Wednesday, February 22, 2012

द्रौपदीला हसू का आलं?

-संध्या पेडणेकरमहाभारताचं युद्ध संपल्यानंतरची ही कथा आहे.
धर्मराज युधिष्ठिर एकछत्री सम्राट झाले.  युद्धभूमीतील शरशय्येवर पडून भीष्म सूर्याच्या उत्तरायणात प्रवेश करण्याची वाट पाहात होते. श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार युधिष्ठिर, द्रौपदी आणि आपल्या भावांसह पितामह भीष्मांकडून उपदेश ग्रहण करण्यासाठी युद्धभूमीवर आले होते. युधिष्ठिरांनी पितामहांना वर्णाश्रम, राजा-प्रजा, धर्म इ. बद्दल प्रश्न विचारले.
भीष्म युधिष्ठिराला धर्माबद्दल उपदेश देत होते तेव्हा द्रौपदीला अचानक हसू आलं. तेव्हा पितामह भीष्म यांनी द्रौपदीला विचारलं, 'पोरी, तू का हसलीस?'
 द्रौपदी संकोचून म्हणाली, 'चूक झाली पितामह, क्षमा करा.'
द्रौपदीच्या क्षमा मागण्यानं भीष्मांचं समाधान झालं नाही. ते द्रौपदीला म्हणाले, 'तुझ्या हसण्यामागे काहीतरी कारण आहे हे निश्चित. संकोचू नको, स्पष्ट सांग.'
द्रौपदीनं हात जोडून भीष्मांना वंदन केलं. म्हणाली, 'आपला आग्रह मी टाळू शकत नाही. आपण धर्मोपदेश देत होता तेव्हा माझ्या मनात एक विचार आला. वाटलं, आज आपण धर्माची उत्तम व्याख्या करता. धर्म समजावून सांगताय. पण दुर्योधनाच्या सभेत जेव्हा दुःशासन मला निर्वस्त्र करत होता तेव्हा धर्माबद्दलचं हे तुमचं ज्ञान कुठे गेलं होतं? हा विचार मनात आला आणि मला हसू आलं. क्षमा करा मला.'
द्रौपदीचं बोलणं ऐकून भीष्म म्हणाले, 'यात क्षमा मागण्यासारखं काहीही नाही. त्यावेळीसुद्धा माझ्याजवळ धर्माचं ज्ञान होतं. पण अन्यायी दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे माझी बुद्धि कुंद पडली होती. म्हणूनच त्यावेळी मी योग्य निर्णय करू शकलो नाही. अर्जुनाचा बाण लागला आणि माझ्या शरीरातील सगळं दूषित रक्त वाहून गेलं. बुद्धी झळझळीत शुद्ध झाली. धर्माचं योग्य विवेचन करणं त्यामुळेच मला शक्य होत आहे.'
--- 

6 comments:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

फार छान पोस्ट आहे. आवडली.

श्रिया (मोनिका रेगे) said...

उत्तम कल्पना....काही तुमच्या आवडत्या गोष्टी ह्या तुमच्या ब्लॉग वर तुम्ही दिल्या आहेत,हि कथा पण आवडली....धन्यवाद!

Sandhya Pednekar said...

कांचन आणि श्रिया, धन्यवाद.

travelogues said...

भीष्माच्या या भूमिकेबद्दल विवेचन ईरावती बाई कर्वे आणि दुर्गा बाई भागवत यांनी केले आहे तेही जरूर वाचावे . युगांत आणि व्यास पर्व मध्ये.

Sandhya Pednekar said...

जरूर सर. नक्की प्रयत्न करेन.

Jitendra Date said...

Sundarach lihile ahe Apan .Tatva ani lila hyancha Samanway Ahe !!!
rgds
Jitendra Date