-संध्या पेडणेकर
एकदा केशव चंद्र सेन रामकृष्ण परमहंसांना भेटायला गेले. त्यांच्याशी ईश्वराबद्दल वादविवाद करायचा केशवचंद्रांचा विचार होता. केशव चंद्र सेन यांच्यावर त्याकाळी नास्तिकतेचा पगडा होता. त्यांच्यासोबत समाजातील पाच-पन्नास प्रतिष्ठित व्यक्तीही होत्या.
चर्चा सुरू करताना केशवचंद्र परमहंसांना म्हणाले, 'ईश्वराचं अस्तित्वच नाही.' त्यावर परमहंस त्यांना म्हणाले, 'बरोबर आहे आपलं म्हणणं.'
त्यांचं उत्तर ऐकून केशवचंद्रांना धक्काच बसला. त्यांना वाटलं, हे स्वतःला परमहंस आणि भक्त मानतात, तर मग माझं विरोधी मत बरोबर आहे असं कसं काय म्हणतात? त्यांनी माझं म्हणणं जर मान्य केलं तर वादविवाद घडेल कसा? विवादाचं मूळच त्यांनी उपटून टाकलं."
तरीही आपला प्रयत्न पुढे सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत केशवचंद्र परमहंसांना म्हणाले, 'स्वर्ग आणि नरक या केवळ थापा आहेत.'
यावर परमहंस म्हणाले, 'वा, अगदी बरोबर बोललात आपण.'
आता केशवचंद्रांसोबत आलेले लोकही बुचकळ्यात पडले. केशवचंद्रही थोडे उदास झाले. परमहंसांना त्यांनी विचारलं, 'चर्चा व्हावी, वादविवाद घडावा म्हणून मी आलो होतो. पण आपण माझा प्रत्येक तर्क मान्य करत आहात. अशानं चर्चा घडणार कशी?'
यावर परमहंस केशवचंद्रांना म्हणाले,'तुमची तर्कशक्ती, वादविवाद करण्याची क्षमता, तुमची कुशाग्रबुद्धी हे सगळं माझ्या दृष्टीनं ईश्वराच्या अस्तित्वाची साक्ष आहे. ईश्वराशिवाय केशवचंद्र होणे नाही. एखादं फूल जरी पाहिलं तरी मला त्यात परमेश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो. तुम्ही तर एव्हढं अद्भुत फूल आहात, तुम्हाला पाहून परमेश्वराची आठवण नाही झाली तरच नवल. म्हणूनच मी त्या परमेश्वराचे आभार मानतो. किती अद्भुत माणूस पाठवला त्यानं. तुमच्या तोंडून तोच बोलतोय. मग मी नकार कसा देऊ? त्याला जर असा डाव मांडायचा असेल तरी चालेल, आपला विरोध नाही...'
त्या रात्री केशवचंद्रांना झोप आली नाही. दुसर्या दिवशी सकाळीच ते परमहंसांना भेटायला गेले. भेट झाली तेव्हा म्हणाले, 'आपण मला हरवलंत. एक गोष्ट मी मान्य करतो की माझे सगळे तर्क वायफळ आहेत. कारण, काल आपल्या डोळ्यांत मी जो आनंद अनुभवला तसा आनंद माझ्या तर्कांमुळे मला कधीही मिळाला नाही. तो आनंद हाच खरा पुरावा आहे. तर्कांमुळे तसा आनंद मिळत नसेल तर त्याचा उपयोगच काय? आपल्याला भेटून तर्कांपलीकडेही काही आहे हे मला समजलं.'
---
No comments:
Post a Comment