एकच उपचार सगळ्यांवर लागू होत नसतो. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते आणि प्रकृतीनुसार केलेले उपचारच रोगापासून मुक्ती मिळवून देतात. प्रकृतीविरुद्ध केलेले उपचार घातक ठरण्याचीही शक्यता असते. आजी एक गोष्ट सांगायची -
गणेश नावाच्या एका व्यक्तीच्या पोटात एके दिवशी अचानक खूप दुखू लागलं. वेदना असह्य झाल्या तेव्हा तो गावच्या वैद्याकडे गेला. वैद्यानं त्याला तपासलं पण नेमकं काय झालंय हे काही त्याला कळलं नाही. त्यानं गणेशाला तसं सांगितलं. म्हणाला - 'माफ कर बाळा मला, पण तुझ्या पोटात नेमकं कशामुळे दुखतंय हे काही माझ्या लक्षात येत नाहीय. मी तुझ्यावर उपचार करू शकत नाही.'
आधीच गणेश पोटदुखीनं हैराण झालेला होता. वैद्यबुवा नेमके काय म्हणाले हे त्याच्या लक्षात आलं नाही. अनुमानानं त्यानं आपल्यापरीनं अर्थ लावला की आपल्याला झालेल्या दुखण्यावर उपचार नाहीत! दुःखी मनानं तो घरी परतला.
त्याला कांद्याचं लोणचं खूप आवडायचं. त्याला वाटलं, एवीतेवी आपण आता मरणारच आहोत, तर निदान पोटभर कांद्याचं लोणचं खाऊन तरी मरू. त्यानं लोणच्याची बरणी शेजारी ठेवली, वाडगाभर लोणचं काढून घेतलं आणि खायला सुरवात केली. हां हां म्हणता त्यानं बायकोनं वर्षभरासाठी करून ठेवलेलं लोणचं फस्त केलं.
आश्चर्य म्हणजे, लोणचं खाता खाता त्याची पोटदुखी थांबली केव्हा त्याला कळलंसुद्धा नाही.
दोन-तीन दिवसांनी वैद्यबुवांना गणेशच्या पोटदुखीची आठवण आली. ते गणेशला भेटले. गणेशची तब्बेत उत्तम असून तो कामात गुंतलेला आहे हे पाहून वैद्यबुवांना बरं वाटलं. त्यांनी विचारलं तेव्हा गणेशानं त्यांना कांद्याच्या लोणच्याची महिमा सांगितली. वैद्यबुवांना वाटलं, म्हणजे कारण लक्षात न आलेल्या पोटदुखीवर कांद्याचं लोणचं हा उपचार ठरू शकतो.
काही दिवसांनी वैद्यबुवांकडे राजेश पोटदुखीची तक्रार घेऊन आला. वैद्यबुवांनी त्याला तपासलं पण रोगाचं निदान त्यांना करता आलं नाही. त्यांनी राजेशला सांगितलं, एक किलो कांद्याचं लोणचं खरेदी कर आणि खा.
राजेशनं कांद्याचं लोणचं खरेदी केलं आणि खायला घेतलं.
थोडं लोणचं खाल्लं आणि त्याला पोटदुखीची असह्य उबळ आली.
वैद्यबुवांवर राजेशचा पूर्ण विश्वास होता. पोटदुखी सहन करूनही तो लोणचं खात राहिला. आणखी थोडं लोणचं खाल्लं आणि त्याची पोटदुखी शिगेला पोहोचली. शेवटी तो पोटदुखीनं मेला.
--- --- --- --- --- --- --- ---
No comments:
Post a Comment