलाबद्दलची आठवण पुसली जात नव्हती आणि आठवण आली की त्याला खूप अस्वस्थ वाटायचं. आपल्या राजपुरोहिताला बोलावलं आणि आपल्या खिन्नतेचं कारण काय असू शकेल? - अशी विचारणा केली.
वयोवृद्ध राजपुरोहित म्हणाले, 'राजन्, आपण खिन्न आहात त्यामागील कारण थोडं वेगळं आहे. आपल्याला ज्या गोष्टीचा ध्यास होता ती गोष्टच आपण नष्ट केलीत. वृषभ पर्वताच्या अत्युच्च शिखरावर आपलं नाव लिहून ते अजरामर करायची आपली इच्छा होती. पण प्रत्यक्ष तिथे गेल्यावर इतर व्यक्तीचं नाव पुसून आपल्याला आपलं नाव तिथे लिहावं लागलं. यामुळे आपल्या इच्छेचा आधारच नष्ट झाला. आपली इच्छा फोल आहे हे आपणांस कळून चुकलं.
आपण पर्वतशिखरावर लिहिललेलं आपलं नावही कुणी ना कुणी पुसून टाकणार ही शंका  आज आपल्या मनात आहे. जीवनाच्या क्षणभंगूरतेचा असा अचानक साक्षात्कार झाल्याने आपण अस्वस्थ झालात महाराज!राजपुरोहिताचं बोलणं ऐकून भरत राजाला जीवनाच्या क्षणभुंगुरतेबरोबरच आपल्या  गर्वाची जाणीव झाली. त्यातील फोलपणा उमगला.
---

Tuesday, March 13, 2012

श्रद्धा आणि तर्क

-संध्या पेडणेकर



एकदा केशव चंद्र सेन रामकृष्ण परमहंसांना भेटायला गेले. त्यांच्याशी ईश्वराबद्दल वादविवाद करायचा केशवचंद्रांचा विचार होता. केशव चंद्र सेन यांच्यावर त्याकाळी नास्तिकतेचा पगडा होता. त्यांच्यासोबत समाजातील पाच-पन्नास प्रतिष्ठित व्यक्तीही होत्या.
चर्चा सुरू करताना केशवचंद्र परमहंसांना म्हणाले, 'ईश्वराचं अस्तित्वच नाही.' त्यावर परमहंस त्यांना म्हणाले, 'बरोबर आहे आपलं म्हणणं.'
त्यांचं उत्तर ऐकून केशवचंद्रांना धक्काच बसला. त्यांना वाटलं, हे स्वतःला परमहंस आणि भक्त मानतात, तर मग माझं विरोधी मत बरोबर आहे असं कसं काय म्हणतात? त्यांनी माझं म्हणणं जर मान्य केलं तर वादविवाद घडेल कसा? विवादाचं मूळच त्यांनी उपटून टाकलं."
तरीही आपला प्रयत्न पुढे सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत केशवचंद्र परमहंसांना म्हणाले, 'स्वर्ग आणि नरक या केवळ थापा आहेत.'
यावर परमहंस म्हणाले, 'वा, अगदी बरोबर बोललात आपण.'
आता केशवचंद्रांसोबत आलेले लोकही बुचकळ्यात पडले. केशवचंद्रही थोडे उदास झाले. परमहंसांना त्यांनी विचारलं, 'चर्चा व्हावी, वादविवाद घडावा म्हणून मी आलो होतो. पण आपण माझा प्रत्येक तर्क मान्य करत आहात. अशानं चर्चा  घडणार कशी?'
यावर परमहंस केशवचंद्रांना म्हणाले,'तुमची तर्कशक्ती, वादविवाद करण्याची क्षमता, तुमची कुशाग्रबुद्धी हे सगळं माझ्या दृष्टीनं ईश्वराच्या अस्तित्वाची साक्ष आहे. ईश्वराशिवाय केशवचंद्र होणे नाही. एखादं फूल जरी पाहिलं तरी मला त्यात परमेश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो. तुम्ही तर एव्हढं अद्भुत फूल आहात, तुम्हाला पाहून परमेश्वराची आठवण नाही झाली तरच नवल. म्हणूनच मी त्या परमेश्वराचे आभार मानतो. किती अद्भुत माणूस पाठवला त्यानं. तुमच्या तोंडून तोच बोलतोय. मग मी नकार कसा देऊ? त्याला जर असा डाव मांडायचा असेल तरी चालेल, आपला विरोध नाही...'
त्या रात्री केशवचंद्रांना झोप आली नाही. दुसर्‍या दिवशी सकाळीच ते परमहंसांना भेटायला गेले. भेट झाली तेव्हा म्हणाले, 'आपण मला हरवलंत. एक गोष्ट मी मान्य करतो की माझे सगळे तर्क वायफळ आहेत. कारण, काल आपल्या डोळ्यांत मी जो आनंद अनुभवला तसा आनंद माझ्या तर्कांमुळे मला कधीही मिळाला नाही. तो आनंद हाच खरा पुरावा आहे. तर्कांमुळे तसा आनंद मिळत नसेल तर त्याचा उपयोगच काय? आपल्याला भेटून तर्कांपलीकडेही काही आहे हे मला समजलं.'
---




Tuesday, March 6, 2012

अलेक्झांडर अणि संन्यासी

 -संध्या पेडणेकर
अलेक्झांडर जेव्हा भारतविजयाच्या मोहिमेवर निघाला तेव्हा त्याचे गुरु अरिस्टॉटल यांनी त्याला सांगितलं की, परत येताना भारतातील एक संन्यासी सोबत आण. बरंच ऐकलंय मी तिथल्या संन्याशांबद्दल, मला संन्यासी पाहायचाय.
भारतातून परतण्याच्या वेळी अलेक्लाझांडरला आपल्या गुरुची इच्छा आठवली. त्यानं आपल्या सैनिकांना आज्ञा दिली, 'जा, एक संन्यासी पकडून आणा.'
सैनिक निघाले. गावात पोहचल्यावर त्यांनी संन्याशाबद्दल विचारपूस केली. गावकर्‍यांनी त्यांना सांगितलं की,  नदीकिनारी एका नग्न संन्याशाचा मुक्काम आहे.
सैनिक नदीकिनारी संन्याशाजवळ पोहोचले आणि त्यांनी संन्याशाला सांगितलं, 'आपण आमच्यासोबत ग्रीसला चलावं अशी जगज्जेत्या अलेक्झांडरची आज्ञा आहे. आम्ही आपणांस राजकीय इतमामांसह, अतिशय थाटामाटानं सोबत घेऊन जाऊ. सगळी सुखं आपल्या पायांशी लोळण घेतील. महान, विश्वविजेत्या अलेक्झांडरचे आपण विशेष अतिथी बनून राजसुखं उपभोगाल.'
सैनिकांचं बोलणं ऐकून संन्यासी हसू लागला. म्हणाला, 'आम्ही फक्त स्वतःच्या मर्जीनं चालतो. इतरांचे हुकूम मानणं आम्ही फार पूर्वीच सोडून दिलंय. तुम्हाला हवी असलेली व्यक्ती मी नव्हे.'
शिपायांनी कैक प्रकारे संन्याशाची मनधरणी केली. त्यांच्यापैकी एक म्हणाला, 'आपण अलेक्झांडरला ओळखत नाही. तो अतिशय क्रोधी आणि भयंकर राजा आहे. तुम्ही त्याचं म्हणणं मान्य केलं नाही तर तो तुमचं शीर धडावेगळं करेल.'
संन्यासी म्हणाला, 'तुम्ही आपल्या त्या राजालाच घेऊन या इथे.  तो काय करतो ते पाहू.'
संन्याशाचं बोलणं ऐकलं आणि अलेक्झांडर आपल्या संपूर्ण सैन्यबळासह त्याला भेटायला निघाला. संन्याशावर नजर पडताच त्यानं म्यानातून आपली तलवार खेचली आणि धमकी देत तो म्हणाला, 'मुकाट्यानं चल आमच्याबरोबर. नकार ऐकून घेण्याची मला सवय नाही. चल ऊठ, नाहीतर तुझी मान कापून तुझ्याच हातात देईन.'
संन्यासी त्याला म्हणाला, 'मान कापणार म्हणतोस? ठीक आहे, काप. माझ्याबद्दल म्हणशील तर ज्या दिवशी संन्यास घेतला त्याच दिवशी मी या मानेपासून फारकत घेतलीय. कर हे शीर धडावेगळं. ते जमिनीवर पडताना तूही पाहाशील आणि मीसुद्धा पाहीन. कारण मी त्या शिरापासून कधीचाच वेगळा झालोय. म्हणून म्हणतो, अजिबात वेळ नको दवडूस. उचल तुझी तलवार आणि घाल घाव या मानेवर.'
संन्याशाचं धाडस पाहून अलेक्झांडर जणू नव्यानं शुद्धीवर आला. त्यानं तलवार म्यानेत ठेवली. सैनिकांना तो म्हणाला, 'या माणसाला मारण्यात काही हशील नाही. याच्यावर कुणाचा हुकूमही चालणं शक्य नाही. मरणाला घाबरणार्‍यालाच आपण मरणाची भीती घालू शकतो.'
---