-संध्या पेडणेकर
प्रसिद्ध रशियन साहित्यिक दोस्तोवस्की यांची एक कथा आहे.
कथेत ते म्हणतात की, येशूला मृत्यूनंतर तब्बल अठराशे वर्षांनंतर एकदा वाटलं की आपण जगात योग्य वेळी गेलो नव्हतो. वेळ योग्य नव्हती त्यामुळे लोक आपलं म्हणणं समजू शकले नाहीत आणि म्हणूनच आपल्याला सुळावर चढविण्यात आलं. आता प्रत्येक गावात चर्च बांधली गेलीत. तिथं सकाळ-संध्याकाळ आपलं स्मरण केलं जातं, आपल्या नावानं अगरबत्या, मेणबत्या लावल्या जातात. ही आपल्या आविर्भावासाठी योग्य वेळ आहे. त्यांना वाटलं, आता जावं, लोक आपल्याला नक्की ओळखतील, आपल्या उपदेशाचं मर्म त्यांना कळेल.
त्यानुसार एके रविवारी, सकाळी येशू आपल्या जन्मगावी बॅथलहॅममध्ये अवतरले.
ती रविवारची सकाळ होती. नुकतीच प्रार्थना आटोपून लोक चर्चमधून बाहेर पडत होते.
येशूला वाटलं, आता आपल्याला आपला परिचय देण्याचीही गरज पडणार नाही. घरां-घरांत आपल्या तसबिरी लावलेल्या आहेत. येशूंना आठवलं, आधी ते जेव्हा या जगात आले होते तेव्हा त्यांनी, 'मी ईश्वराचा पुत्र आहे आणि आपल्यासाठी जीवनाचा संदेश घेऊन आलो आहे. माझा संदेश जाणून घेणार्यांचा उद्धार होईल,' असं लोकांना आग्रहानं ठासून ठासून सांगितलं होतं. पण त्यावेळी त्यांना सुळी देण्यात आलं.
'आता मात्र ते आपल्याला नक्की ओळखतील,' असं येशूला वाटलं.
पण लोक त्यांना पाहून हसू लागले. लोकांना वाटलं, आहे कुणी माथेफिरू. येशूचा वेश धारण करून उभा आहे चर्चच्या दारात.
शेवटी येशूला सांगावंच लागलं की, बाबांनो, ज्याची पूजा करून तुम्ही चर्चमधून बाहेर पडताहात तो मीच.
पण लोक त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायलाच तयार नव्हते. हसत हसतच ते येशूंना म्हणाले, 'पादरी यायच्या आत इथून निघून जा नाहीतर तुझी काही धडगत नाही.'
येशूंनी सांगण्याचा प्रयत्न केला, 'आधी मी यहूद्यांच्या गर्दीत होतो त्यामुळे मला समजण्यात तुमची चूक झाली होती. आता मी केवळ आपल्याच लोकांत आहे. तरीही आपल्याला माझी ओळख लागत नाही का?'
तेवढ्यात चर्चचा पादरी तेथे आला.
येशूला पाहून हसणारे लोक पादरींना वाकून नमस्कार करू लागले.
पादरी मला नक्की ओळखेल असं येशूला वाटलं. पण झालं भलतंच. पादरीने येशूला पकडून नेलं आणि चर्चमधील एका खोलीत कोंडून ठेवलं.
मध्यरात्री तोच पादरी हातात कंदिल घेऊन येत असल्याचं येशूला दिसलं.
आल्या आल्या त्यानं येशूच्या पावलांवर डोकं टेकलं. म्हणाला, 'मी लागलीच आपल्याला ओळखलं होतं. पण आपण जातीचे अराजक आहात हे सुद्धा माझ्या लक्षात होतं. आपण पुन्हा सत्य सांगायचा प्रयत्न कराल आणि सगळी घडी विस्कटून टाकाल हे मला माहीत होतं. खरं तर आता आपली काहीही गरज नाहीय इथे. आणि तरीही आपल्याला जर काही करायचं-सांगायचं असेल तर आमच्याकरवी करवा. माणसं आणि आपण यामधील दुवा आहोत आम्ही.... आणि हो, काही गडबड वगैरे करायचा विचार असेल तर मात्र... अठराशे वर्षांपूर्वी जे इतर पादरींनी केलं होतं तेच आम्हालाही करावं लागेल. आपल्या मूर्तीची पूजा आम्ही करू शकतो, पण खुद्द आपली उपस्थिती घातकच ठरेल हे आम्ही जाणतो.'

---
No comments:
Post a Comment