-संध्या पेडणेकर
रामकाकांच्या घरासमोर अंगणात एक खूप मोठं झाड
होतं.
त्या झाडामुळे घरावर आणि अंगणभर नेहमी सावली
असायची. घराचं ते जणू छत्रच होतं.
पण त्यांच्या एका शेजार्याचं म्हणणं पडलं की घर आणि अंगणावर अशी छाया टाकणारी
झाडं अशुभ असतात. त्याच्या अशुभ छायेमुळे काहीतरी अप्रिय घडण्याआधी ते झाड कापून
काढणंच योग्य.
शेजार्याचं बोलणं मानून रामूकाकांनी आपल्या
अंगणातील घरादाराला सावली देणारा तो वृक्ष कापून टाकला. चुलीत जाळता येतील अशा
त्या प्रचंड वृक्षाच्या छोट्या छोट्या ढलप्या पाडल्या.
वृक्ष बराच मोठा होता. त्याच्या अर्ध्या
लाकडांनी रामूकाकांचं घर भरलं. अंगणातही जागा उरली नाही साठवायला.
तेव्हा मदत करण्याच्या बहाण्यानं तिथे आलेल्या
त्यांच्या शेजार्यानं त्यांच्या संमतीनं उरलेली अर्धी लाकडं स्वतःसाठी नेली.
काही दिवसांनी, थंडपणानं विचार करताना
रामूकाकांना वाटलं की, आपली सरपणाची सोय करण्यासाठी म्हणूनच त्यांच्या त्या शेजार्यानं
त्यांना त्यांच्या अंगणातील झाड अशुभ असल्याचा आणि ते तोडण्याचा सल्ला दिला होता.
रामूकाकांना खूप वाईट वाटलं.
गावातल्या एका वयोवृद्ध व्यक्तीसमोर त्यांनी
आपलं मन उघड केलं. विचारलं की, बाबा, झाड तोडलं ही माझ्या हातून चूक घडली का? असे प्रचंड वृक्ष
दुर्भाग्याला आमंत्रण देतात का?
बाबा हसत म्हणाले, ‘तुझ्यासारख्या मुर्खाच्या
अंगणात उगवला हे त्या वृक्षाचं दुर्भाग्यच म्हणायला हवं. म्हणूनच त्याची कत्तल
घडली आणि आता त्याला जाळलंही जाईल.’
ऐकलं आणि रामूकाकांना आपल्या हातून घडलेली चूक
जाणवून रडूच कोसळलं.
वयोवृद्ध बाबांनी मग रामूकाकांना सांगितलं, ‘जाऊ दे, चुका माणसाच्या
हातूनच घडतात. हरकत नाही. आपण आता मूर्ख राहिलो नाही यातच समाधान मान. इतरांच्या
सल्यावर अंमल करण्याआधी सल्ला देण्यामागे त्यांचा काय हेतू आहे याचा शोध घेऊन, सल्ला नीट उमगेल
तेव्हाच आणि स्वतःही त्याच्याशी सहमत असल्यासच त्यावर अंमल करावा हे समजण्याची अक्कल
एक झाड गमावून जरी तू शिकलास तरी खूप झालं. या गोष्टी नीट लक्षात ठेवल्यास तर
पुन्हा अशी चूक घडणार नाही तुझ्याकडून.’
---
No comments:
Post a Comment