Thursday, October 25, 2012

स्वतःपासून सुरवात


-संध्या पेडणेकर
युद्धाचे दिवस. राजाचे सैनिक सगळीकडे विखुरलेले होते. ते ज्या गावात जात त्या गावातल्या लोकांना इच्छा असो वा नसो त्यांच्या राहाण्या-खाण्याची व्यवस्था करावी लागे. लोकांमध्ये देशभक्तीची उणीव होती असे नव्हे. सैनिकांचे वागणे, त्यांचा क्रूरपणा आणि अकारण नासधूस करण्याची सवय यामुळे लोक त्यांच्यापासून चार हात लांब रहाणेच पसंत करीत असत.
एके दिवशी सैनिकांच्या अधिकार्यानं एका शेतकर्‍याला विचारलं, ‘गावात कुणाच्या शेतात पीक चांगलं उभं आहे ते सांग. आता आठवडाभरापर्यंत आमचा येथेच मुक्काम रहाणार आहे. आम्हाला आपल्या खाण्या-पिण्याची आणि घोड्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करायचीय.’
शेतकरी पेचात पडला. सांगितले नाही तर सैनिकांच्या तावडीत सापडणार, ते आपल्याला यथेच्छ बुकलणार आणि सांगायचं तर ज्या शेतकर्‍याबद्दल सांगायचं त्याच्या संपूर्ण शेतावर सैनिकांचा नांगर फिरणार. वर्षभर मग त्याच्या घरातले लोक काय खाणार? त्यांच्या इतर गरजा कशा पूर्ण होणार?
चालता चालता त्याने मनाशी एक निर्णय घेतला.
गावकर्‍यांच्या शेतांतून ते फिरत होते. सैनिकांनी बर्‍याच शेतांकडे बोट दाखवून तेथील पीक चांगले असल्याचं सांगितलं पण दरवेळी आपल्याला इथली जास्त माहिती असल्याचं सांगत त्या शेतकर्‍यानं त्यांना पुढे नेलं. दरवेळी तो म्हणायचा, 'यापेक्षा चांगलं पीक कुठे उभं आहे ते मला ठाऊक आहे, पुढे चला.'
शेवटी सगळे एका शेतापाशी पोहोचले. समोर उभ्या पिकाकडे बोट दाखवून शेतकरी म्हणाला की, या शेतातलं पीक सर्वात चांगलं आहे.
सैनिक अधिकारी भडकला. म्हणाला, ‘वेड लागलं का रे तुला? यापेक्षा कैक पटींनी चांगल्या पिकांची शेतं आपण मागे टाकून आलो की. असं का केलंस?'
शेतकरी सैनिकांच्या अधिकार्‍याला म्हणाला, 'शेतकर्‍यांना त्यांच्या पिकाची किंमत तुम्ही देणार नाही हे मला ठाऊक होतं. अशावेळी मी इतर कुणाचं नुकसान कसं करणार? हे पीकच शेतकर्‍यांची वर्षभराची कमाई. यावरच ते आपल्या संसाराचा गाडा रेटतात. त्यांची ही कमाई मी कशी काय हिरावू देणार? आणि  मी खोटं बोललो नाहीय. हे माझं शेत आहे. माझ्या दृष्टीनं याच शेतातलं पीक सर्वात जास्त चांगलं आहे.'
शेतकर्‍याचं बोलणं ऐकून सैनिक अधिकारी शरमिंधा झाला. त्याने शेतकर्‍याला त्याच्या पिकाची किंमत तर दिलीच, शिवाय, न घाबरता त्याने जी उत्तरे दिली त्यासाठी त्याला बक्षीसही दिले.
---

No comments: