अलेक्झांडर जेव्हा भारतविजयाच्या मोहिमेवर निघाला तेव्हा त्याचे गुरु अरिस्टॉटल यांनी त्याला सांगितलं की, परत येताना भारतातील एक संन्यासी सोबत आण. बरंच ऐकलंय मी तिथल्या संन्याशांबद्दल, मला संन्यासी पाहायचाय.
भारतातून परतण्याच्या वेळी अलेक्लाझांडरला आपल्या गुरुची इच्छा आठवली. त्यानं आपल्या सैनिकांना आज्ञा दिली, 'जा, एक संन्यासी पकडून आणा.'
सैनिक निघाले. गावात पोहचल्यावर त्यांनी संन्याशाबद्दल विचारपूस केली. गावकर्यांनी त्यांना सांगितलं की, नदीकिनारी एका नग्न संन्याशाचा मुक्काम आहे.
सैनिक नदीकिनारी संन्याशाजवळ पोहोचले आणि त्यांनी संन्याशाला सांगितलं, 'आपण आमच्यासोबत ग्रीसला चलावं अशी जगज्जेत्या अलेक्झांडरची आज्ञा आहे. आम्ही आपणांस राजकीय इतमामांसह, अतिशय थाटामाटानं सोबत घेऊन जाऊ. सगळी सुखं आपल्या पायांशी लोळण घेतील. महान, विश्वविजेत्या अलेक्झांडरचे आपण विशेष अतिथी बनून राजसुखं उपभोगाल.'
सैनिकांचं बोलणं ऐकून संन्यासी हसू लागला. म्हणाला, 'आम्ही फक्त स्वतःच्या मर्जीनं चालतो. इतरांचे हुकूम मानणं आम्ही फार पूर्वीच सोडून दिलंय. तुम्हाला हवी असलेली व्यक्ती मी नव्हे.'
शिपायांनी कैक प्रकारे संन्याशाची मनधरणी केली. त्यांच्यापैकी एक म्हणाला, 'आपण अलेक्झांडरला ओळखत नाही. तो अतिशय क्रोधी आणि भयंकर राजा आहे. तुम्ही त्याचं म्हणणं मान्य केलं नाही तर तो तुमचं शीर धडावेगळं करेल.'
संन्यासी म्हणाला, 'तुम्ही आपल्या त्या राजालाच घेऊन या इथे. तो काय करतो ते पाहू.'
संन्याशाचं बोलणं ऐकलं आणि अलेक्झांडर आपल्या संपूर्ण सैन्यबळासह त्याला भेटायला निघाला. संन्याशावर नजर पडताच त्यानं म्यानातून आपली तलवार खेचली आणि धमकी देत तो म्हणाला, 'मुकाट्यानं चल आमच्याबरोबर. नकार ऐकून घेण्याची मला सवय नाही. चल ऊठ, नाहीतर तुझी मान कापून तुझ्याच हातात देईन.'
संन्यासी त्याला म्हणाला, 'मान कापणार म्हणतोस? ठीक आहे, काप. माझ्याबद्दल म्हणशील तर ज्या दिवशी संन्यास घेतला त्याच दिवशी मी या मानेपासून फारकत घेतलीय. कर हे शीर धडावेगळं. ते जमिनीवर पडताना तूही पाहाशील आणि मीसुद्धा पाहीन. कारण मी त्या शिरापासून कधीचाच वेगळा झालोय. म्हणून म्हणतो, अजिबात वेळ नको दवडूस. उचल तुझी तलवार आणि घाल घाव या मानेवर.'
संन्याशाचं धाडस पाहून अलेक्झांडर जणू नव्यानं शुद्धीवर आला. त्यानं तलवार म्यानेत ठेवली. सैनिकांना तो म्हणाला, 'या माणसाला मारण्यात काही हशील नाही. याच्यावर कुणाचा हुकूमही चालणं शक्य नाही. मरणाला घाबरणार्यालाच आपण मरणाची भीती घालू शकतो.'
---
1 comment:
farach sundar
Post a Comment