Wednesday, February 29, 2012

सत्कर्म टाळू नका

-संध्या पेडणेकर
एकदा एक याचक युधिष्ठिराकडे आला. त्यावेळी युधिष्ठिर कामात गुंतला होता. वेळ नसल्याचं सांगून त्याने याचकाला दुसर्‍या दिवशी येण्याची विनंती केली. दुसर्‍या दिवशी आल्यावर त्याला जे हवं ते दिलं जाईल असं आश्वासनही युधिष्ठिरानं त्या याचकाला दिलं. याचक निघून गेला. भीम जवळच बसला होता. युधिष्ठिर आणि याचकामध्ये झालेलं बोलणं त्यानं ऐकलं. अशा रीतीनं याचकाला परत पाठवणं त्याला पटेना.

भीम उठून प्रवेशद्वारापाशी गेला. तेथील सेवकांना त्यानं मंगलवाद्ये वाजविण्याची आज्ञा दिली.  प्रवेशद्वारापाशी अडकवलेली दुंदुभी उतरवून तो स्वतःही ती वाजवू लागला.
अचानक मंगलवाद्यांचा स्वर कानी पडताच युधिष्ठिर चक्रावला. त्यानं विचारणा केली, 'आज अचानक मंगलवाद्ये का वाजताहेत? काही विशेष आनंदाची बातमी आहे का?' भीमाने दिलेल्या आदेशानुसार मंगलवाद्ये वाजत आहेत हे एका सेवकाकडून त्याला समजलं.
धर्मराजानं मग भीमाला बोलावलं.  मंगलवाद्ये वाजविण्याचं कारण त्याला विचारलं. भीम म्हणाला, 'दादा, आपण काळावर विजय मिळविलात, याहून महत्कार्य ते काय असणार?'
युधिष्ठिरानं आश्चर्यानं विचारलं, 'मी काळावर विजय मिळविला? कधी? कुठे? कसा? तुझं बोलणं माझ्या लक्षात येत नाहीय!'
भीम म्हणाला, 'आपण कधीही खोटं बोलत नाही हे अवघ्या जगाला माहीत आहे. दाराशी आलेल्या याचकाला आपण उद्या दान देण्याचं आश्वासन दिलं. याचा अर्थ आपण निदान उद्यापर्यंत तरी काळावर मात केलीय असा होत नाही का?'
भीमाचं बोलणं ऐकून युधिष्ठिराला आपली चूक उमगली. तो भीमाला म्हणाला, 'खरंय तुझं, सत्कर्म करणं कधीही टाळू नये. तू त्या याचकाला परत बोलावून आण.'
---

Sunday, February 26, 2012

दोन पैशांचा चमत्कार

-संध्या पेडणेकर
बरीच वर्षे परिश्रम करून एक माणूस पाण्यावर चालायला शिकला. दूरवर त्याची ख्याती पसरली. पाण्यावर चालणारा योगी म्हणून लोक त्याला ओळखू लागले, त्याला मान देऊ लागले.
एकदा तो माणूस रामकृष्ण परमहंसांना भेटायला गेला. आपला चमत्कार दाखवून त्यांना हिणवायचा त्याचा विचार होता. मनात त्यानं स्वतःशी कित्येक वेळा संवाद म्हटले होते, - 'तुम्ही कसचे परमहंस, मी अस्सल परमहंस आहे! मी पाण्यावरसुद्धा चालू शकतो.'
त्यादरम्यान परहंसांचा मुक्काम नदीकिनारी दक्षिणेश्वराजवळ  होता. भेट झाली तेव्हा योगी त्यांना म्हणाला, 'चला गंगेजवळ, मी तिथेच तुम्हाला माझा चमत्कार दाखवतो.'
रामकृष्णांनी त्याला विचारलं, 'काय चमत्कार आहे तुझा?' तो म्हणाला, 'मी पाण्यावर चालू शकतो.'
रामकृष्ण म्हणाले, 'हे अजबच आहे. इतरांसारखा पोहायला का बरं शिकला नाहीस तू? पाण्यावर तरंगणं शिकायला तुला किती वर्षं लागली?' तो म्हणाला, 'तब्बल वीस वर्षे लागली.'
रामकृष्ण त्याला म्हणाले, 'हद्द आहे तुझी. वीस वर्षे फुकट घालवलीस तू. अरे, मला जेव्हा पैलतीरावर जायचं असतं तेव्हा मी नावाड्याला दोन पैसे देतो. दोन पैशात तो मला आपल्या नावेत बसवून पैलतीरावर सोडतो. दोन पैशांच्या सोयीसाठी तू आपल्या आयुष्याची वीस वर्षे वाया घालवलीस? शिवाय, आपल्याला दररोज पैलतीरावर जावंच लागतं असंही नाही. वीस वर्षात मी जास्तीत जास्त दहा-पंधरा वेळा पैलतीरावर गेलो असेन. चार-सहा आणे किंमतीचं कौशल्य तू मला महान चमत्कार म्हणून दाखवायला आला आहेस? कमाल आहे तुझी.'
घमेंड उतरल्यानं खजील झालेल्या त्या योग्यानं परमहंसांचे पाय धरले. क्षमा मागितली. त्याच्या अहंकाराचा मुखवटा गळून पडला.
---

Wednesday, February 22, 2012

द्रौपदीला हसू का आलं?

-संध्या पेडणेकरमहाभारताचं युद्ध संपल्यानंतरची ही कथा आहे.
धर्मराज युधिष्ठिर एकछत्री सम्राट झाले.  युद्धभूमीतील शरशय्येवर पडून भीष्म सूर्याच्या उत्तरायणात प्रवेश करण्याची वाट पाहात होते. श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार युधिष्ठिर, द्रौपदी आणि आपल्या भावांसह पितामह भीष्मांकडून उपदेश ग्रहण करण्यासाठी युद्धभूमीवर आले होते. युधिष्ठिरांनी पितामहांना वर्णाश्रम, राजा-प्रजा, धर्म इ. बद्दल प्रश्न विचारले.
भीष्म युधिष्ठिराला धर्माबद्दल उपदेश देत होते तेव्हा द्रौपदीला अचानक हसू आलं. तेव्हा पितामह भीष्म यांनी द्रौपदीला विचारलं, 'पोरी, तू का हसलीस?'
 द्रौपदी संकोचून म्हणाली, 'चूक झाली पितामह, क्षमा करा.'
द्रौपदीच्या क्षमा मागण्यानं भीष्मांचं समाधान झालं नाही. ते द्रौपदीला म्हणाले, 'तुझ्या हसण्यामागे काहीतरी कारण आहे हे निश्चित. संकोचू नको, स्पष्ट सांग.'
द्रौपदीनं हात जोडून भीष्मांना वंदन केलं. म्हणाली, 'आपला आग्रह मी टाळू शकत नाही. आपण धर्मोपदेश देत होता तेव्हा माझ्या मनात एक विचार आला. वाटलं, आज आपण धर्माची उत्तम व्याख्या करता. धर्म समजावून सांगताय. पण दुर्योधनाच्या सभेत जेव्हा दुःशासन मला निर्वस्त्र करत होता तेव्हा धर्माबद्दलचं हे तुमचं ज्ञान कुठे गेलं होतं? हा विचार मनात आला आणि मला हसू आलं. क्षमा करा मला.'
द्रौपदीचं बोलणं ऐकून भीष्म म्हणाले, 'यात क्षमा मागण्यासारखं काहीही नाही. त्यावेळीसुद्धा माझ्याजवळ धर्माचं ज्ञान होतं. पण अन्यायी दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे माझी बुद्धि कुंद पडली होती. म्हणूनच त्यावेळी मी योग्य निर्णय करू शकलो नाही. अर्जुनाचा बाण लागला आणि माझ्या शरीरातील सगळं दूषित रक्त वाहून गेलं. बुद्धी झळझळीत शुद्ध झाली. धर्माचं योग्य विवेचन करणं त्यामुळेच मला शक्य होत आहे.'
--- 

Saturday, February 18, 2012

बुखारा आणि समरकंदची कुरवंडी केलीच कशी!

bicycle2011.com/
why-was-timur-lang-notorious/
-संध्या पेडणेकर
 प्रसिद्ध सूफी संत हाफीज कवीही होते. त्यांनी एक गीत लिहिलंय. आपल्या या गीतात ते म्हणतात, 'तुझ्या हनुवटीवर जो तीळ आहेत त्यावर मी बुखारा आणि समरकंदही कुरवंडून टाकेन.' बुखारा आणि समरकंद प्रेयसीच्या हनुवटीवरील तिळावर ओवाळून टाकायची इच्छा त्यांनी व्यक्त केली पण ते तैमूरलंगला आवडलं नाही. कारण तैमूरलंग बुखारा आणि समरकंदचा बादशहा होता. हाफीजचं गीत ऐकल्यावर त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो म्हणाला, 'बुखारा आणि समरकंदचा सर्वेसर्वा आहे मी. हा कोण उपटसुंभ आला त्यांची कुरवंडी करणारा?' हाफीजना अटक करून आणण्याची त्यानं आपल्या सैनिकांना आज्ञा केली.
त्याच्या हुकुमानुसार हाफीजना दरबारात हजर कऱण्यात आलं. तैमूरलंग हाफीजना म्हणाला, 'बुखारा आणि समरकंद कुरवंडून टाकण्याएवढा कोणत्याही स्त्रीच्या हनुवटीवरील तीळ महान नसतो. दुसरी गोष्ट, बुखारा आणि समरकंद तुझ्या बापाची जहागीर आहे का? चालला कुणा स्त्रीच्या हनुवटीवर खुशाल त्यांची कुरवंडी करायला! मी जिवंत आहे अजून. मला विचारल्याशिवाय तू ही कविता लिहीलीसच कशी?'
तैमूरलंगचा अहंकार आणि मूर्खपणा पाहून हाफीजना हसू आलं. तैमूरलंगला ते म्हणाले, 'ऐक तैमूरलंगा! मी जिच्या हनुवटीवरच्या तिळाचा उल्लेख केलाय, बुखारा आणि समरकंदसुद्धा त्याचेच आहेत. तू उगीच का मध्ये  पडतोस? तू आज आहेस, उद्या कदाचित नसशीलही. ज्याची वस्तू त्याला परत केली तर काय बिघडणार आहे?'
सूफी कवी परमेश्वराला प्रेयसी मानतात. त्यानुसार हाफीजनी प्रेयसीच्या मिषानं ईश्वरालाच आळवलं होतं.
हाफीज पुढे तैमूरलंगला म्हणाला, 'मी गरीब फकीर आहे पण माझं मन पाहा किती विशाल आहे! माझ्या झोळीत काहीही नसताना मी बुखारा आणि समरकंद दिले. तुझ्याजवळ सर्व काही आहे, पण तू किती कृपण आहेस पाहा!' खरं तर, चंगेज खानचा वंशज असलेला तैमूर हाफीजचं बोलणं ऐकून त्यांचा शिरच्छेदच करणार असं लोकांना वाटलं होतं. हसणं सोडा, तैमूरलंगला कधी कुणी स्मितहास्य करतानाही पाहिलेलं नव्हतं. पण घडलं उलट. हाफीजचं बोलणं ऐकून तैमूर खळाळून हसला.
---

Wednesday, February 15, 2012

थोडं आइस्क्रीम.. आत्म्यासाठी!

-संध्या पेडणेकर
एकदा एक बाबा आपल्या छोट्याला घेऊन हॉटेलात जेवायला गेले. रोज घरी जेवणाला सुरवात करण्याआधी  त्याला 'वदनी कवळ घेता...' म्हणायची सवय होती. हॉटेलात जेवण समोर आलं तेव्हा त्यानं बाबाला विचारलं, 'बाबा, प्रार्थना म्हणू?' क्षणभरातच सावरून हात जोडत बाबा म्हणाला, 'जरूर बाळा.'
प्रार्थना करून झाल्यावर जोडलेले हात कपाळाशी नेत छोट्या म्हणाला, '...देवा, आज जेवणानंतर मला आइस्क्रीम हवं. देशील ना? मी पुन्हा एकदा तुला धन्यवाद देईन.' त्याचं निरागस बोलणं ऐकून हॉटेलातील मंडळी हसू लागली. एक बाई आपलं थोरपण मिरवत म्हणाल्या, 'आजकालची मुलं ही अशीच. त्यांना नीट प्रार्थनाही करता येत नाही. देवाकडे आइस्क्रीम मागणं म्हणजे हद्द झाली बाई. मी नव्हती कधी मागितली!'
ऐकलं आणि त्या छोट्याच्या डोळ्यात पाणी आलं. वडिलांनी त्याला लगेच कडेवर घेतलं तेव्हा तो रडवेल्या सुरात म्हणाला, 'बाबा, चूक झाली ना? आइस्क्रीम मागायला नको होती. आता देव रागावेल माझ्यावर...' बाबाला काय बोलावं सुचेना
त्यांच्या शेजारच्या टेबलावर एक म्हातारे गृहस्थ बसले होते. ते उठून मुलाजवळ आले. म्हणाले, 'माझी देवाशी ओळख आहे. तो म्हणाला, तू खूप छान प्रार्थना केलीस. तुला तो  नक्की आइस्क्रीम देणार.' मग छोट्याच्या कानाजवळ तोंड नेऊन ते कुजबुजत म्हणाले, 'त्या बाइंनी देवाजवळ कधी आइस्क्रीम मागितली नाही हे बरं नाही केलं, अधून मधून थोडं आईसक्रीम आत्म्याला सुखी करतं.'  किंचित अविश्वासानं त्यांच्याकडे पाहात छोट्या उद्गारला, 'खरंच?' आजोबा म्हणाले, 'अगदी खरं, शप्पथ!' छोट्या निवळला.
जेवण झाल्यावर बाबांनी त्याच्यासाठी आइस्क्रीम मागवलं. पण त्यानंतर जे त्या मुलानं केलं ते खरोखर अनपेक्षित होतं. त्यानं आइस्क्रीमची प्लेट त्या बाईंसमोर नेऊन ठेवली. मग हसत तो त्यांना म्हणाला, 'अधून मधून थोडं आईसक्रीम आत्म्याला सुखी करतं असं आजोबा म्हणाले. मी बाबांच्या प्लेटमधून खाईन. हे तुम्ही खा कारण तुम्ही देवाकडे आइस्क्रीम मागत नाही ना!'
----

Saturday, February 11, 2012

गुरूविना कोण दाखविल वाट...

-संध्या पेडणेकर
एकदा एका गुराख्याला रानात सिंहाचा एक चुकार छावा मिळाला. तो खूप लहान होता आणि अगदी गोंडस दिसत होता. गुराख्याला तो इतका आवडला की तो त्याला घेऊन घरी आला. आपल्या शेळ्यांबरोबर त्यानं त्याचंही संगोपन करायचं असं ठरवलं.
हळूहळू सिंहाचा तो छावा मोठा झाला. त्याच्या जाणिवा जाग्या झाल्या, त्याला जेव्हा समज आली तेव्हा त्याच्या आसपास  शेळ्या-मेंढ्यांचाच  वावर होता. आपणही त्यांच्यापैकीच एक आहोत अशी त्याची समजूत झाली. त्यांच्या सगळ्या सवयी त्यानं आत्मसात केल्या. त्यांच्या घोळक्यात तो एकमेकांना खेटत चालायचा. बें-बें करत बोलायचा. इतकंच नव्हे तर शेळ्यांचा स्थायीभावही त्यानं उचलला - तोसुद्धा घाबरट बनला. कुठे काही खुट्ट झालं की कळपासोबत तोही भेदरून जायचा.
एके दिवशी एका सिंहानं या कळपावर हल्ला केला. कळप सैरावैरा धावू लागला. हल्ला करणारा सिंह मात्र अवाक् होऊन उभा राहिला. शेळ्या-मेंढ्यांच्या त्या कळपासोबत एक सिंहही जीव मुठीत घेऊन धावतोय यावर त्याचा क्षणभर विश्वासच बसेना. आपल्याला शिकार करायचीय हे तो विसरून गेला. झडप टाकून शेळ्यांबरोबर धावणार्‍या सिंहाला त्यानं पकडलं. बकर्‍यांसारखाच गायावाया करत कळपातला सिंह जंगलातल्या सिंहाला म्हणाला, 'जाऊ दे रे मला, माझे सगळे साथीदार चाललेयत...'
सिंहानं त्याच्या मानेवरची पकड आणखी आवळली. म्हणाला, 'अरे नालायका, हे तुझे साथीदार आहेत का रे?' पण  भीतीमुळे प्राण कंठाशी आलेला कळपातील सिंह काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. जीव वाचवून धूम ठोकण्याची त्याला अगदी घाई झाली होती. प्रयत्नांची पराकाष्ठा करून जंगलातल्या सिंहानं कळपातल्या  अवाढव्य वाढलेल्या त्या सिंहाचं धूड खेचत नदीकाठावर आणलं. नदीच्या पाण्यात त्यानं त्याला  दोघांमधलं साम्य दाखवलं.
http://www.google.co.in/imgres?q=free+downloadable+roaring+lion&hl=en&biw=1600&bih=742&tbm=isch&tbnid=Gk23NTJnc3TtaM:&imgrefurl=http://leadershipfreak.wordpress.com/category/v
alues-mission-vision/&docid=FuGy-IG1lQqxpM&imgurl=http://leadershipfreak.files.wordpress.com/2011/10/roaring-lion.jpg%253Fw%253D450%2526h%253D297&w=450&h=297&ei=zlE2T6KE
J6Wl4gSHo_SaDA&zoom=1
क्षणभर कळपातला सिंह गोंधळला. पण आपलं खरं स्वरूप ओळखायला त्याला वेळ लागला नाही. आपणही सिंहच आहोत याची त्याला जाणीव झाली. आपण शेळी नाही न् मेंढीही नाही याबद्दल खात्री पटायला मग फारसा वेळ लागला नाही. ज्या क्षणी आपणही सिंह आहोत याची त्याला जाणीव झाली त्या क्षणी त्याच्या तोंडून अशी डरकाळी फुटली की आसपासचे सारे डोंगर आणि झाडे दणाणली. त्याची डरकाळी ऐकून जंगलातल्या सिंहाच्या तोंडूनही आश्चर्योद्गार निघाला - 'बापरे!' जागा झालेला सिंह त्याला म्हणाला, 'जन्मल्यापासून डरकाळी फोडली नव्हती. आपण मला जागं केलीत ही आपली मोठी कृपा.'

Monday, February 6, 2012

एकनाथांची आस्तिकता

-संध्या पेडणेकर
एकदा एक नास्तिक माणूस एकनाथांना भेटायला आला. त्याच्या मनात बर्‍याच शंका होत्या. आपल्या मगदुराप्रमाणे विद्वान शोधून त्यांना आपले प्रश्न विचारून त्यांच्याकडून उत्तरं मिळवण्याचा त्यानं प्रयत्न केला होता. पण त्यांच्यापैकी कुणीही दिलेली उत्तरं त्याला समाधानकारक वाटली नव्हती. कुणी त्याला सांगितलं की फक्त एकनाथच काय ते तुझ्या शंकांचं निरसन करू शकतील. म्हणून मग तो एकनाथांना भेटायला आला होता.

तो गावात पोचला तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते.  त्यानं गावकर्‍यांकडे एकनाथांबद्दल चवकशी केली. गावकरी म्हणाले की एकनाथ नदीकिनार्‍यावरच्या एखाद्या मंदिरात झोपलेला असेल. तो माणूस थोडा गडबडला. 'आपण चुकीच्या ठिकाणी तर पोहोचलो नाहीय ना?' - अशी शंका त्याच्या मनात डोकावली. साधू-संत ब्राह्म मुहूर्तावर उठतात असं तो ऐकून होता. पण इलाज नव्हता. त्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची होती. तो एकनाथांना शोधण्यासाठी नदीकिनारी पोहोचला. शेवटी, किनार्‍याजवळच्या एका शंकराच्या मंदिरात त्याला एकनाथ दिसले.

एकनाथ अजून झोपलेले होते. आपले दोन्ही पाय त्यांनी शंकराच्या पिंडीवर टेकवले होते. त्यांना असं झोपलेलं पाहून तो माणूस चरकला. त्याला वाटलं, आपण नास्तिक जरी असलो तरी शंकराच्या पिंडीवर पाय टाकून झोपणं काही आपल्याला जमणार नाही. अशा अवलियाला जागं करण्याचा धीर काही त्याला झाला नाही. म्हणून मग तो त्यांच्या जागे होण्याची वाट पाहात तिथेच बसून राहिला. त्याच्या मनात विचारांचं चक्र सुरूच होतं. त्याला वाटलं की, शंकर नाही हे तर खरंच, पण म्हणून त्याच्या पिंडीवर असं खुशाल पाय पसरून झोपणं म्हणजे जरा अतीच झालं. समजा शंकर असलाच तर?

तासाभरानं एकनाथांना जाग आली. झटकन् पुढे होत तो माणूस त्यांना म्हणाला, 'आपणास ज्ञानाच्या चार गोष्टी विचाराव्या म्हणून मी आलो होतो. पण आधी मला एक सांगा, ही काय उठायची वेळ झाली? साधू-संत तर प्रभातसमयी, सूर्योदयापूर्वी उठतात.' एकनाथ त्याला म्हणाले, 'साधू संत ज्यावेळी उठतात तोच ब्राह्ममुहूर्त असतो. आम्ही न झोपतो, न जागे होतो. ब्रह्माला जेव्हा नीज येते तेव्हा तो झोपतो आणि जाग आली की जागा होतो.' तो माणूस म्हणाला, 'कमाल आहे. अहो मी तुम्हाला ब्रह्म आहे का हे विचारायला आलोय. अन् तुम्ही तर - मीच ब्रह्म आहे असं म्हणताय.' यावर एकनाथ त्याला म्हणाले, 'फक्त मीच ब्रह्म आहे असं नव्हे. तू सुद्धा ब्रह्म आहेस. फरक फक्त एव्हढाच की, आपण ब्रह्म आहोत याची तुला जाणीव नाहीय न् मला ते ठाऊक आहे.'

तो माणूस वैतागला. म्हणाला, 'चलतो मी. थोडं ज्ञान मिळेल या आशेनं आलो होतो. पण तुम्ही माझ्याहून थोर नास्तिक आहात असं दिसतंय.'

एकनाथ म्हणाले,'जायचं तर जा बापडा. पण जेवणाची वेळ झालीय. उन्हं पण चढली आहेत. मी स्वैपाक करतो. खा न् मग जा.'

एकनाथांनी स्वैपाक केला. तूप आणि पोळ्यांचा बेत होता. दोघे जेवायला बसले. तेवढ्यात कुत्र्याने एक पोळी पळवली. हातात तुपाची वाटी घेऊन एकनाथ त्याच्या मागे धावले. उत्सुकतेपोटी तो माणूसही मागे धावू लागला. बरंच अंतर धावल्यानंतर कुत्रा एकनाथांच्या हाती आला. एकनाथांनी त्याच्या तोंडातून पोळी काढली. म्हणाले, 'रामा, तुपाशिवाय पोळी खाणं मला आवडत नाही म्हणजे तुलाही आवडत नसावं. रोज सांगतो की तूप लावल्यानंतर पोळी खा, पण मला पळवल्याशिवाय तुला चैन पडत नाही.' बोलता बोलता एकनाथांनी कुत्र्याच्या तोंडातून काढलेली पोळी तुपाच्या वाटीत बुचकळली आणि कुत्र्यास भरवली.

हे सर्व पाहून तो माणूस थक्क झाला. शंकराच्या पिंडीवर पाय टाकून बसण्याचं धाडस एकनाथामध्ये कुठून आलं हे आत्ता त्याला कळालं. जो कुत्र्याला राम मानू शकतो तो शंकराच्या पिंडीवर पाय टाकून झोपू शकतो. भक्तीरसात भिजलेल्या मनाला दोन्ही सारखेच वाटतात हे त्यानं प्रत्यक्ष पाहिलं, त्याला पटलं. एकनाथांपुढे तो नतमस्तक झाला.
---