-संध्या पेडणेकर
एकदा कौटिल्यांकडे एक तरुण आला. कौटिल्यांना तो
म्हणाला, ‘आपण महान अर्थशास्त्री आहात असं ऐकून मी आलो. कृपया मला श्रीमंत व्हायचं आहे. मला यासाठी काही धडे द्या.’
कौटिल्य त्याला म्हणाले, ‘या जगात दोन प्रकारचे ज्ञान
आहे– लौकिक आणि आध्यात्मिक. तुला ज्या प्रकारच्या ज्ञानाची गरज अहे त्या
प्रकारचं ज्ञान मी तुला देईन. पण त्यासाठी तुला आधी एक परीक्षा द्यावी लागेल.‘
परीक्षा देण्यासाठी तो तरुण तयार झाला. कौटिल्य
त्याला म्हणाले, ‘आसपासच्या रेतीतून पांढरा आणि काळा असे दोन प्रकारचे गोटे
निवड आणि तुझ्या झोळीत ठेव. माझा एक शिष्य न पाहाता तुझ्या झोळीतून एक गोटा निवडेल
आणि त्यावरून तुला कशाप्रकारच्या ज्ञानदानाची गरज आहे ते मी ठरवेन. त्याने जर
पांढरा गोटा काढला तर मी तुला धन-संपत्ती कमावण्याबद्दलचं ज्ञान देईन आणि जर
त्याच्या हाती काळा गोटा लागला तर तुला मी आध्यात्मिक ज्ञान देईन.’
त्या तरुणानं लगेच खाली वाकून वाळूतून दोन गोटे
निवडले आणि ते आपल्या झोळीत ठेवले. कौटिल्यांचं आणि त्यांच्या एका शिष्याचं त्या
तरुणाकडे लक्ष होतं. त्यानं दोन्ही पांढरे गोटेच निवडले हे त्यांच्या लक्षात आलं. त्या
तरुणाला धन कमवण्यातच रस आहे हे त्यांनी जाणलं.
ज्या शिष्यानं त्या तरुणाने निवडलेले गोटे
पाहिले होते त्याला कौटिल्यांनी बोलावलं आणि त्या तरुणाच्या झोळीतून एक गोटा काढून
आणण्यास सांगितलं. शिष्यानं त्या तरुणाच्या झोळीत हात घातला आणि एक गोटा हातात घेऊन
मूठ बंद केली आणि हात बाहेर काढला. मूठ बंद ठेवूनच तो गुरुंच्या दिशेनं निघाला. पण
चालता चालता त्याला ठेच लागली आणि तो पडला. त्याची मूठ उघडली आणि त्यातील गोटा
वाळूत अदृश्य झाला. आता तो पुन्हा शोधणं शक्य नव्हतं.
तो तरुण घाबरला. त्याला वाटलं आता आपलं बिंग फुटणार.
तो तरुण घाबरला. त्याला वाटलं आता आपलं बिंग फुटणार.
पण कौटिल्य त्याला म्हणाले, ‘घाबरू नकोस. आपण तुझ्या
पिशवीतला गोटा काढून पाहू आणि माझ्या शिष्यानं उचललेला दुसरा गोटा कोणत्या रंगाचा
होता ते ठरवू.’
त्या तरुणाच्या झोळीतून पांढर्या रंगाचा गोटा निघाला.
कौटिल्य म्हणाले, ‘याचा अर्थ माझ्या शिष्यानं
काळ्या रंगाचा गोटा उचलला होता, म्हणजे तुला आध्यात्मिक ज्ञानाची गरज आहे. ठीक आहे, आजपासून तू
माझा शिष्य झालास.’
त्या तरुणाच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागल्या.
धावत जाऊन त्यानं कौटिल्यांचे पाय धरले. आपल्या हातून घडलेल्या चुकीबद्दल
सांगितलं. माफी मागितली.
कौटिल्य त्याला म्हणाले, ‘आपल्या शिष्याला खरोखर कोणत्या गोष्टीची गरज आहे ते सच्चा गुरु जाणतो.’
कौटिल्य त्याला म्हणाले, ‘आपल्या शिष्याला खरोखर कोणत्या गोष्टीची गरज आहे ते सच्चा गुरु जाणतो.’
1 comment:
सुंदर कथा...गुरु कौटिल्य किती सहज आपल्या शिष्यांना धडे देत ते लक्षात येते..ह्या कथेतील तरुण जो गुरूंकडे आला आहे तो त्याची चूक लक्षात आल्यावर स्वतःहून येऊन गुरूंची क्षमा मागतो हे देखील आज सापडणे कठीण...गुरु शिष्याचे नाते हे प्रामाणिक होते आणि आई वडील देखील गुरुकुलात आपल्या पाल्याला सोडल्यावर निर्धास्त असत...मुलाच्या शिक्षणात आणि संस्कारात ढवळाढवळ करण्यासाठी गुरुकुलात मुळात जाण्याची परवानगी नसायची...
गुरुवरील विश्वास आणि गुरूचा शिष्यावरील विश्वास ह्यातून पुढे मोठमोठे ज्ञानी लोक निर्माण झाले...
Post a Comment