Saturday, August 10, 2013

पहिल्यांदा करण्याचं महत्व

-संध्या पेडणेकर
अमेरिकेचा शोध लावल्यानंतर कोलंबस मायदेशी परतला. 
राणीनं त्याचं भव्य स्वागत केलं. 
राजदरबारात त्याच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रम आयोजित केला. 
काही दरबारी कोलंबसचे घोर विरोधक होते. त्यांना अर्थातच हे आवडलं नाही. 
समारंभ सुरू असताना त्यांच्यापैकी काही म्हणाले, 'कोलंबसने काही खास कामगिरी बजावलीय असं आम्हाला वाटत नाही. पृथ्वी गोल आहे. कुणीही जरी गेलं असतं तरी त्याला अमेरिका मिळाली असतीच.'
बराच वेळ कोलंबस त्यांचे टोमणे ऐकत राहिला.
शेवटी समोरच्या थाळीत खाण्यासाठी ठेवलेल्या उकडलेल्या अंड्यांपैकी एक अंडं उचललं आणि तो म्हणाला, 'आपल्यापैकी कुणी हे अंडं टेबलावर सरळ उभं करून दाखवू शकेल का?'
कोलंबसने विचारल्यावर त्याच्या सगळ्या विरोधकांनी अंडं टेबलावर सरळ उभं करणं एक आव्हान समजून स्वीकारलं. पटापट थाळीतील अंडी उचलून ते प्रयत्नाला लागले.
पण कुणालाही अंडं टेबलावर उभं करता येईना.
शेवटी ते म्हणाले, "अंडं टेबलावर सरळ उभं राहूच शकत नाही. "
हसतच कोलंबसनं एक अंडं उचललं आणि जोरात टेबलावर आपटलं. त्यामुळे अंड्याच्या बुडाकडचा भाग चेपला आणि अंडं सरळ उभं राहिलं.
कोलंबस म्हणाला, "पाहा, मी अंडं उभं केलं."
यावर सगळेच दरबारी गलका करत म्हणू लागले, 'तू अंडं चेपवलंस. असं तर कुणीही अंडं उभं करू शकेल.'
कोलंबस म्हणाला, "पण कुणी केलं का? एकदा कुणी करून दाखवल्यानंतर करणं सोपं असतं. पहिल्यांदा कोण करतं यालाच महत्व असतं."

Monday, August 5, 2013

श्रीमती रूथ

-संध्या पेडणेकर
खलील जिब्रान यांची आणखी एक कथा –
एकदा तिघे पुरुष भ्रमण करत निघाले असता त्यांना दूर टेकडीवर एक सुंदर महाल दिसला.
लगेच त्यापैकी एक म्हणाला,  तुम्हाला ठाऊक आहे का, त्या महालात श्रीमती रूथ रहाते. चेटकीण आहे ती.
दुसरा म्हणाला, ते घर श्रीमती रूथचंच आहे पण तिच्याबद्दल तुम्हाला मिळालेली माहिती चुकीची आहे बरं. अहो, ती चेटकीण नाही एक सुंदर स्त्री आहे. अगदी स्वप्नाळू... नेहमी आपल्या स्वप्नांत चूर असते ती.
तिसरा म्हणाला – सुंदर आहेच पण मी असंही ऐकलंय की ती खूप क्रूर, कठोर आणि पाषाणहृदयी आहे. ही आसपासची सगळी जमीन तिचीच आहे. या जमिनीवर राबणाऱ्या कुळांचं ती अक्षरशः रक्त शोषून घेते म्हणे.
बोलता बोलता ते गावात पोहोचले. 
समोरून एक म्हातारा येत असलेला त्यांना दिसला. 
त्याला यांनी विचारलं, काहो बाबा, त्या टेकडीवरल्या महालात कोणी श्रीमती रूथ रहाते तिच्याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का?”
म्हाताऱ्यानं तिघांकडे पाहिलं न् मग म्हणाला, हो, श्रीमती रूथ तिथे रहायच्या. म्हणजे, मी आता नव्वद वर्षांचा आहे. माझ्या लहानपणी मी त्यांच्याबद्दल बरंच ऐकलं होतं. पण मी साधारण दहाएक वर्षांचा असेन तेव्हाच त्या वारल्या. तेव्हापासून हा त्यांचा महाल अगदी ओसाड पडलाय. फक्त घुबडं घुमतात तिथे. काही लोक म्हणतात की तेथे भुतं रहातात.

Saturday, August 3, 2013

रोग जाणून उपचार करा

-संध्या पेडणेकर
एकच उपचार सगळ्यांवर लागू होत नसतो. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते आणि प्रकृतीनुसार केलेले उपचारच रोगापासून मुक्ती मिळवून देतात. प्रकृतीविरुद्ध केलेले उपचार घातक ठरण्याचीही शक्यता असते. आजी एक गोष्ट सांगायची -
गणेश नावाच्या एका व्यक्तीच्या पोटात एके दिवशी अचानक खूप दुखू लागलं. वेदना असह्य झाल्या तेव्हा तो गावच्या वैद्याकडे गेला. वैद्यानं त्याला तपासलं पण नेमकं काय झालंय हे काही त्याला कळलं नाही. त्यानं गणेशाला तसं सांगितलं. म्हणाला - 'माफ कर बाळा मला, पण तुझ्या पोटात नेमकं कशामुळे दुखतंय हे काही माझ्या लक्षात येत नाहीय. मी तुझ्यावर उपचार करू शकत नाही.'
आधीच गणेश पोटदुखीनं हैराण झालेला होता. वैद्यबुवा नेमके काय म्हणाले हे त्याच्या लक्षात आलं नाही. अनुमानानं त्यानं आपल्यापरीनं अर्थ लावला की आपल्याला झालेल्या दुखण्यावर उपचार नाहीत! दुःखी मनानं तो घरी परतला.
त्याला कांद्याचं लोणचं खूप आवडायचं. त्याला वाटलं, एवीतेवी आपण आता मरणारच आहोत, तर निदान पोटभर कांद्याचं लोणचं खाऊन तरी मरू. त्यानं लोणच्याची बरणी शेजारी ठेवली, वाडगाभर लोणचं काढून घेतलं आणि खायला सुरवात केली. हां हां म्हणता त्यानं  बायकोनं वर्षभरासाठी करून ठेवलेलं लोणचं फस्त केलं.
आश्चर्य म्हणजे, लोणचं खाता खाता त्याची पोटदुखी थांबली केव्हा त्याला कळलंसुद्धा नाही.
दोन-तीन दिवसांनी वैद्यबुवांना गणेशच्या पोटदुखीची आठवण आली. ते गणेशला भेटले. गणेशची तब्बेत उत्तम असून तो कामात गुंतलेला आहे हे पाहून वैद्यबुवांना बरं वाटलं. त्यांनी विचारलं तेव्हा गणेशानं त्यांना कांद्याच्या लोणच्याची महिमा सांगितली. वैद्यबुवांना वाटलं, म्हणजे कारण लक्षात न आलेल्या पोटदुखीवर कांद्याचं लोणचं हा उपचार ठरू शकतो.
काही दिवसांनी वैद्यबुवांकडे राजेश पोटदुखीची तक्रार घेऊन आला. वैद्यबुवांनी त्याला तपासलं पण रोगाचं निदान त्यांना करता आलं नाही. त्यांनी राजेशला सांगितलं, एक किलो कांद्याचं लोणचं खरेदी कर आणि खा.
राजेशनं कांद्याचं लोणचं खरेदी केलं आणि खायला घेतलं.
थोडं लोणचं खाल्लं आणि त्याला पोटदुखीची असह्य उबळ आली.
वैद्यबुवांवर राजेशचा पूर्ण विश्वास होता. पोटदुखी सहन करूनही तो लोणचं खात राहिला. आणखी थोडं लोणचं खाल्लं आणि त्याची पोटदुखी शिगेला पोहोचली. शेवटी तो पोटदुखीनं मेला.
---   ---   ---   ---   ---   ---   ---   ---