Saturday, March 17, 2012

मिथ्या अभिमान

-संध्या पेडणेकर
युद्धचातुरी आणि अफाट ताकदीमुळे भरत चक्रवर्ती सम्राट बनला. सम्राट झाल्यानंतर त्याला आपल्या या गुणांबद्दल गर्व झाला. आपली बरोबरी इतर कोणताही राजा करू शकत नाही असं त्याला वाटायचं. अमर होण्याचे विचार त्याच्या मनात घोळू लागले आणि त्यासाठीच्या उपायांच्या शोधास तो लागला.
वृषभ पर्वताच्या उंच शिखरावर आपलं नाव लिहून अमर होण्याचा मार्ग त्याला पटला. त्यानुसार आपल्या प्रचंड लव्याजम्यानिशी तो वृषभ पर्वतावर गेला. या पर्वताची चढण अतिशय कठीण होती. त्याला वाटत होतं, या पर्वताचं शिखर काबीज करणारे आपण केवळ एकमेव. पण शिखरावरील दृश्य पाहून त्याची थोडी निराशा झाली. आपली समजूत चुकीची होती हे त्याच्या लक्षात आलं. वृषभ पर्वत पादाक्रांत करणार्‍या कित्येक चक्रवर्ती सम्राटांची नावं त्या दुरूह शिखरावर आधीपासूनच अंकित केलेली होती. आणखी एखादं नाव जोडण्यासाठीसुद्धा तेथे जागा शिल्लक नव्हती.
भरत खिन्न झाला. पण आपलं नाव तिथे अंकित करायचंच  हा त्याचा निर्धार होता. शेवटी त्यानं शिखरावरील एका सम्राटाचं नाव पुसून त्या जागी आपलं नाव कोरलं आणि तो आपल्या राज्यात परतला.
त्यानंतर बराच काळ लोटला तरी त्याच्या मनातून वृषभाचलाबद्दलची आठवण पुसली जात नव्हती आणि आठवण आली की त्याला खूप अस्वस्थ वाटायचं. आपल्या राजपुरोहिताला बोलावलं आणि आपल्या खिन्नतेचं कारण काय असू शकेल? - अशी विचारणा केली.
वयोवृद्ध राजपुरोहित म्हणाले, 'राजन्, आपण खिन्न आहात त्यामागील कारण थोडं वेगळं आहे. आपल्याला ज्या गोष्टीचा ध्यास होता ती गोष्टच आपण नष्ट केलीत. वृषभ पर्वताच्या अत्युच्च शिखरावर आपलं नाव लिहून ते अजरामर करायची आपली इच्छा होती. पण प्रत्यक्ष तिथे गेल्यावर इतर व्यक्तीचं नाव पुसून आपल्याला आपलं नाव तिथे लिहावं लागलं. यामुळे आपल्या इच्छेचा आधारच नष्ट झाला. आपली इच्छा फोल आहे हे आपणांस कळून चुकलं.
आपण पर्वतशिखरावर लिहिललेलं आपलं नावही कुणी ना कुणी पुसून टाकणार ही शंका  आज आपल्या मनात आहे. जीवनाच्या क्षणभंगूरतेचा असा अचानक साक्षात्कार झाल्याने आपण अस्वस्थ झालात महाराज!राजपुरोहिताचं बोलणं ऐकून भरत राजाला जीवनाच्या क्षणभुंगुरतेबरोबरच आपल्या  गर्वाची जाणीव झाली. त्यातील फोलपणा उमगला.
---

No comments: