Monday, April 30, 2012

इंद्र-वृत्रासुर युद्ध

-संध्या पेडणेकर
वारंवार होणार्‍या युद्धांमुळे देव आणि दानव जेरीस आले होते. म्हणून त्यांनी आपसात एक तह केला.
दोन्ही पक्षांनी ठरवलं की आता यापुढे युद्ध टाळायचं. त्यासाठी उपाय म्हणून सगळी शस्त्रास्त्रं दधीची ऋषींच्या आश्रमात ठेवायचं ठरलं.
महर्षी दधीचींनी सगळ्या शस्त्रास्त्रांचं आपल्या तपोबलानं पाण्यात रूपांतर केलं आणि ते पाणी ते प्यायले. त्यामुळे त्यांची हाडे अतिशय बळकट आणि अभेद्य बनली.
पण काही काळाने दानवांना स्वस्थ राहवेना. आधीच्या युद्धांमुळे आलेली क्षीणता भरून निघाली आणि त्यांनी पुन्हा देवांशी भांडण उकरून काढायचा प्रयत्न सुरू केला.
इंद्राकडून विश्वरूप असुराची हत्या घडली होती. याचंच असुरांनी मग निमित्त केलं. विश्वरूपाचा लहान भाऊ असलेल्या वृत्रासुराच्या नेतृत्वात त्यांनी पुन्हा स्वर्गावर आक्रमण करायचं ठरवलं.
पुन्हा इंद्रासमोर युद्धाचं संकट उभं राहिलं.
स्वर्गाच्या रक्षणासाठी वृत्रासुराची हत्या करणं अपरिहार्यच झालं. पण  ब्राह्मण होता म्हणून विश्वरूपाच्या हत्येमुळे इंद्राला शिक्षा भोगावी लागली होती. त्याच्या भावाची हत्या करून पुन्हा  ब्रह्महत्येच्या पातकाची शिक्षा भोगायची त्याची तयारी नव्हती.
आपली समस्या घेऊन इंद्र सल्ला मागण्यासाठी ब्रह्मदेवाकडे गेला.
ब्रह्मदेवानं इंद्राला समजावताना सांगितलं, "देवराज, हत्या करण्याच्या उद्देशानं जर कुणी आपल्यावर चाल करून आलं तर तो ब्राह्मण असला तरी आत्मरक्षणासाठी त्याची हत्या करणं हा दोष नव्हे. शिवाय आपण केवळ स्वतःचं रक्षण करण्यासाठी हे करत नसून ब्रह्मांडाच्या रक्षणासाठी हे युद्ध करणार आहात."
ब्रह्मदेवानं समजावलं तेव्हा इंद्राला थोडं हायसं वाटलं. त्यानं मग दधीची ऋषींच्या हाडांनी बनलेल्या शस्त्रानं असुरांचा नाश केला.
या घटनेमुळे देवांना आणखी एक गोष्ट समजली - आपल्या सोयीनुसार निर्णय फिरवणार्‍या धूर्त आणि कपटी लोकांवर कधीही विश्वास ठेवू नये. 

Saturday, April 28, 2012

एकाग्रता

-संध्या पेडणेकर
झेन गुरु बोकोजू आपल्या शिष्यांना ध्यानधारणा शिकविण्यासाठी जी पद्धत वापरीत असत ती लोकांना थोडी विचित्र वाटे.
एकदा एक राजपुत्र त्यांच्याकडे ध्यानधारणा शिकण्यासाठी आला. बोकोजूंनी त्याला एका उंच झाडावर चढायला सांगितलं.
राजपुत्राचं सारं आयुष्य महालात गेलेलं. झाडावर वगैरे तो कधी चढला नव्हता. शिवाय गुरूने ज्या झाडावर चढायला सांगितले त्याची  उंची पाहून तो घाबरला.
बोकोजूंना तो म्हणाला, 'मला झाडावर चढता येत नाही. पडलो तर?'
बोकोजू त्याला म्हणाले, 'झाडावर चढता येणार्‍यांना झाडावरून पडताना मी काही वेळा पाहिलंय, पण झाडावर न चढता येणार्‍यांना झाडावर चढण्याचा प्रयत्न करताना पडलेलं मी अजून पाहिलं नाहीय. तू चढ बिनधास्त.'
चढावंच लागेल हे लक्षात आल्यावर राजपुत्र झाडावर चढू लागला.
शे-सव्वाशे फूट उंचीचं झाड होतं ते. गुरुजींनी त्याला पार शेंड्यापर्यंत चढायला सांगितलं होतं. अतिशय सावधपणे तो हळू हळू चढू लागला. त्याला वाटलं होतं की आपल्याला चढताना गुरू मार्गदर्शन करतील. असं कर, तसं करू नको असं सांगत राहातील. पण अधून-मधून जेव्हा त्याची नजर खाली जमिनीवर जाई तेव्हा गुरुचं आपल्याकडे लक्षच नाही हे त्याला जाणवे.
शेवटी एकदाचा तो शेंड्यापर्यंत पोहोचला.
मग पुन्हा खाली उतरू लागला.
गुरु अजूनही डोळे मिटूनच बसले होते.
राजपुत्र जमिनीपासून साधारण पंचवीसेक फुटांवर आला तेव्हा गुरुंनी त्याला सूचना केली, 'जपून उतर रे!'
राजपुत्र खाली उतरला आणि गुरुजींना त्यानं आपली शंका विचारली.
बोकोजू त्याला म्हणाले, 'तू जेव्हा बिनधास्त होताना दिसलास तेव्हाच मी तुला सावध केलं. जमीन आता जवळ आली असं जेव्हा तुला वाटलं तेव्हाच तुझा तोल जाण्याची शक्यता वाढली होती. झाडाच्या शेंड्याजवळ असताना तू स्वतःच अतिशय सावध होतास. त्यावेळी तुला माझी गरज नव्हती. जमीन जवळ येऊ लागली तेव्हा तुझी एकाग्रता थोडी ढळू लागली. त्यावेळीच तुझ्याकडून चूक होण्याची शक्यता होती. म्हणून मी तुला सावध केलं.'
राजपुत्राला आठवलं, बोकोजूंचं म्हणणं अगदी बरोबर होतं. झाडावर चढताना, शेंड्याजवळ पोहोचताना आणि उतरावयास सुरवात करताना तो अतिशय सावध होता. जमीन जवळ दिसू लागली आणि त्याचा जीव थोडा फुशारला. आता आपली जीत पक्की असं त्याच्या मनाला वाटलं. उतरल्यानंतर गुरुंना काय काय विचारायचं याबद्दलचे विचार त्याच्या मनात येऊ लागले होते आणि झाडावरून उतरण्याच्या क्रियेकडे त्याचं क्षणकाल दुर्लक्ष होऊ लागलं होतं. त्याच वेळी गुरुजींचा आवाज त्याच्या कानांवर आला आणि इकडे-तिकडे भरकटणारं त्याचं मन पुन्हा कामावर केंद्रीत झालं होतं.
हे उमजलं अन गुरुजींबद्दल त्याच्या मनातले सारे प्रश्न विरघळून गेले.  

Friday, April 27, 2012

राजा भर्तृहरी

-संध्या पेडणेकर
उज्जैनच्या राजा विक्रमादित्याचे सावत्र वडील बंधू राजा भर्तृहरी कवी होते.. श्रृंगार शतक, वैराग्य शतक आणि नीती शतक हे त्यांनी लिहीलेले तीन काव्यग्रंथ. त्यांच्या जीवनाचा पहिला भाग अक्षरशः सर्व प्रकारच्या सुखांचा भोग घेण्यात गेला. भोगाची त्यांनी अती गाठली होती. 
पण अचानक त्यांच्या जीवनाची गाडी वैराग्याच्या वळणार वळली. घोर वैराग्य त्यांनी पत्करलं. त्यामुळे भोग आणि वैराग्याचं उदाहऱण देताना हटकून त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. तर अशा या भोगात लिप्त असणार्‍या राजाला अचानक विरक्ती कशी झाली याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते.
राजा भर्तृहरींचा विवाह राजकुमारी पिंगलेशी झाला. नवविवाहितेच्या प्रेमात राजे आकंठ बुडाले. 
त्यादरम्यान दरबारात एका ब्राह्मणानं राजाला आशिर्वादस्वरूप एक फळ दिलं. ते फळ खाणारी व्यक्ती दीर्घायुषी होणार होती. 
राजा भर्तृहरींचं आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी ते फळ स्वतः खाण्याऐवजी पत्नीला दिलं. 
पण पिंगलेचं प्रेम राजाच्या सारथ्यावर होतं. म्हणून मग, त्याच्या दीर्घायुष्याची कामना मनी बाळगून तिनं ते फळ सारथ्याला दिलं. 
सारथ्याचं एका वेश्येवर प्रेम होतं. दीर्घायुष्य देणारं ते फळ सारथ्यानं त्या वेश्येला दिलं. 
वेश्या चरित्रवान होती. 
तिनं विचार केला, माझं आयुष्य वाढून काय होणार? दीर्घायुष्य खरं तर राजाला लाभायला हवं. तोच प्रजेचं पालन करतो, देशाचं रक्षण करतो. 
ती ते फळ घेऊन दरबारात हजर झाली. फळाच्या गुणाचं वर्णन करून तिनं ते फळ राजाला अर्पण केलं.
राजे मात्र थक्क झाले. त्यांनी ते फळ आपल्या प्रिय राणीला, पिंगलेला दिलं होतं ना!
विचारपूस झाली, उलटतपासण्या झाल्या आणि खरं काय ते सगळ्यांसमोर उघड झालं. 
भर्तृहरीना जीवनाच्या एकूण व्यर्थतेचा साक्षात्कार झाला. आतापर्यंत ज्या ऐशआरामात, ज्या सुखोपभोगात ते लोळत होते त्याची निरर्थकता त्यांना जाणवली. नात्यांचा फोलपणाची त्यांना ओळख पटली.
राजा भर्तृहरीनं मग संन्यास घेतला आणि ते तडक वनात निघून गेले.
घोर श्रृंगारी राजा भर्तृहरी घोर वैरागी बनला. 

Saturday, April 21, 2012

ब्रह्मज्ञानाची परीक्षा

-संध्या पेडणेकर
एकदा आदि शंकराचार्य गंगानदीत स्नानासाठी निघाले होते. रस्त्यात एक चांडाळ (डोम) आपल्या चार कुत्र्यांना घेऊन रस्ता अडवून बसला होता. त्याला पहाताच शंकराचार्यांनी जरबेनं म्हटलं,  'दूर हो! दूर हो!' 
पण त्यांच्या या बोलण्याचा त्या डोंबावर काहीही परिणाम झाला नाही. तो शंकराचार्यांना म्हणाला, 'हे महात्मा! वेदांतामधून आपण ब्रह्म आणि जीव एकच असं प्रतिपादन करता. एकीकडे आपण सांगता की ब्रह्म एक आहे आणि ते  सत्, चित्, आनंद, दोषविरहित, असंग, अखंड, आकाशासारखं व्यापक आहे आणि दुसरीकडे त्याच अद्वैत ब्रह्मामध्ये आपण भेदाचीही कल्पना करता. 'मी पवित्र ब्राह्मण आहे, तू डोम आहेस, म्हणून माझ्या मार्गातून दूर हो असा आग्रह आपण का करता?' मला सांगा, माझ्या भौतिक शरीरानं आपल्या भौतिक शरीराच्या मार्गातून दूर व्हायचं की या शरीरामध्ये असणार्‍या चेतनेनं आपल्या चेतनेच्या मार्गातून बाजूला व्हायचं? सर्व शरीरांना व्यापून असणार्‍या ब्रह्माची आपण अवहेलना करताहात, महात्मन्!' 
डोंबाच्या बोलण्यानं शंकराचार्यांना जणू जाग आली. आपल्या हातून घडत असलेली चूक त्यांच्या लक्षात आली. डोंबाला ते म्हणाले की, आपण आत्मज्ञानी आहात. आपण जे म्हणताय ते पूर्णपणे सत्य आहे. 
शंकराचार्यांनी डोंबाच्या स्तुतीदाखल जे पाच श्लोक म्हटले ते 'मनीषा पंचक' नावानं प्रसिद्ध आहेत. मनीषा पंचकात शंकराचार्यांनी जे सांगितलं त्याचा सारांश असा, - मी ब्रह्म आहे आणि संपूर्ण जगही ब्रह्मरूप आहे असं दृढपणे मानणारे - मग ते डोम असोत वा ब्राह्मण, ते माझे गुरू होत.  
                                               ---

'मनीषा पंचक' बद्दल अधिक माहिती पुढील लिंक वर मिळेल -
http://www.bhagavadgitausa.com/HYMNS%20OF%20SANKARA.htm
यू-ट्यूबवर या प्रसंगाचा वीडियो पाहाण्यासाठी पुढील लिंक वापरा-
http://www.youtube.com/watch?v=Ewta7YJCmyw
---

Friday, April 20, 2012

सहानुभूती

-संध्या पेडणेकर
एका दुकानदारानं आपल्या दुकानाच्या दारावर पाटी लावली, 'कुत्र्याची पिल्ले विकणे आहेत.'
थोड्या वेळानं एका छोट्या मुलानं काउंटरपलीकडून त्यांना विचारलं, 'पिल्लाची किंमत किती आहे?'
'400 रुपए,' दुकानदार त्याला म्हणाला. मग त्यानं त्या मुलाला विचारलं, 'तुला खरेदी करायचंय का एखादं पिल्लू?'
मुलगा थोड़ा विचारात पडलेला दिसला. मग त्यानं आपल्या खिशात हात घालून पैसे बाहेर काढले. काही रुपये आणि काही सुटी नाणी.  400 रुपए नव्हते त्याच्याजवळ. क्षणभर झाकोललेला त्याचा चेहरा पुन्हा चमकला.,  त्यानं दुकानदाराला विचारलं, 'एवढ्या पैशात मी पिल्लं एकदा पाहू शकतो का?'
'जरूर!' दुकानदारानं मोलकरणीला हाक मारली आणि त्या मुलाला पिल्लं दाखव असं तिला सांगितलं. पिल्लं तिथेच एका बॉक्समध्ये ठेवलेली होती. मोलकरणीनं तिच्याजवळ असलेली शिट्टी वाजवली आणि लगेच पाच-सहा गोंडस पिल्लं धडपडत बॉक्सबाहेर पडली आणि लुडबुडत धावू लागली.
एक पिल्लू मात्र सगळ्यांच्या शेवटी हळू हळू चालत निघालं. मुलानं लक्ष देऊन पाहिलं तेव्हा ते लंगडे आहे हे त्याच्या ध्यानात आलं.
मुलानं दुकानदाराला त्या पिल्लाबद्दल विचारलं.
दुकानदार म्हणाला, 'आम्ही त्याला डॉक्टरांकडेही नेलं होतं, पण ते म्हणाले की या पिल्लाच्या एका पायात जन्मजात काहीतरी उणीव आहे. बहुधा तो जन्मभर बरा होणार नाही. लंगडाच राहील.'
'मी हे पिल्लू खरेदी करू शकतो का?' त्या मुलानं विचारलं.
दुकानदाराची उत्सुकताही चाळवली गेली. तो मुलाला समजावत म्हणाला, 'पोरा, हे पिल्लू तुझ्या कामाचं नाही. ते तुझ्याबरोबर पळू शकणार नाही, खेळू शकणार नाही, उड्या मारू शकणार नाही.... तरीही तुला जर हेच पिल्लू हवं असेल तर मी ते तुला मोफत दिलं. घेऊन जा तू त्याला.'
तो मुलगा म्हणाला, 'नको, असं नको. मी याला घेऊन जाईन पण इतर पिल्लांसाठी तुम्ही जेव्हढी किंमत ठेवलीत तेव्हढ्याच किंमतीला मी हे घेईन. आत्ता माझ्याजवळ पैसे नाहीत, पण घरी जाऊन वडिलांकडून घेऊन मी आपणास पैसे आणून देईन.'
दुकानदाराला आश्चर्य वाटलं. त्यानं मुलाला विचारलं,'खरंच का तुला हे पिल्लू विकत घ्यायचंय?'
मुलानं थोडं मागे सरकून आपला पायजामा एका पायावरून थोडा वर उचलून धरला. दुकानदाराला तो म्हणाला, 'पाहिलंत? '
त्या मुलाचा पाय पार वाकडा मुरगळलेला होता. स्टीलच्य पट्ट्याच्या आधारे तो कसाबसा उभा होता.
गोड हसत मुलगा दुकानदाराला म्हणाला, 'मलासुद्धा धावता येत नाही काका. या पि्ल्लाला कधी वाटलं की आपल्याला समजून घेणारं कुणी असायला हवं, तर मी त्याच्यासोबत असेन ना!'

Wednesday, April 18, 2012

बिन बुडाचं भांडं

-संध्या पेडणेकर
एक  शिष्य एकदा एका योग्याला भेटायला आला. त्यानं मागणी केली, 'मोक्ष मिळावा अशी इच्छा घेऊन खूप दूरवरून मी आपल्यापाशी आलोय. मला मार्गदर्शन करा.'
योग्यानं त्याला विचारलं, 'श्रद्धा आहे का मनात? कारण श्रद्धा नसेल तर सत्य तुला पेलवणार नाही.'
शिष्य तरुण होता. त्यानं म्हटलं, 'श्रद्धेनं परिपूर्ण मन घेऊन मी आपल्यापाशी आलोय. आपण जे सांगाल ते मी स्वीकारेन.'
योग्यानं म्हटलं, 'ठीक आहे. आत्ता मी विहिरीवरून पाणी भरून आणायला निघालोय. चल माझ्या मागनं. मी जे काही करेन त्याचं निरीक्षण कर. प्रश्न विचारायचा नाही. श्रद्धा ठेवायची मनात आणि फक्त पाहायचं.'
तरुणाला वाटलं, 'यात काय अवघड आहे? हे तर आपण सहज करू.'
तो त्या योग्यामागे निघाला.
विहिरीजवळ पोहोचल्यावर योग्यानं एक घागर विहीरीच्या काठावर ठेवली. तरुणाला थोडं आश्चर्य वाटलं कारण त्या घागरीला बूड नव्हतं. दुसर्‍या घागरीच्या गळ्यात दोर बांधून योग्यानं ती घागर विहिरीत लोटली. पाण्यानं भरलेली घागर शेंदून वर घेतली आणि त्यातील पाणी बिनबुडाच्या घागरीत ओतलं.
सगळं पाणी लागलीच वाहून गेलं. पण योग्यानं तिकडे लक्ष दिलं नाही. त्यानं पुन्हा घागर विहिरीत सोडली, पाणी उपसलं आणि बिनबुडाच्या घागरीत भरलेली घागर रिकामी केली, पाणी पुन्हा वाहून गेलं.
असं एकदा घडलं, दोनदा घडलं, तीनदा घडलं....
तो तरुण हळूहळू अस्वस्थ होऊ लागला. त्याला वाटलं, ' हा माणूस वेडा आहे का? पाणी सगळं वाहून जातंय तिकडे याचं लक्षच नाही. हा आपला घागरींवर घागरी ओततोय त्या बिनबुडाच्या घागरीत. कशी भरणार ती घागर? आणि कधी?'
चौथ्यांदा योग्यानं घागर रिकामी केली, पाणी वाहून गेलं तेव्हा आपल्याला गप्प राहायचंय हे तो तरुण विसरला. त्यानं योग्याला विचारलं, 'अशा रीतीनं जन्मभर पाणी ओतत राहिल्यानंतरही हे पात्र कधी नाही भरणार. या घागरीला तर तळच नाहीय.'
योगी म्हणाला, 'बस्स! तुझा माझा संबंध संपला. मी तुला आधीच बजावलं होतं, मनात श्रद्धा ठेव. फक्त पाहा. काहीही बोलू नकोस. अरे, बुडाशी आपल्याला काय प्रयोजन? आपल्याला फक्त ही घागर भरायची होती. पाणी कधी वर येईल याकडे माझं लक्ष होतंच.'
'आपण जे करताय ते मला उलगडत नाहीय....' तो तरुण म्हणाला.
योगी त्याला म्हणाला, '.....जा तू आता. पुन्हा इकडे परतू नकोस. पहिल्याच परीक्षेत नापास झालास. पुढे याहून मोठमोठ्या परीक्षा व्हायच्या होत्या.'
तो तरुण माघारी परतला.
......पण त्याला चैन पडेना.
चैन पडेना, झोप येईना, भूक लागेना....
त्याच्या मनात आलं, 'बिनबुडाच्या घागरीत पाणी भरणं शक्य नाही ही कुणाही सोम्या-गोम्याच्या लक्षात येईल अशी गोष्ट. या माणसाला वेगळंच काहीतरी समजावायचं असणार. मी गप्प रहायला हवं होतं. किती वेळ असं चाललं असतं? मी घाई केली विचारायची. चुकलंच माझं.'
दुसर्‍या दिवशी तो तरुण पुन्हा त्या योग्याकडे परतला. पाय धरून त्यानं योग्याकडे क्षमा मागितली. योगी त्याला म्हणाला, 'हा विचार करण्यात तू जेव्हढा शहाणपणा दाखवला तेव्हढा जीवनातही दाखवला असतास तर तुला माझ्याकडे यावंच लागलं नसतं. मला तुला एव्हढंच सांगायचं होतं. बूड नसलेलं पात्र भरता येत नाही. आजपर्यंत या शरीर रूपी पात्रात तू इच्छा-वासनांची भर घालत राहिलास. कधी हे पात्र भरलं का?  इच्छा-वासनांनी आपण जे भरायचा प्रयत्न करतोय ते शरीराचं पात्र  बिनबुडाचं आहे, असा विचार कधी तुझ्या मनात आला का?'
योगी जे बोलला ते ऐकून त्या तरुणाचे डोळे उघडले.  श्रद्धेनं तो गुरुचरणी लीन झाला.

Tuesday, April 17, 2012

छोटीशी चूक


-संध्या पेडणेकर
दुर्वास ऋषी अतिशय कोपिष्ट. एकदा ते श्रीकृष्ण-रुक्मिणीच्या महालात गेले. श्रीकृष्ण-रुक्मिणीनं त्यांचा खूप आदर-सत्कार केला. दुर्वासांसारख्या शीघ्रकोपी ऋषींचं मन जिकून घेणं अतिशय कठिण. पण श्रीकृष्ण-रुक्मिणीनं घरी आलेल्या अतिथीच्या आदरसत्कारात यत्किंचितही उणीव येऊ दिली नाही.
एकदा संध्याकाळच्या वेळी दुर्वासा श्रीकृष्णाच्या रथात बसले. त्यांची फेरफटका मारण्याची इच्छा श्रीकृष्णानं  ओळखली. श्रीकृष्ण सारथ्याला रथ हाकण्याचा इशारा करणार तेवढ्यात दुर्वास ऋषी म्हणाले की, रथ तू आणि रुक्मिणी दोघांनी मिळून खेचायचा. 
श्रीकृष्ण-रुक्मिणीनं मग घोड्यांची जागा घेतली.
त्या दोघांच्या सेवेनं दुर्वास मुनी प्रसन्न झाले.
त्यांनी श्रीकृष्णाला एक प्रकारचा लेप दिला आणि सांगितलं की, हा पायस लेप आहे. हा लेप शरीराच्या ज्या भागावर लावशील त्या भागावर अस्त्र-शस्त्रांचा परिणाम होणार नाही.
श्रीकृष्णानं आपल्या संपूर्ण शरीरावर तो लेप लावला पण पायांच्या तळव्यांवर लेप लावणं विसरला. शिवपुराणात उल्लेख आहे की यामुळेच श्रीकृष्णाचे तळवे कमजोर राहिले. म्हणूनच जरा व्याधाचे बाण त्यांना भेदू शकले. आणि यादवकुळाचा नाश झाला.
बाण लागला त्यावेळी श्रीकृष्ण एका झाडाखाली पहुडले होते. एका पायाच्या उभ्या केलेल्या गुडघ्यावर त्यांनी दुसर्‍या पायाचं पाऊल टेकवलं होतं. रात्र झाली तशी त्यांच्या तळव्यावरील पद्म लकाकू लागलं.
त्यावेळी जरा व्याध शिकार करण्यासाठी निघाला होता. श्रीकृष्णाच्या पावलावरील चमकतं पद्म त्याला हरिणाच्या लुकलुकणार्‍या डोळ्यांसारखं वाटलं आणि त्यानं नेम धरून बाण सोडला. याच बाणानं श्रीकृष्णाची इहलीला समाप्त झाली. 
---








Monday, April 16, 2012

इतरांचंही भलं चिंता

-संध्या पेडणेकर
नारद ब्रह्मचारी आहेत हे खरं, पण एकदा श्रीमतीवर त्यांची नजर गेली आणि ते मनोमन तिच्यावर फिदा झाले. श्रीमतीबरोबर आपला विवाह घडावा अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली.
योगायोग असा की, तुंबरूंचीही नजर श्रीमतीवर पडली आणि श्रीमतीशी आपला विवाह व्हावा असं नारदांसारखंच त्यांनाही वाटू लागलं.
एकमेकांच्या इच्छांबद्दल जेव्हा त्या दोघांना समजलं तेव्हा त्यांच्या मनात परस्परांबद्दल ईर्ष्या निर्माण झाली. दुसर्‍यावर मात करून आपली इच्छा पूर्ण करण्याचा दोघांनी निश्चयच केला.
दोघेही विष्णूचे भक्त होते.
दुसर्‍याला मात देण्यासाठी विष्णूची मदत घेण्याचा दोघांनी निर्णय घेतला.
नारदांनी विष्णूकडे मदत मागितली, 'स्वयंवराच्या वेळी श्रीमतीला तुंबरूचा चेहरा अस्वलासारखा दिसो.'
तुंबरूंनी विष्णूला म्हटलं, 'स्वयंवराच्या वेळी श्रीमतीला नारदाचा चेहरा माकडासारखा दिसो.'
नेहमीसारखं विष्णूंनी 'तथास्तु!' म्हटलं. त्यांना खूप गंमत वाटत होती. स्वयंवराच्या वेळी काय घडते हे पाहाण्यासाठी ते स्वतःही उपस्थित राहिले.
स्वयंवराच्या वेळी हातात वरमाला घेऊन श्रीमती आली तेव्हा इच्छुक वरांच्या रांगेत अगदी शेवटी उभे असलेल्या नारद-तुंबरूंवर तिची नजर गेली. दुरून दोघेही अगदी उत्तम शरीरयष्टीचे वाटत होते.
पण ती जेव्हा इतर इच्छुक वरांना ओलांडून त्यांच्याजवळ पोहोचली तेव्हा त्यांच्यापैकी एकाचं डोकं अस्वलाचं आणि दुसर्‍याचं डोकं माकडाचं असलेलं पाहून ती चपापली.
तेवढ्यात तिची नजर विष्णूवर गेली. माणसाचा चेहरा पाहून तिला हायसं वाटलं आणि तिने विष्णूच्या गळ्यात वरमाला घातली.
नंतर जे झालं त्यानुसार, स्वयंवराच्या वेळी जे घडलं होतं त्यामुळए नारद खुश होते कारण श्रीमतीने तुंबरूलच्या गळ्यात वरमाला गातलेली नव्हती आणि तुंबरू खुश होते कारण श्रीमतीने नारदाच्या गळ्यात वरमाला घातेली न्हती. नारदांना श्रीमती मिळाली नाही म्हणून तुंबरू खुश होते तर तुंबरूचा श्रीमतीने स्वाकर नाही केला म्हणून नारद खुश होते.
असंच होतं, इतरांचं भलं न होवो अशी इच्छा बाळगणार्‍यांना बहुतेक वेळा स्वतःलाच नुकसान सहन करावं लागतं.


Sunday, April 15, 2012

ईश्वराला ओळखणं कठीण आहे

-संध्या पेडणेकर
प्रसिद्ध रशियन साहित्यिक दोस्तोवस्की यांची एक कथा आहे.
कथेत ते म्हणतात की, येशूला मृत्यूनंतर तब्बल अठराशे वर्षांनंतर एकदा वाटलं की आपण जगात योग्य वेळी गेलो नव्हतो. वेळ योग्य नव्हती त्यामुळे लोक आपलं म्हणणं समजू शकले नाहीत आणि म्हणूनच आपल्याला सुळावर चढविण्यात आलं. आता प्रत्येक गावात चर्च बांधली गेलीत. तिथं सकाळ-संध्याकाळ आपलं स्मरण केलं जातं, आपल्या नावानं अगरबत्या, मेणबत्या लावल्या जातात. ही आपल्या आविर्भावासाठी योग्य वेळ आहे. त्यांना वाटलं, आता जावं, लोक आपल्याला नक्की ओळखतील, आपल्या उपदेशाचं मर्म त्यांना कळेल.
त्यानुसार एके रविवारी, सकाळी येशू आपल्या जन्मगावी बॅथलहॅममध्ये अवतरले.
ती रविवारची सकाळ होती. नुकतीच प्रार्थना आटोपून लोक चर्चमधून बाहेर पडत होते.
येशूला वाटलं, आता आपल्याला आपला परिचय देण्याचीही गरज पडणार नाही. घरां-घरांत आपल्या तसबिरी लावलेल्या आहेत. येशूंना आठवलं, आधी ते जेव्हा या जगात आले होते तेव्हा त्यांनी, 'मी ईश्वराचा पुत्र आहे आणि आपल्यासाठी जीवनाचा संदेश घेऊन आलो आहे. माझा संदेश जाणून घेणार्‍यांचा उद्धार होईल,' असं लोकांना आग्रहानं ठासून ठासून सांगितलं होतं. पण त्यावेळी त्यांना सुळी देण्यात आलं.
'आता मात्र ते आपल्याला नक्की ओळखतील,' असं येशूला वाटलं.
पण लोक त्यांना पाहून हसू लागले. लोकांना वाटलं, आहे कुणी माथेफिरू. येशूचा वेश धारण करून उभा आहे चर्चच्या दारात.
शेवटी येशूला सांगावंच लागलं की, बाबांनो, ज्याची पूजा करून तुम्ही चर्चमधून बाहेर पडताहात तो मीच.
पण लोक त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायलाच तयार नव्हते. हसत हसतच ते येशूंना म्हणाले, 'पादरी यायच्या आत इथून निघून जा नाहीतर तुझी काही धडगत नाही.'
येशूंनी सांगण्याचा प्रयत्न केला, 'आधी मी यहूद्यांच्या गर्दीत होतो त्यामुळे मला समजण्यात तुमची चूक झाली होती. आता मी केवळ आपल्याच लोकांत आहे. तरीही आपल्याला माझी ओळख लागत नाही का?'
तेवढ्यात चर्चचा पादरी तेथे आला.
येशूला पाहून हसणारे लोक पादरींना वाकून नमस्कार करू लागले.
पादरी मला नक्की ओळखेल असं येशूला वाटलं. पण झालं भलतंच. पादरीने येशूला पकडून नेलं आणि चर्चमधील एका खोलीत कोंडून ठेवलं.
मध्यरात्री तोच पादरी हातात कंदिल घेऊन येत असल्याचं येशूला दिसलं.
आल्या आल्या त्यानं येशूच्या पावलांवर डोकं टेकलं. म्हणाला, 'मी लागलीच आपल्याला ओळखलं होतं. पण आपण जातीचे अराजक आहात हे सुद्धा माझ्या लक्षात होतं. आपण पुन्हा सत्य सांगायचा प्रयत्न कराल आणि सगळी घडी विस्कटून टाकाल हे मला माहीत होतं. खरं तर आता आपली काहीही गरज नाहीय इथे. आणि तरीही आपल्याला जर काही करायचं-सांगायचं असेल तर आमच्याकरवी करवा. माणसं आणि आपण यामधील दुवा आहोत आम्ही.... आणि हो, काही गडबड वगैरे करायचा विचार असेल तर मात्र... अठराशे वर्षांपूर्वी जे इतर पादरींनी केलं होतं तेच आम्हालाही करावं लागेल. आपल्या मूर्तीची पूजा आम्ही करू शकतो, पण खुद्द आपली उपस्थिती घातकच ठरेल हे आम्ही जाणतो.'
---

Wednesday, April 11, 2012

दीर्घायुष्याचं रहस्य

                                                                            
-संध्या पेडणेकर 
भारतरत्न ही पदवी मिळविणारे प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ मोक्षगुंडम विश्वैश्वरैय्या यांना 100 वर्षांहून अधिक काळाचं आयुष्य लाभलं. शेवटपर्यंत ते अतिशय सक्रीय  जीवन जगले. त्यांना कुणी त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य विचारलं की ते हसत हसत म्हणायचे, "मृत्यू माझ्या शरीराचं दार जेव्हा ठोठावतो तेव्हा -'मी आत नाही'- असं मी त्याला आतून उत्तर देतो. निराश होऊन मृत्यू उलटपावली परत जातो."
एके दिवशी त्यांच्या एका मित्रानं त्यांना निरंतर तरुण, उत्साही आणि सक्रीय रहाण्यामागील रहस्य काय असं विचारलं तेव्हा ते त्याला म्हणाले,'अरे, म्हातारपण शरीराचं नसतं, मनाचं असतं. मनानं आपण जोवर तरुण राहू तोवर आपलं शरीर मनाच्या भावनिक तारुण्याची साथ देत रहातं. यौवन असो वा म्हातरपण या पूर्णपणे मानसिक अवस्था आहेत.'
काही अंशी त्यांचं म्हणणं बरोबर होतं. अर्थात्, त्यांच्या उत्तम तब्बेतीला कारणीभूत ठरणार्‍या इतरही काही गोष्टी होत्या.
डॉ विश्वेश्वरैय्या यांनी आपल्या दीर्घ जीवनात कधीही धूम्रपान केलं नाही आणि कधीही मांस किंवा मदिरेचं सेवन केलं नाही.
स्वीडनमध्ये असताना ते एकदा आजारी पडले. थंडीपासून बचाव व्हावा म्हणून डॉक्टरांनी त्यांना काही थेंब ब्रँडी घेण्यास सांगितलं. यावर ते डॉक्टरांना म्हणाले, 'ब्रँडीच्या थेंबांनीच इलाज होणार असेल तर मग जाऊ द्या.'
भारतात परतल्यानंतर म्हैसूर सरकारनं त्यांना भोजनाचं आमंत्रण दिलं. ते परदेशवारी करून परतले होते, त्यामुळं मदिरापान आणि सामिष भोजन  ते करत असावेत असं या भोजनाचा बेत आखताना गृहित धरण्यात आलं होतं. त्यांनी जेव्हा नम्रपणानं नकार दिला तेव्हा त्यांचं  आतिथ्य करणार्‍या मंत्र्यांनी त्यांना विचारलं, 'आपण निदान सिगारेट तरी पीत असालच.' यावर हसत ते म्हणाले, नाही, मी अजून एवढा सुसंस्कृत झालेलो नाही.'
---

Tuesday, April 10, 2012

डोळे आणि भ्रम

-संध्या पेडणेकर
खलील जिब्रान यांची एक छोटी कथा आहे. 
कथेचं नाव आहे - डोळे.
कथा अशी-
एकदा डोळे म्हणाले, 'या समोरच्या दरीपलीकडे एक डोंगर आहे. किती सुंदर दिसतोय तो. पाहा तर, आत्ता त्याला चारही बाजूंनी दाट धुक्यानं वेढलंय. पण एकूण दृश्य फारच सुरेख दिसतंय.'
डोळ्यांचं बोलणं ऐकून कान म्हणाले, 'डोंगर? कुठे आहे डोंगर? मला कोणताही डोंगर ऐकू येत नाहीए!'
कानांचं म्हणणं ऐकून हात म्हणाले, 'हो रे कानूटल्यांनो. डोळोबांचं बोलणं ऐकलं आणि मी डोंगराला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण मला  डोंगर जाणवत नाहीय. डोंगर असेल असं मला तरी वाटत नाही!'
यावर नाक म्हणालं, 'बरोबर बोललात हातभाऊ. डोंगर कुठेही नाहीय. असता तर मला त्याचा वास नसता का आला?'
या सगळ्यांचं बोलणं ऐकून डोळे उदास झाले. त्यांनी डोंगरावरून नजर वळवून बाजूला नेली. आता त्यांच्यालेखीही डोंगर दृष्टीआडची सृष्टी झाले.
डोळ्यांनी नजर वळवली आणि लगेच इतरांची आपापसात कुजबूज सुरू झाली - डोळ्यांना बहुतेक भ्रम झालाय. डोळ्यांमध्ये काहीतरी बिघाड झालाय राव. घोटाळा आहे.
---
गोष्ट इथेच संपते. 
अहंभावनेमुळे कुणालाही आपल्यापलीकडचं काही दिसतंच नव्हतं. इतरांचंही म्हणणं बरोबर असू शकतं हे मानायला कुणीही तयार नव्हतं. श्रद्धेची कमतरता, पुराव्याशिवाय निर्णयाप्रत पोहोचण्य़ाची आणि अनुभवाविना आपलं मत व्यक्त करण्याची चूक ते सगळेच करत होते. डोळ्यांकडे आत्मविश्वास नव्हता.
 खरं तर त्यांना भ्रम झाला नव्हताच. छातीठोकपणे आपलं म्हणणं मांडणं त्यांना जमलंच नाही. 
इतरांना मात्र आपल्या सीमारेखांपलीकडे जाऊन विचार करणं काही जमलं नाही. 

Sunday, April 8, 2012

मन लावून काम करावं

-संध्या पेडणेकर
प्रसिद्ध ग्रीक गणितज्ञ पायथॅगोरस यांच्या बालपणाबद्दलची एक गोष्ट सांगतात.
त्यांचं बालपण अतिशय गरीबीत गेलं. ते अनाथ होते. पोट भरण्यासाठी त्यांना जंगलात जाऊन लाकडं गोळा करून आणून ती विकावी लागायची. याच मिळकतीवर त्यांचा उदरनिर्वाह चाले.
एकदा दिवसभर जंगलात लाकडं गोळा करून आणल्यानंतर ती विकण्यासाठी लागलेल्या रांगेत ते आपली पाळी येण्याची वाट पाहात उभे होते.
लाकडं खरेदी करण्यासाठी आलेले प्रसिद्ध ग्रीक तत्वज्ञानी  डेमॉक्रेटीस यांचं या अनाथ मुलाकडे लक्ष गेलं. त्यानं अतिशय नेटकेपणानं लाकडाची मोळी बांधली होती. खरं तर त्या मोळीच्या नेटकेपणानंच त्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
पायथॅगोरससमोर येऊन उभे रहात डेमॉक्रेटीस यांनी विचारलं, 'ही मोळी उलगडून तू पुन्हा अशीच बांधून दाखवशील का?'
'हो, दाखवतो,' पायथॅगोरस म्हणाला, 'मी स्वतः ही मोळी बांधलीय. पुन्हा एकदा नक्की बांधू शकतो.'
त्यानं मोळी उलगडून लाकडं वेगळी वेगळी पसरवली आणि पुन्हा अतिशय तन्मयतेनं एक एक लाकूड रचत मोळी बांधली. खाली सगळ्यात जाड लाकडं, त्यापेक्षा थोडी बारीक असलेली त्यानंतर, अधिक बारीक लाकडं वर या क्रमानं त्यानं मोळी रचली. आपलं काम तो अतिशय मन लावून करत होता.
 काम करतानाचा त्याचा तल्लीनपणा पाहून डेमॉक्रेटीसनी त्याला विचारलं, 'शिक्षण घ्यायची इच्छा आहे का? शिकशील तू?'
त्या छोट्या मुलानं - पायथॅगोरसनं म्हटलं, 'हो, शिकेन मी.'
तो अनाथ मुलगा मग डेमॉक्रेटीससोबत निघाला.
मन लावून, मेहनतीनं त्यानं शिक्षण घेतलं.
पुढे हाच गरीब, अनाथ मुलगा प्रसिद्ध गणितज्ञ पायथॅगोरस बनला.
---

Tuesday, April 3, 2012

महामूर्ख कोण?

एकदा एक धोबी जंगलातून चालला होता. त्याच्यासोबत त्याचं गाढवही होतं. आपल्या गाढवावर त्या धोब्याचं खूप प्रेम होतं.  दहा रुपये मोजून गावच्या बाजारातून त्यानं एक लखलखतं लॉकेट खरेदी करून ते त्या गाढवाच्या गळ्यात बांधलं होतं.
त्या दिवशी धोबी आणि गाढव जंगलातून चालले असता एका  मुशाफिराची नजर गाढवाच्या गळ्यात बांधलेल्या लॉकेटवर पडली. त्यानं धोब्याला थांबवलं. धोब्याला वाटलं, आता हा माझं गाढव मागणार. धोबी त्या मुशाफिराला म्हणाला, 'हे पहा, या गाढवावर माझं खूप प्रेम आहे. तुमच्याकडे सामानाचं ओझं बरंच आहे असं दिसतंय, पण काहीही झालं तरी मी हे गाढव विकणार नाही. त्याच्याशिवाय माझा कामधंदा चालणार नाही.'
धोब्याचं बोलणं ऐकून मुशाफिराला हसू आलं. तो मुशाफिर एक निष्णात जवाहिर्‍या होता - लोभी, कंजूस आणि लबाड. त्याला गाढव नको होतं- त्या गाढवाच्या गळ्यातील लॉकेटमधला मणी हवा होता. त्या मण्याची किंमत त्याला ठाऊक होती. धोब्याची खुशामत करत तो म्हणाला, 'नाही नाही, गैरसमज करून घेऊ नका. मला तुमचं गाढव नकोय. त्याच्या गळ्यात तुम्ही जे हे लॉकेट बांधलंय ना, त्यावर मी फिदा आहे. किती सुंदर मणी आहे यात. तो मणी मला हवाय. तुम्ही तो मणी मला विकाल का?'
धोबी फुशारला आणि त्यानं त्या मण्याची किंमत शंभर रुपये सांगितली.  धोब्याला संशय येऊ नये म्हणून मग मुशाफिर भावात घासाघीस करू लागला. त्यानं त्या मण्याची किंमत पन्नास रुपये लावली. धोब्यानं मणी विकायला नकार दिला आणि तो पुढे चालला.
थोडं पुढे गेल्यानंतर धोब्याला आणखी एक व्यक्ती भेटली. त्या व्यक्तीलाही तो मणी खरेदी करायचा होता. यावेळी धोब्यानं मण्याची किंमत 200 रुपये सांगितली. त्या व्यक्तीनं मोजून दोनशे रुपये धोब्याच्या हातावर टिकवले आणि मणी घेऊन तो तेथून निघून गेला.
धोबी काही पावलं पुढे चालला असेल नसेल, तेव्हढ्यात मागनं धावत येऊन पहिल्या मुशाफिरानं त्याला गाठलं. धापा टाकत तो म्हणाला, 'चल, तू म्हणशील ती किंमत. हे घे शंभर रुपये आणि दे तो मणी मला....' 
पण आता वेळ निघून गेली होती. कुठे माघार घ्यायची हे त्या मुशाफिराला उमगलं नव्हतं.
आपण 200 रुपयांना तो मणी विकला असं धोब्यानं हसत हसत त्याला सांगितलं.
त्या मुशाफिरानं स्वतःच्या कपाळावर हात मारला. म्हणाला, 'अरे मूर्खा, काय केलंस तू हे! दोन लाख रुपयांचा हिरा तू दोनशे रुपयांना विकलास?'
धोबी त्याला म्हणाला, 'मी नाही, आपण मूर्ख आहात...महामूर्ख. मला त्या मण्याची किंमत ठाऊकच नव्हती. मी तो फक्त दहा रुपयांना लॉकेटसह खरेदी केला होता. माझा फायदाच झाला. पण माहीत असूनसुद्धा लाखो रुपये किंमतीचा मणी शंभर रुपयांत खरेदी केला नाहीत हा आपला महामूर्खपणाच नव्हे का?'-संध्या पेडणेकर

Monday, April 2, 2012

चाणक्याने दिलेला तर्क

-संध्या पेडणेकर
मौर्य साम्राज्याची स्थापना करणारा श्रेष्ठ सेनापती म्हणून सम्राट चंद्रगुप्ताचा उल्लेख केला जातो. .भारताच्या इतिहासात मौर्य साम्राज्य युगाला सुवर्णयुग मानलं जातं. या साम्राज्याच्या संस्थापनेची संकल्पना होती आचार्य चाणक्य यांची. ते सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे महामंत्री आणि गुरु होते. एका साधारण  झोपडीत ते रहात असत. त्यांची झोपडी सम्राट चंद्रगुप्ताच्या  महालासमोर होती.
एकदा चीन देशातून आलेले एक प्रसिद्ध प्रवासी  फाहियान  त्यांना भेटायला आले. चाणक्य एका झोपडीत रहातात हे पाहून त्यांना फारच आश्चर्य वाटले. चाणक्यांना ते म्हणाले, 'आश्चर्य! एवढ्या मोठ्या साम्राज्याचे महामात्य साध्या झोपडीत रहातात.'
फाहियान यांना नेमकं काय म्हणायचंय ते चाणक्यांच्या लक्षात आलं. चाणक्य त्यांना म्हणाले, 'ज्या देशाचा महामात्य साधारण झोपडीत रहातो त्या देशाचे नागरिक भव्य प्रासादात रहातात. पण ज्या देशाचा महामात्य भव्य महालात रहातो त्या देशाच्या नागरिकांना झोपड्यांमध्ये रहाणं भाग पडतं. माझ्या देशातील नागरिकांवर झोपड्यांमध्ये रहाण्याचं संकट येऊ नये असं मला वाटतं.'
आचार्य चाणक्य  यांच्या उत्तरानं फाहियान अवाक ् झाले.