एकदा एक नास्तिक माणूस एकनाथांना भेटायला आला. त्याच्या मनात बर्याच शंका होत्या. आपल्या मगदुराप्रमाणे विद्वान शोधून त्यांना आपले प्रश्न विचारून त्यांच्याकडून उत्तरं मिळवण्याचा त्यानं प्रयत्न केला होता. पण त्यांच्यापैकी कुणीही दिलेली उत्तरं त्याला समाधानकारक वाटली नव्हती. कुणी त्याला सांगितलं की फक्त एकनाथच काय ते तुझ्या शंकांचं निरसन करू शकतील. म्हणून मग तो एकनाथांना भेटायला आला होता.
तो गावात पोचला तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. त्यानं गावकर्यांकडे एकनाथांबद्दल चवकशी केली. गावकरी म्हणाले की एकनाथ नदीकिनार्यावरच्या एखाद्या मंदिरात झोपलेला असेल. तो माणूस थोडा गडबडला. 'आपण चुकीच्या ठिकाणी तर पोहोचलो नाहीय ना?' - अशी शंका त्याच्या मनात डोकावली. साधू-संत ब्राह्म मुहूर्तावर उठतात असं तो ऐकून होता. पण इलाज नव्हता. त्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची होती. तो एकनाथांना शोधण्यासाठी नदीकिनारी पोहोचला. शेवटी, किनार्याजवळच्या एका शंकराच्या मंदिरात त्याला एकनाथ दिसले.
एकनाथ अजून झोपलेले होते. आपले दोन्ही पाय त्यांनी शंकराच्या पिंडीवर टेकवले होते. त्यांना असं झोपलेलं पाहून तो माणूस चरकला. त्याला वाटलं, आपण नास्तिक जरी असलो तरी शंकराच्या पिंडीवर पाय टाकून झोपणं काही आपल्याला जमणार नाही. अशा अवलियाला जागं करण्याचा धीर काही त्याला झाला नाही. म्हणून मग तो त्यांच्या जागे होण्याची वाट पाहात तिथेच बसून राहिला. त्याच्या मनात विचारांचं चक्र सुरूच होतं. त्याला वाटलं की, शंकर नाही हे तर खरंच, पण म्हणून त्याच्या पिंडीवर असं खुशाल पाय पसरून झोपणं म्हणजे जरा अतीच झालं. समजा शंकर असलाच तर?
तासाभरानं एकनाथांना जाग आली. झटकन् पुढे होत तो माणूस त्यांना म्हणाला, 'आपणास ज्ञानाच्या चार गोष्टी विचाराव्या म्हणून मी आलो होतो. पण आधी मला एक सांगा, ही काय उठायची वेळ झाली? साधू-संत तर प्रभातसमयी, सूर्योदयापूर्वी उठतात.' एकनाथ त्याला म्हणाले, 'साधू संत ज्यावेळी उठतात तोच ब्राह्ममुहूर्त असतो. आम्ही न झोपतो, न जागे होतो. ब्रह्माला जेव्हा नीज येते तेव्हा तो झोपतो आणि जाग आली की जागा होतो.' तो माणूस म्हणाला, 'कमाल आहे. अहो मी तुम्हाला ब्रह्म आहे का हे विचारायला आलोय. अन् तुम्ही तर - मीच ब्रह्म आहे असं म्हणताय.' यावर एकनाथ त्याला म्हणाले, 'फक्त मीच ब्रह्म आहे असं नव्हे. तू सुद्धा ब्रह्म आहेस. फरक फक्त एव्हढाच की, आपण ब्रह्म आहोत याची तुला जाणीव नाहीय न् मला ते ठाऊक आहे.'
तो माणूस वैतागला. म्हणाला, 'चलतो मी. थोडं ज्ञान मिळेल या आशेनं आलो होतो. पण तुम्ही माझ्याहून थोर नास्तिक आहात असं दिसतंय.'
एकनाथ म्हणाले,'जायचं तर जा बापडा. पण जेवणाची वेळ झालीय. उन्हं पण चढली आहेत. मी स्वैपाक करतो. खा न् मग जा.'
एकनाथांनी स्वैपाक केला. तूप आणि पोळ्यांचा बेत होता. दोघे जेवायला बसले. तेवढ्यात कुत्र्याने एक पोळी पळवली. हातात तुपाची वाटी घेऊन एकनाथ त्याच्या मागे धावले. उत्सुकतेपोटी तो माणूसही मागे धावू लागला. बरंच अंतर धावल्यानंतर कुत्रा एकनाथांच्या हाती आला. एकनाथांनी त्याच्या तोंडातून पोळी काढली. म्हणाले, 'रामा, तुपाशिवाय पोळी खाणं मला आवडत नाही म्हणजे तुलाही आवडत नसावं. रोज सांगतो की तूप लावल्यानंतर पोळी खा, पण मला पळवल्याशिवाय तुला चैन पडत नाही.' बोलता बोलता एकनाथांनी कुत्र्याच्या तोंडातून काढलेली पोळी तुपाच्या वाटीत बुचकळली आणि कुत्र्यास भरवली.
हे सर्व पाहून तो माणूस थक्क झाला. शंकराच्या पिंडीवर पाय टाकून बसण्याचं धाडस एकनाथामध्ये कुठून आलं हे आत्ता त्याला कळालं. जो कुत्र्याला राम मानू शकतो तो शंकराच्या पिंडीवर पाय टाकून झोपू शकतो. भक्तीरसात भिजलेल्या मनाला दोन्ही सारखेच वाटतात हे त्यानं प्रत्यक्ष पाहिलं, त्याला पटलं. एकनाथांपुढे तो नतमस्तक झाला.
---
No comments:
Post a Comment