-संध्या पेडणेकर
बौद्ध त्रिपिटकात अंगुलीमालची कथा आहे.
अंगुलीमाल अतिशय क्रूर होता. तो जंगलात रहायचा आणि जाणा-येणार्या वाटसरूंना आधी लुटायचा आणि मग ठार मारून त्यांच्या बोटांची माळ गळ्यात बांधायचा. एक हजार लोकांना मारून त्यांच्या बोटांची माळ गळ्यात बांधायची त्यानं प्रतिज्ञा केली होती. त्यामुळेच त्याचं नाव अंगुलीमाल पडलं होतं. त्यानं नऊशे नव्याण्णव लोकांना ठार मारलं होतं. प्रतिज्ञा पूर्ण होण्यासाठी फक्त एकाचीच उणीव होती.
त्या दरम्यान भगवान बुद्ध भ्रमण करत त्या भागात पोहोचले होते. ज्या रस्त्यावर अंगुलीमालशी गाठ पडायची शक्यता होती त्या रस्त्यानं ते निघाले तेव्हा गावकर्यांनी त्यांना पुढे न जाण्याविषयी सांगितलं. बौद्ध भिक्षुंनीही त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.
भगवान बुद्ध म्हणाले, 'मला माहीत नसतं तर कदाचित मी दुसर्या मार्गानं गेलोही असतो, पण आता अजिबात नाही. या वाटेनं मलाच गेलं पाहिजे. इतर कुणी जाणार नाही.'
भगवान बुद्ध निघाले. सोबत भिक्षुही निघाले पण नेहमी बुद्धांची सावली होऊन चालणारे शिष्य घाबरून चार पावलं मागेच चालत होते. बुद्ध एकटेच अंगुलीमालच्या भेटीला निघाले.
त्यांना येताना पाहून अंगुलीमाल दुरूनच ओरडला, 'भिक्षु, आहेस तिथेच थांब! मी कोण आहे हे कदाचित तुला माहीत नाही असं दिसतंय!'
त्याचं बोलणं ऐकून भगवान बुद्ध हसले. म्हणाले, 'तुलाही कदाचित मी कोण आहे हे माहीत नाही असं दिसतंय! खरं तर, आपण कोण हे ही तुला ठाऊक नाहीय!'
गौतम बुद्धांचं उत्तर ऐकून अंगुलीमाल चपापला. एवढ्या आत्मविश्वासानं बोलणारा माणूस त्यानं याआधी पाहिला नव्हता.
तेवढ्यात गौतम बुद्ध त्याच्या पुढ्यात येऊन उभे राहिले. म्हणाले, 'हे पाहा, कसलीही घाई नाही. मला तू निवांतपणे कधीही मारू शकतोस. पण मारण्याआधी माझी एक छोटीशी इच्छा पूर्ण कर. या झाडाची काही पानं मला तोडून आणून दे.'
अंगुलीमाल वृक्षाची मोठी फांदीच तोडून घेऊन आला.
भगवान बुद्ध त्याला म्हणाले, 'माझी अर्धी इच्छा पूर्ण झाली. आता उरलेली इच्छाही पूर्ण कर. ही पानं पुन्हा झाडाला जोड.'
अंगुलीमाल म्हणाला, 'तुटलेली फांदी पुन्हा झाडाला जोडणार कशी?'
भगवान बुद्ध त्याला म्हणाले, 'जोडू शकत नाहीस तर तोडण्याचं काम का करतोस? एवढ्या लोकांना मारलंस तू, पण एखाद्या मुंगीला तरी जिवंत करता येतं का तुला? ज्याला आपण पुन्हा जिवंत करू शकत नाही त्याला मारण्याचा अधिकार आपल्याकडे आहे का?'
भगवान बुद्धांचं बोलणं ऐकून अंगुलीमालला आपली चूक जाणवली. त्याच्या हातून फरसा निखळला. आणि त्यानं भगवान बुद्धांच्या पायांवर लोटांगण घातलं.

---
No comments:
Post a Comment