bicycle2011.com/ why-was-timur-lang-notorious/ |
प्रसिद्ध सूफी संत हाफीज कवीही होते. त्यांनी एक गीत लिहिलंय. आपल्या या गीतात ते म्हणतात, 'तुझ्या हनुवटीवर जो तीळ आहेत त्यावर मी बुखारा आणि समरकंदही कुरवंडून टाकेन.' बुखारा आणि समरकंद प्रेयसीच्या हनुवटीवरील तिळावर ओवाळून टाकायची इच्छा त्यांनी व्यक्त केली पण ते तैमूरलंगला आवडलं नाही. कारण तैमूरलंग बुखारा आणि समरकंदचा बादशहा होता. हाफीजचं गीत ऐकल्यावर त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो म्हणाला, 'बुखारा आणि समरकंदचा सर्वेसर्वा आहे मी. हा कोण उपटसुंभ आला त्यांची कुरवंडी करणारा?' हाफीजना अटक करून आणण्याची त्यानं आपल्या सैनिकांना आज्ञा केली.
त्याच्या हुकुमानुसार हाफीजना दरबारात हजर कऱण्यात आलं. तैमूरलंग हाफीजना म्हणाला, 'बुखारा आणि समरकंद कुरवंडून टाकण्याएवढा कोणत्याही स्त्रीच्या हनुवटीवरील तीळ महान नसतो. दुसरी गोष्ट, बुखारा आणि समरकंद तुझ्या बापाची जहागीर आहे का? चालला कुणा स्त्रीच्या हनुवटीवर खुशाल त्यांची कुरवंडी करायला! मी जिवंत आहे अजून. मला विचारल्याशिवाय तू ही कविता लिहीलीसच कशी?'
तैमूरलंगचा अहंकार आणि मूर्खपणा पाहून हाफीजना हसू आलं. तैमूरलंगला ते म्हणाले, 'ऐक तैमूरलंगा! मी जिच्या हनुवटीवरच्या तिळाचा उल्लेख केलाय, बुखारा आणि समरकंदसुद्धा त्याचेच आहेत. तू उगीच का मध्ये पडतोस? तू आज आहेस, उद्या कदाचित नसशीलही. ज्याची वस्तू त्याला परत केली तर काय बिघडणार आहे?'
सूफी कवी परमेश्वराला प्रेयसी मानतात. त्यानुसार हाफीजनी प्रेयसीच्या मिषानं ईश्वरालाच आळवलं होतं.
हाफीज पुढे तैमूरलंगला म्हणाला, 'मी गरीब फकीर आहे पण माझं मन पाहा किती विशाल आहे! माझ्या झोळीत काहीही नसताना मी बुखारा आणि समरकंद दिले. तुझ्याजवळ सर्व काही आहे, पण तू किती कृपण आहेस पाहा!' खरं तर, चंगेज खानचा वंशज असलेला तैमूर हाफीजचं बोलणं ऐकून त्यांचा शिरच्छेदच करणार असं लोकांना वाटलं होतं. हसणं सोडा, तैमूरलंगला कधी कुणी स्मितहास्य करतानाही पाहिलेलं नव्हतं. पण घडलं उलट. हाफीजचं बोलणं ऐकून तैमूर खळाळून हसला.
---
2 comments:
क्या बात है!
हाफिज आणि तैमुरलंग ह्यांची हि कथा खरच उद्बोधक आहे.
थँक्स, श्रिया.
Post a Comment