-संध्या पेडणेकर
एकदा एक म्हातारा एका खेडेगावातील रस्त्यावरून
हळूहळू चालला होता. त्याचा लांब-ढगळ झगा, शुभ्र पांढर्या आणि लांबलचक
दाढी-मिश्या, सुरकुत्यांनी भरलेला चेहरा तिथल्या लहान मुलांना गमतीदार वाटला
असावा. एक-एक करत चांगला दहा-बारा मुलांचा घोळका म्हातार्याच्या मागे मागे चालू
लागला. मुलांमध्ये आणि वानरांमध्ये तसा फारसा फरक नसतो. मुकाट चालतील तर ती मुलं
कसली? हळूहळू त्यांचा वात्रटपणा जागा झाला. त्यांनी म्हातार्याला हैराण करायला
सुरवात केली. शेवटी जेव्हा ते म्हातार्यावर रस्त्यावरचे खडे उचलून फेकू लागले
तेव्हा म्हातार्यानं ठरवलं की खूप झालं.
म्हाताराही बनेल होता. मुलांनी पिच्छा सोडावा
म्हणून त्यानं मुलांना एक लोणकढी थाप ठोकली.
मागे वळून त्यानं मुलांना जवळ बोलावलं आणि
म्हणाला, ‘मी कुठे निघालोय ते तुम्हाला ठाऊक आहे का? अरे बाळांनो, आज आपला राजा सगळ्यांना मेजवानी
देतोय. तुम्हाला ठाऊक नाही का? मी असा हळूहळू चालत निगालोय, पोहोचेपर्यंत मेजवानी संपू
नये म्हणजे झालं!’
मग जिभल्या चाटत म्हातार्यानं मागल्या वेळी
राजानं मेजवानीत काय काय पक्वान्नं खाऊ घातली होती त्याचं रसभरीत वर्णन केलं. त्या
पक्वान्नांचा सुगंध, तेथील एकूण थाटमाट, मिठाया, सरबतं वगैरेंचं त्यानं केलेलं
वर्णन ऐकून मुलांनी त्याचा पिच्छा सोडून तेथून पोबारा केला.
म्हातार्यानं सुटकेचा श्वास सोडला आणि तो पुढे
निघाला.
वयोमानामुळे तो अगदी हळूहळू चालत होता.
थोडं अंतर चालून गेला असेल-नसेल तो गावातली काही
मंडळी लगबगीनं राजमहालाच्या दिशेनं चालल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानं सहज
विचारलं तेव्हा गावकर्यांनी त्याला सांगितलं की राजा मेजवानी देतोय म्हणून आम्ही
सगळे त्या मेजवानीत सामील होण्यासाठी निघालो आहेत.
आणखी थोडं पुढे गेल्यावर त्याला आणखी काही लोक
राजमहालाच्या दिशेनं जाताना दिसले. राजा खरोखर मेजवानी तर देत नसेल ना? –असा विचार त्या म्हातार्याच्या
मनात आला.
आणखी थोडं अंतर चालल्यानंतर त्याला राजमहालाकडे
निगालेले णखी काही लोक भेटले. ते सगळे मेजवानीत सामील होण्यासाठी निघाले आहेत हेही
त्याला समजलं.
म्हातारा बावचळला. त्याला वाटलं, खरंच राजा
मेजवानी देत असणार. नाहीतर इतके लोक राजवाड्याकडे का बरं गेले असते? आपणही जाऊन पाहावं. बरेच
दिवस झाले पक्वान्नं खाऊन. नसेल मेजवानी देत राजा तरी फार फार तर काय होणार? तर, माझी फेरी फुकट जाणार. आपल्याला
असं काय मोठं महत्वाचं काम करायचंय सध्या? यावेळच्या मेजवानीचा काय थाटमाट आहे ते तरी
पाहू की!
म्हातार्याची पावलं आपसुक राजवाड्याच्या दिशेला
वळली.
No comments:
Post a Comment