Friday, March 29, 2013

नहि सत्यात्परो धर्मः!


-संध्या पेडणेकर
एकदा बरेचसे ब्राह्मण तत्वज्ञानी गौतमाला भेटायला आले. गौतमाच्या शिष्यांनी आपल्या गुरूला सांगितले,'आपल्या भेटीच्या अपेक्षेने ब्रह्मवादी तत्वज्ञानी आलेले आहेत. त्यांनी एक नवीन तत्वज्ञान स्थापित केलेले आहे. आणि या तत्वज्ञानातील मुख्य देव म्हणजे ब्रह्म होय असे त्यांचे म्हणणे आहे.  गुरुजी, आपणाला याविषयी काय सांगावयाचे आहे ते जाणण्याची आम्हा सार्‍यांची इच्छा आहे.'
गौतमांनी यावर जे उत्तर दिलं ते अत्यंत विचारार्ह आहे असे मला वाटते. गौतमांनी या ब्रह्मवाद्यांना प्रश्न केला, 'तुम्ही ब्रह्म पाहिले आहे का?'
उत्तर मिळाले, 'नाही.'
गौतमांनी विचारले, 'तुम्ही ब्रह्माबरोबर भाषण केले आहे का?'
पुन्हा उत्तर होते, 'नाही.'
गौतमांचा पुढचा प्रश्न होता, 'तुम्ही ब्रह्माविषयी काही ऐकले तरी आहे का?'
त्यांचे उत्तर तेच होते, 'नाही.'
गौतमांनी विचारले, 'तुम्ही ब्रह्माची चव घेऊन पाहिली आहे का?'
उत्तर होते, 'नाही.'
यावर गौतम ब्रह्मवाद्यांन्या म्हणाले, 'तुमच्या पंचज्ञानेंद्रियांनी व पंचकर्मेंद्रियांनी ब्रह्म काय आहे हे अनुभवले नाही म्हणता तर मग ब्रह्म आहे हे तरी तुम्ही कशावरून म्हणता?' यावर ब्रह्मवाद्यांना काही उत्तर देता आले नाही.
डॉ बाबासाहब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड 18, भाग 3, 243.
वडाला, मुंबई येथील सिद्धार्थ कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षिक समारंभ प्रसंगी दिलेल्या वक्तव्यातून.

No comments: