Tuesday, May 22, 2012

क्षण मुक्तीचा


-संध्या पेडणेकर
नागार्जुन एक फकीर होते. एक राणी त्यांच्या व्यक्तीमत्वावर भाळली. एके दिवशी साहस एकवटून तिने नागार्जुनांना आपल्या महालात येण्याचे आमंत्रण दिले. त्यांच्या सानिध्यात काही क्षण घालविण्याची तिची इच्छा होती. त्यांचे अभाव दूर करण्यासाठी त्यांना काहीतरी देण्याचीही तिची इच्छा होती.
नागार्जुनांनी राणीचं आमंत्रण स्वीकारलं. राणीच्या महालात ते तिचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी गेले. त्यांच्या येण्यानं राणी आनंदली. तिने त्यांचे स्वागत केले. त्यांची उत्तम सरबराई राखली.
संध्याकाळ झाली तशी नागार्जुनांनी राणीचा निरोप घेतला. निरोप देताना राणी अत्यंत नम्रतेनं त्यांना म्हणाली, महाराज, मला आपणाकडून काही हवंय.
काय हवंय?, असं नागार्जुनांनी राणीला विचारलं.
राणी म्हणाली, आपण आपलं भिक्षापात्र जर मला दिलंत तर....
पटकन नागार्जुनांनी राणीला आपलं भिक्षापात्र दिलं. राणीनं मग त्यांना एक रत्नजडित स्वर्णपात्र दिलं. ती म्हणाली, त्या पात्राऐवजी आपण हे पात्र घ्या. मी दररोज आपल्या भिक्षापात्राची पूजा करेन.
राजमहालातून बाहेर पडताच नागार्जुनांच्या हातातील त्या मौल्यवान पात्रावर एका चोराची नजर खिळली. तो त्यांचा पाठलाग करू लागला. एकांत मिळताच त्यांच्या हातून ते पात्र हिसकावून घेण्याचा त्याचा विचार होता.
थोडं तर चालून गेल्यानंतर नागार्जुनांनी हातातील ते पात्र फेकून दिलं.
तत्क्षणी चोरानं ते उचललं.
त्याला वाटलं, काय माणूस आहे हा! एव्हढं बहुमूल्य पात्र यानं सरळ फेकून दिलं?
काही का असेना, आपल्याला ते मिळालं ना, झालं तर. मग त्याच्या मनात विचार आला, आपण निदान यासाठी त्याचे आभार मानायला हवेत.
पुढे होऊन त्यानं नागार्जुनांना रोखलं. म्हणाला, महाराज, मला आपले आभार मानायचे आहेत. आपल्यासारखे लोकही या जगात आहेत यावर आत्तापर्यंत माझा अजिबात विश्वास नव्हता. मला आपली पायधूळ घेण्याची परवानगी द्या.
नागार्जुन हसतच त्याला म्हणाले, जरूर.
चोरानं खाली वाकून त्यांच्या पायांवर हात ठेवला आणि तो आपल्या कपाळी लावला. त्या क्षणी त्याच्या कृतज्ञ हृदयात त्या पुसटशा स्पर्शानं जे भाव जागृत झाले त्यामुळे तो व्याकुळला. नागार्जुनांना त्यानं विचारलं, बाबा, मला आपल्यासारखं व्हायचं असेल तर किती जन्म घ्यावे लागतील?’
नागार्जुन त्याला म्हणाले, किती जन्म? तुझी इच्छा असेल तर तसं आत्ता, या क्षणीही घडू शकतं.
त्या क्षणानंतर चोर चोर राहिला नाही. पुढे तो नागार्जुनांचा शिष्य बनला.

Friday, May 18, 2012

बरी अद्दल घडली


-संध्या पेडणेकर
रामकाकांच्या घरासमोर अंगणात एक खूप मोठं झाड होतं.
त्या झाडामुळे घरावर आणि अंगणभर नेहमी सावली असायची. घराचं ते जणू छत्रच होतं.
पण त्यांच्या एका शेजार्‍याचं  म्हणणं पडलं की घर आणि अंगणावर अशी छाया टाकणारी झाडं अशुभ असतात. त्याच्या अशुभ छायेमुळे काहीतरी अप्रिय घडण्याआधी ते झाड कापून काढणंच योग्य.
शेजार्‍याचं बोलणं मानून रामूकाकांनी आपल्या अंगणातील घरादाराला सावली देणारा तो वृक्ष कापून टाकला. चुलीत जाळता येतील अशा त्या प्रचंड वृक्षाच्या छोट्या छोट्या ढलप्या पाडल्या.
वृक्ष बराच मोठा होता. त्याच्या अर्ध्या लाकडांनी रामूकाकांचं घर भरलं. अंगणातही जागा उरली नाही साठवायला.
तेव्हा मदत करण्याच्या बहाण्यानं तिथे आलेल्या त्यांच्या शेजार्‍यानं त्यांच्या संमतीनं उरलेली अर्धी लाकडं स्वतःसाठी नेली.
काही दिवसांनी, थंडपणानं विचार करताना रामूकाकांना वाटलं की, आपली सरपणाची सोय करण्यासाठी म्हणूनच त्यांच्या त्या शेजार्‍यानं त्यांना त्यांच्या अंगणातील झाड अशुभ असल्याचा आणि ते तोडण्याचा सल्ला दिला होता.
रामूकाकांना खूप वाईट वाटलं.
गावातल्या एका वयोवृद्ध व्यक्तीसमोर त्यांनी आपलं मन उघड केलं. विचारलं की, बाबा, झाड तोडलं ही माझ्या हातून चूक घडली का? असे प्रचंड वृक्ष दुर्भाग्याला आमंत्रण देतात का?
बाबा हसत म्हणाले, तुझ्यासारख्या मुर्खाच्या अंगणात उगवला हे त्या वृक्षाचं दुर्भाग्यच म्हणायला हवं. म्हणूनच त्याची कत्तल घडली आणि आता त्याला जाळलंही जाईल.
ऐकलं आणि रामूकाकांना आपल्या हातून घडलेली चूक जाणवून रडूच कोसळलं.
वयोवृद्ध बाबांनी मग रामूकाकांना सांगितलं, जाऊ दे, चुका माणसाच्या हातूनच घडतात. हरकत नाही. आपण आता मूर्ख राहिलो नाही यातच समाधान मान. इतरांच्या सल्यावर अंमल करण्याआधी सल्ला देण्यामागे त्यांचा काय हेतू आहे याचा शोध घेऊन, सल्ला नीट उमगेल तेव्हाच आणि स्वतःही त्याच्याशी सहमत असल्यासच त्यावर अंमल करावा हे समजण्याची अक्कल एक झाड गमावून जरी तू शिकलास तरी खूप झालं. या गोष्टी नीट लक्षात ठेवल्यास तर पुन्हा अशी चूक घडणार नाही तुझ्याकडून.
---

Thursday, May 17, 2012

परोपकारी लिंकन


-संध्या पेडणेकर
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन अतिशय दयाळू   व्यक्ती होते।
एकदा आपल्या मित्राबरोबर ते एका सभेत भाग घेण्यासाठी  निघाले होते.
रस्त्यात एके ठिकाणी चिखलाने भरलेला मोठा खड्डा होता  आणि त्या खड्ड्यात डुकराचे एक पिल्लू पडले होते. चिखलातून बाहेर निघण्याचे त्या पिल्लाचे सर्व प्रयत्न निष्फळ चालले होते. पिल्लू घायकुतीला आले होते.
लिंकनने आपली बग्घी थांबवली आणि स्वतः चिखलात उतरून डुकराच्या त्या पिल्लाला बाहेर काढले.
या प्रयत्नांत त्यांच्या कपड्यांवर चिखल लागला. सभास्थळी पोहोचण्यास थोडा उशीरही झाला.
थोडं पाणी घेऊन त्यांनी हात-पाय धुतले आणि ते सभास्थळी पोहोचले.
सभेच्या ठिकाणी त्यांचे चिखलानं माखलेले कपडे पाहून लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली.
काही लोकांनी लिकनच्या मित्राला त्याबद्दल विचारले.
शेवटी लोकांची जिज्ञासा शांत करण्याच्या उद्देशाने सभा सुरू झाली तेव्हा आयोजकांनी त्यामागील कारण सगळ्यांना जाहीर रीत्या सांगितले. ते म्हणाले की, लिंकन इतके दयाळू आहेत की सभेच्या ठिकाणी येताना चिखलात अडकलेल्या डुकराच्या पिल्लाचे हाल त्यांना पाहावले नाहीत. त्याला चिखलातून बाहेर काढलं तेव्हाच ते सभेच्या ठिकाणी आले. यामुळेच त्यांना इथे पोहोचण्यास अंमळ उशीर झाला.
आयोजकांचं बोलणं ऐकून लिंकन लगेच उभे राहिले आणि म्हणाले की, आपला काहीतरी गैरसमज होतोय असं मला वाटतं. डुकराचं ते पिल्लू तडफडत होतं म्हणून मी त्याला चिखलातून बाहेर काढलं असं नव्हे, तर, चिखलात अडकल्यामुळे त्याचा जीव कासावीस होत असलेला मला पाहवेना म्हणून मी त्याला बाहेर काढलं. स्वतःच्याच दुःखभावनेवर मी फुंकर घातली.  
परोपकारही स्वान्तःसुखाय म्हणणारे लिंकन थोरच होते.   

Wednesday, May 16, 2012

सोंगाड्या


-संध्या पेडणेकर
एका राजाच्या दरबारात एकदा एक सोंगाड्या आला आणि त्यानं दानस्वरूपात पाच स्वर्णमुद्रा मागितल्या. राजा त्याला म्हणाला, सोंगाड्या आहेस असं म्हणतोस तर तुझ्या कलेचा काही नमूना दाखव. आम्ही तुला दान नव्हे, बक्षीस देऊ.
राजाचं बोलणं ऐकलं आणि सोंगाड्या दरबारातून बाहेर निघून गेला.
दुसर्‍या दिवशी पहाटे पहाटे शहराबाहेरच्या देवळासमोर एका साधूनं मुक्काम ठेवला. साधू मौनीबाबा होता. माळावर गुरं चरायला आणलेल्या गुराख्यांनी या मौनीबाबाबद्दल शहरात सगळ्यांना बातमी दिली. गुराख्यांनी त्या साधूच्या पायांवर डोकं टेकून आशिर्वाद मागितले होते, पण त्यांनी डोळे उघडले नव्हते. ध्यानधारणेत ते तल्लीन राहिले. त्यांचया आगमनाची बातमी शहरभर पसरली आणि दुसर्‍या दिवशी त्यांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी जमली. होता होता बातमी राजमहालापर्यंत पोहोचली. कित्येक दरबारी दान आणि फळं-फुलं घेऊन साधूच्या दर्शनाला आले. तरीही साधूनं डोळे उघडले नाहीत आणि कोणत्याही वस्तूचा स्वीकारही केला नाही. संध्याकाळपर्यंत या महान साधूच्या आगमनाची बातमी राजाच्या कानांपर्यंत पोहोचली. राजासुद्धा धन-धान्य, सोनं-नाणं घेऊन साधूच्या दर्शनाला आला. हात जोडून त्यानं साधूच्या विनवण्या केल्या पण साधूनं राजाच्या विनवण्यांनाही दाद दिली नाही.
परतताना राजानं तिथे उपस्थित असलेल्या दरबार्‍यांना दुसर्‍या दिवशी सकाळीच दरबारात हजर रहाण्यास सांगितलं. या महान साधूला कोणत्याही प्रकारची तोसीस पडू नये म्हणून काय काय करता येईल या विषयावर त्यांना सल्ला-मसलत करायची होती.
दुसर्‍या दिवशी ठरल्याप्रमाणे कामकाज सुरू होण्याआधीच सोंगाड्या पुन्हा दरबारात हजर झाला. राजाला तो म्हणाला, माझ्या कलेचा नमूना मी दिला आता मला पाच स्वर्णमुद्रा द्या.
राजानं आश्चर्यानं त्याला विचारलं, आपली कला तू कधी दाखवलीस आम्हाला?’
सोंगाड्या म्हणाला, दोन दिवस शहराबाहेरच्या मंदिरासमोर बसलेला तो मौनी साधू मीच तर होतो. साधूचं सोंग घेतलं होतं मी.
राजानं त्याला विचारलं, काल तुझ्यासमोर वैभवाचे ढीग लागले होते. त्यातून तू काहीही घेतलं नाहीस आणि आज पुन्हा पाच स्वर्णमुद्रांसाठी तू दरबारात आलास. असं का?’
सोंगाड्या म्हणाला, महाराज, काल मी साधूचा वेष धारम केला होता. दान स्वीकारलं सतं तर माझ्या सोंगाचा मान राहिला नसता. शिवाय, मला फक्त पाच स्वर्णमुद्रांचीच गरज आहे. इतकं धन घेऊन मी काय करणार!’
त्याचं म्हणणं ऐकलं आणि तो केवळ महान कलाकारच नव्हे तर एक महान व्यक्ती असल्याबद्दल राजाची खात्री पटली. 

Tuesday, May 15, 2012

जगाचं कल्याण हाच खरा धर्म

-संध्या पेडणेकर
रामानुजाचार्यांना त्यांच्या गुरुंनी अष्टाक्षरी मंत्राचा उपदेश दिला आणि सांगितलं, वत्सा, हा कल्याणकारी मंत्र ज्याच्या कानावर पडेल त्याची सारी पापं नष्ट होतात. तयाला मोक्षप्राप्ती होते. म्हणूनच हा मंत्र अतिशय गुप्त राखला जातो. तू सुद्धा हा मंत्र कुणा अनधिकारी व्यक्तीच्या कानांवर जाणार नाही याबद्दल खबरदारी घे.
गुरुंचं बोलणं ऐकून रामानुज पेचात अडकले.
त्यांना वाटलं, हा मंत्र एवढा प्रभावशाली आहे तर तो गुप्त का ठेवायचा? हा तर प्रत्योक प्राणीमात्राला ऐकवायला हवा. त्यामुळे सगळ्यांच्या दुःखाचं हरण होईल. आणि सगळ्यांचीच पापं नष्ट होतील.
हा विचार मनात आला आणि लगेच त्यांना गुरुजींनी दिलेली ताकीदही आठवली. गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन करणं म्हणजे महत्पापच.
या द्विधा मनःस्थितीमुळे त्यांना रात्रभर झोप आली नाही.
एका बाजूला संपूर्ण जगाचा उद्धार करण्याची संधी होती आणि दुसर्‍या बाजूला गुरुंची आज्ञा मोडण्याचं पातक होतं.
शेवटी त्यांनी निर्णय घेतला. ब्रह्म मुहूर्तावर ते उठले आणि आश्रमाच्या छतावर चढले. संपूर्ण शक्ती आपल्या आवाजात ओतून त्यांनी अष्टाक्षरी मंत्राचा जप सुरू केला.
छतावर चढून मंत्रजाप करणार्‍या रामानुजांना पाहाण्यास तिथे खूप गर्दी लोटली.
थोड्याच वेळात गुरुही तिथे येऊन पोहोचले.
रामानुजाला त्यांनी खाली उतरण्यास सांगितलं. रामानुज खाली आले.
गुरुंनी त्यांना विचारलं, 'तू काय करतोयस हे तुला कळतंय का?'
रामानुजंनी विनम्रपणानं सांगितलं, 'गुरुदेव, क्षमा असावी. आपल्या आज्ञेचं उल्लंघन करण्याचं पाप मी केलंय. हे पाप केल्यानं मी नरकात जाणार हे ही मला ठाऊक आहे. पण याबद्दल मला वाईट अजिबात वाटत नाहीय. ज्या ज्या लोकांच्या कानांवर हा मंत्र पडला त्या सगळ्यांनाच आता मोक्ष मिळेल.' रामानुजांनी दिलेली प्रांजळ कबूली ऐकून रागावलेल्या गुरुजींचं मन थंडावलं. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रु दाटले.
रामानुजाला छातीशी कवटाळत ते म्हणाले, 'तूच माझा खरा शिष्य आहेस. ज्याला संपूर्ण ् प्राणीमात्रांच्या कल्याणाची चिंता वाटते, तोच खरा धार्मिक.'
---

Thursday, May 10, 2012

मडक्याचा मोह तरी का बाळगा?

-संध्या पेडणेकर
बुखारातील शेख वाजिद अली एकदा आपला काफिला घेऊन प्रवासाला निघाले. त्यांच्या काफिल्यात जवळ जवळ हजारभर उंट होते. इतरही लवाजमा होता। सामान-सुमान होतं.
प्रवास करता करता ते एका अतिशय चिंचोळ्या मार्गावर पोहोचले. मार्ग एवढा चिंचोळा की एका वेळी फक्त एकच उंट त्या मार्गाने जाऊ शके. त्यामुळे त्यांच्या सगळ्या उंटांना एकामागे एक चालावं लागलं आणि उंटांची एक मोठ्ठी रांग तयार झाली. सगळ्यात पुढे असलेल्या उंटावर स्वतः शेख स्वार होते.
उंटांचा हा तांडा पुढे पुढे चालला होता आणि अचानक एक ऊंट मेला. पूर्ण रस्ता अडवून त्या उंटाचं कलेवर अशा रीतीनं पडलं की मागले उंट पुढे जाऊ शकत नव्हते आणि पुढले उंट मागे येऊ शकत नव्हते. शेखपर्यंत बातमी पोहोचली तसा तो मेलेल्या उंटाला काय झालं ते पाहायला आला. 
उंटाला पाहिलं आणि तो म्हणाला, 'हा मेला? याचे तर चारही पाय आहेत, पोट आहे, कान आहेत, शेपटीसुद्धा आहे!'
शेखसाहेबांना मृत्यूबद्दल माहिती नव्हती हे स्पष्टच होतं. सेवक त्यांना म्हणाला, 'हो, सगळं आहे खरं, पण त्याच्या आत असणारं जीवन संपलं.'
'म्हणजे आता हा उठून पुन्हा चालणारच नाही?' थोडंसं अविश्वासानं शेखनं विचारलं. 
सेवक म्हणाला, 'मालक, आता हा पुन्हा कधीही चालणार नाही. याचे प्राण उडाले. आता यानंतर त्याचं शरीर सडेल... आणि मरण फक्त उंटालाच येतं असंही नव्हे. मरण सगळ्यांनाच येतं.'
शेखनं विचारलं, 'मलाही मरण येईल?'
सेवक म्हणाला, 'हो.'
धक्का फार मोठा होता. त्यातून शेख सावरू शकला नाही. त्यानं आपल्यासोबतचं सगळं सामानं माघारी पाठवलं. मातीचं एक मडकं फक्त स्वतःजवळ ठेवलं. त्याच मडक्यात तो स्वतःचं जेवण शिजवत असे आणि झोपताना ते मडकं तो डोक्याखाली उशीसारखं घेत असे. 
एकदा एका कुत्र्याला त्या मडक्यात खाण्याचा वास आला आणि त्यानं त्यात तोंड घातलं. कुत्र्याचं तोंड मडक्यात अडकलं. काही केल्या बाहेर निघेना. बावचळलेला कुत्रा डोकं झटकत फिरू लागला आणि जवळच्या एका भिंतीवर मडक्यासह त्याचं डोकं आपटलं. मडक्यातून डोकं मुक्त झालं पण मडकं फुटलं. 
वाजिद अलींच्या मनात आलं, 'चला, आता यातूनही सुटलो. सगळ्या गोष्टींचा त्याग केला पण या मडक्याचा मोह काही सुटत नव्हता. ज्या शरीराला शेवटी दफनच करायचं त्यासाठी मडक्याचा मोह तरी का बाळगा?'
--- 

Tuesday, May 8, 2012

गुरुमहात्म्य


-संध्या पेडणेकर
एकदा कौटिल्यांकडे एक तरुण आला. कौटिल्यांना तो म्हणाला, आपण महान अर्थशास्त्री आहात असं ऐकून मी आलो. कृपया मला श्रीमंत व्हायचं आहे. मला यासाठी काही धडे द्या.
कौटिल्य त्याला म्हणाले, या जगात दोन प्रकारचे ज्ञान आहे– लौकिक आणि आध्यात्मिक. तुला ज्या प्रकारच्या ज्ञानाची गरज अहे त्या प्रकारचं ज्ञान मी तुला देईन. पण त्यासाठी तुला आधी एक परीक्षा द्यावी लागेल.  
परीक्षा देण्यासाठी तो तरुण तयार झाला. कौटिल्य त्याला म्हणाले, आसपासच्या रेतीतून पांढरा आणि काळा असे दोन प्रकारचे गोटे निवड आणि तुझ्या झोळीत ठेव. माझा एक शिष्य न पाहाता तुझ्या झोळीतून एक गोटा निवडेल आणि त्यावरून तुला कशाप्रकारच्या ज्ञानदानाची गरज आहे ते मी ठरवेन. त्याने जर पांढरा गोटा काढला तर मी तुला धन-संपत्ती कमावण्याबद्दलचं ज्ञान देईन आणि जर त्याच्या हाती काळा गोटा लागला तर तुला मी आध्यात्मिक ज्ञान देईन.
त्या तरुणानं लगेच खाली वाकून वाळूतून दोन गोटे निवडले आणि ते आपल्या झोळीत ठेवले. कौटिल्यांचं आणि त्यांच्या एका शिष्याचं त्या तरुणाकडे लक्ष होतं. त्यानं दोन्ही पांढरे गोटेच निवडले हे त्यांच्या लक्षात आलं. त्या तरुणाला धन कमवण्यातच रस आहे हे त्यांनी जाणलं.
ज्या शिष्यानं त्या तरुणाने निवडलेले गोटे पाहिले होते त्याला कौटिल्यांनी बोलावलं आणि त्या तरुणाच्या झोळीतून एक गोटा काढून आणण्यास सांगितलं. शिष्यानं त्या तरुणाच्या झोळीत हात घातला आणि एक गोटा हातात घेऊन मूठ बंद केली आणि हात बाहेर काढला. मूठ बंद ठेवूनच तो गुरुंच्या दिशेनं निघाला. पण चालता चालता त्याला ठेच लागली आणि तो पडला. त्याची मूठ उघडली आणि त्यातील गोटा वाळूत अदृश्य झाला. आता तो पुन्हा शोधणं शक्य नव्हतं.
तो तरुण घाबरला. त्याला वाटलं आता आपलं बिंग फुटणार.
पण कौटिल्य त्याला म्हणाले, घाबरू नकोस. आपण तुझ्या पिशवीतला गोटा काढून पाहू आणि माझ्या शिष्यानं उचललेला दुसरा गोटा कोणत्या रंगाचा होता ते ठरवू.
त्या तरुणाच्या झोळीतून पांढर्‍या रंगाचा गोटा निघाला. 
कौटिल्य म्हणाले, याचा अर्थ माझ्या शिष्यानं काळ्या रंगाचा गोटा उचलला होता, म्हणजे तुला आध्यात्मिक ज्ञानाची गरज आहे. ठीक आहे, आजपासून तू माझा शिष्य झालास.
त्या तरुणाच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. धावत जाऊन त्यानं कौटिल्यांचे पाय धरले. आपल्या हातून घडलेल्या चुकीबद्दल सांगितलं. माफी मागितली.
कौटिल्य त्याला म्हणाले,
आपल्या शिष्याला खरोखर कोणत्या गोष्टीची गरज आहे ते सच्चा गुरु जाणतो.

Saturday, May 5, 2012

स्वप्न, सत्य आणि न्याय

-संध्या पेडणेकर
चोमा नावाचा एक लाकूडफोड्या होता. एकदा लाकडं तोडण्यासाठी जंगलात गेला असता एक भयभीत हरण अचानक त्याच्यासमोर आलं. ते इतकं भेदरलेलं होतं की त्याची शिकार करण्यासाठी चोमाला फार कष्ट पडले नाहीत.
पण मग एक समस्या आली. लाकडांचा भारा आणि हरण एकदम नेणं चोमाला जमणार नव्हतं. थोडा वेळ विचार करून चोमानं ठरवलं की एरवीही हरणाकडे  लक्ष द्यायला आपल्याकडे संध्याकाळपर्यंत वेळ नाही, तेव्हा - आधी आपण बाजारात नेऊन  लाकडं विकू, मिळणार्‍या पैशांतून खरेदी आटोपून, खरेदी केलेल्या वस्तू घरी ठेवू आणि मग सावकाश येऊन हरण घरी नेऊ.
त्यानं मग पटपट एक खड्डा खोदला आणि त्यात हरण पुरलं.
ठरल्याप्रमाणे सगळी कामं आटोपून तो जेव्हा पुन्हा जंगलात आला तेव्हा मात्र त्याला त्यानं पुरलेलं हरण मिळालं नाही.
बरीच शोधाशोध केल्यानंतर आपण शिकार खरंच केली होती का, असा संशय चोमाच्या मनात निर्माण झाला. थोड्या वेळानं संशय पक्का झाला आणि हरण मिळालं नाही तेव्हा तो घरी परतला.
संध्याकाळच्या वेळी मित्र भेटले तेव्हा त्यानं त्या सगळ्यांसमोर आपल्याला झालेल्या भासाची गोष्ट सांगितली.
चोमाचा एक मित्र होता चानी. इतरांनी चोमानं सांगितलं ते खरं मानलं तरी चानीला मात्र चोमा जे सांगत होता ते पटलं नाही. त्याला वाटलं, चोमानं खरंच शिकार केली असावी आणि जमिनीत पुरलेलं हरण त्याला मिळालं नसावं.
रात्री चानी जंगलात गेला आणि त्यानं थोडी शोधोध केल्यावर त्याला चोमानं पुरलेलं हरण मिळालं.
घरी आणून त्यानं हरणाच्या मांसाचे तुकडे केले, त्याचं मांस आणि कातडं विकून चानीनं बक्कळ पैसा कमावला.
चोमाला जेव्हा हे समजलं तेव्हा तो चानीच्या घरी आला आणि त्यानं त्याच्याकडे आपला पैसा मागितला. हरणाची शिकार आपण केलेली असल्यानं त्या पैशांवर आपला अधिकार असल्याचं त्याचं म्हणणं होतं.
पण चानी त्याचं म्हणणं मान्य करायला तयार नव्हता.
त्याचं म्हणणं की, चोमानं प्रत्यक्षात शिकार केलीच नाही, शिकारीचं त्यानं फक्त स्वप्न पाहिलं. म्हणून हरणापासून मिळालेल्या पैशांवर त्याचा काहीही अधिकार नाही.
चोमानं गावच्या पंचायतीत तक्रार केली. पंचायत निवाडा करण्यासाठी बसली. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पंचांनी न्याय दिला,
"चोमानं शिकार केली पण आपण केलेल्या शिकारीला स्वप्न समजण्याची चूकही त्याच्याकडून झाली. हरणाच्या शिकारीचं स्वप्नच जर चोमानं पाहिलं होतं तर मग हरणाचं मांस आणि चामडं विकून मिळणार्‍या पैशांत त्याचा वाटा नाही. सत्य आणि स्वप्न यात गफलत केली चोमानं.
चानी हा चोमाचा मित्र. खरं तर त्यानं चोमाला त्याची चूक दाखवून देऊन हरण शोधण्यास मदत करावयास हवी होती, परंतु लोभापोटी त्यानं तसं न करता स्वतः हरण शोधून काढून ते परस्पर विकून पैसे गाठीला बांधले. ही चानीची चूक.
अशारीतीने, दोघांचीही चूक असल्याकारणानं हरणामुळे मिळालेल्या पैशांवर आता दोघांचाही हक्क रहाणार नाही. चानीने ते धन आणून पंचांच्या सुपूर्द करावं."
अशा रीतीनं चोमाच्या भाबडेपणामुळे आणि चानीच्या बेरकीपणामुळे त्या दोघांचंही नुकसान झालं.