![]() |
| http://www.aoc.gov/images/solon.jpg |
ख्रिस्तपूर्व 638-558 च्या काळात ग्रीसमध्ये सोलन नावाचे विचारक होऊन गेले. ते नेहमी खूप विचारपूर्वक, शब्द न शब्द तोलून-जोखून बोलायचे असं म्हणतात. ग्रीक सम्राट कारुंसुद्धा सोलन यांना खूप मानायचे. आपला भव्य राजमहाल, विशाल साम्राज्य आणि अपार संपदा सोलनने पाहावी, दोन कौतुकाचे शब्द बोलावे अशी त्यांची फार इच्छा होती. कारूंना वाटे, सोलनने आपल्याबद्दल म्हणावं की कारूंसारखा सुखी कुणी नाही. त्यांनीच असं म्हणावं अशी कारुंची इच्छा होती कारण ते कधीही तोंडदेखलं बोलत नाहीत अशी सोलन यांची ख्याती होती. कारुंला वाटायचं, सोलननी असं मत व्यक्त केलं तर लोकांचा आपल्याबद्दलचा आदर दुणावेल.
शेवटी एकदा कारुंनं सोलनला बोलावणं धाडलं.
सम्राटानं बोलावलं तेव्हा सोलन आले. त्यांनी सम्राटाचं सारं वैभव पाहिलं. प्रत्येक गोष्ट दाखविल्यानंतर सोलन काहीतरी बोलतील म्हणून कारूं वाट पाहायचे, पण सोलन काहीही बोलले नाहीत. उलट त्यांच्या चेहर्यावरचा गंभीर भाव आणखी आणखी वाढत गेला. शेवटी शेवटी तर त्यांचा चेहरा झाकोळू लागला.
कारुंना आश्चर्य वाटलं. दुःखही झालं. ते सोलनला म्हणाले, 'आपण काही बोलत का नाही? मी सुखाची परमावधी गाठलीय असं नाही का वाटत आपल्याला?'
यावर सोलन कारुंना म्हणाले, 'मी गप्प आहे हेच उत्तम आहे. कारण माझं बोलणं तुम्हाला सहन होणार नाही.' तरीही सम्राट कारुंनी सोलनला बोलतं करण्याचा प्रयत्न सोडला नाही. शेवटी सोलन म्हणाले,'जे क्षणभंगुर आहे त्याला मी सुख मानत नाही. जे शाश्वत नाही ते सुखावह होऊच शकत नाही.'
झालं. सोलन यांचं बोलणं ऐकताच सम्राट कारुंच्या रागाचा पारा चढला. त्यांनी लगेच सैनिकांना बोलावून सोलनचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिला. मारण्याआधी सम्राटांनी सोलनला बर्याच वेळा म्हटलं, 'वाटल्या सअजूनही माफी माग. आणि म्हण की - सम्राट कारुं सगळ्यात जास्त सुखी आहे. आत्ता तुला मुक्त करतो.'
पण सोलन आपल्या मतावर अढळ होते. निश्चिंत मनानं ते सम्राटाला म्हणाले, 'मला माझे प्राण गमवावे लागले तरी बेहेत्तर, मी खोटं बोलू शकत नाही.'
सोलनना माफ करण्याएवढं सम्राट कारुंचं मनही मोठं नव्हतं. शेवटी सोलनचं शीर धडावेगळं करण्यात आलं.
काही वर्षांनी पारस देशाचा राजा सायरसनं सम्राट कारुंला युद्धात पराजित केलं आणि त्यांच्या राज्यावर ताबा मिळविला. त्यानं कारुंला एका खांबाला बांधलं आणि आपल्या सैनिकांना आज्ञा दिली- 'याच्या शरीराच्या चिंधड्या करा.'
तेव्हा सम्राट कारुंला सोलनच्या म्हणण्यातील शब्द न् शब्द पटला. सोलनचे शब्द आठवल्यानं शेवटच्या क्षणीसुद्धा सम्राट कारुंच्या चेहर्यावर स्मितहास्य होतं. शेवटी त्यांच्या तोंडून शब्द निघाले - 'सोलन, मला माफ करा. आपलं म्हणणं बरोबर होतं.'
कारुंचं बोलणं ऐकून सायरसनं कारुंकडे सोलनबद्दल विचारपूस केली. सोलनबद्दल ऐकून सायरस इतका प्रभावित झाला की त्यानं सम्राट कारूंला जीवनदान दिलं.
---
- गोष्ट काही ऐतिहासिक तथ्यांवर आधारित असली तरी पूर्णपणे काल्पनिक असावी.
- सोलनबद्दल ऐतिहासिक माहितीसाठी लिंक - http://en.wikipedia.org/wiki/Solon#Constitutional_reform

2 comments:
खूपच छान .......
धन्यवाद मधु.
Post a Comment