Monday, October 29, 2012

भीती कुणाची?

-संध्या पेडणेकर
एकदा टॉलस्टॉय भल्या पहाटे उठून चर्चमध्ये गेले.
आपण दरवेळी जातो तेव्हा देव भक्तांच्या गर्दीत असतो, आज आपण देवाला एकट्याला भेटू असा विचार त्यांनी केला.
पण ते जेव्हा चर्चमध्ये पोहोचले तेव्हा तेथे आधीच एक माणूस गुडघे टेकून बसला होता आणि देवाच्या मूर्तीबरोबर काहीतरी बोलत होता. तो बोलत असलेले काही शब्द टॉलस्टॉयच्या कानांवर पडले.
तो म्हणत होता, 'देवा मला माफ कर... सांगतानासुद्धा शरमिंधं व्हावं इतकी मी पापे केली आहेत. माफ कर मला...'
टॉलस्टॉयला वाटलं, किती महान व्यक्ती आहे ही. अगदी खुल्या दिलाने देवाकडे आपल्या हातून घडलेल्या पापांसाठी क्षमा मागतेय. पश्चातापानं बहुधा पोळून निघालेला दिसतोय.
तेव्हढ्यात त्या व्यक्तीची नज़र या माणसावर पडली. गोंधळून गेल्यासारखा वाटला तो क्षणभर. मग टॉलस्टॉयना म्हणाला, 'महाशय, देवाशी माझा जो संवाद चालला होता तो आपण ऐकला तर नाही?'
टॉलस्टॉय म्हणाले, 'हो, मला आपलं बोलणं ऐकू आलं आणि खरं सांगतो, धन्य वाटलं मला अगदी. आपल्या अपराधांची कबूली दिलीत आपण, मला आदर वाटतो आपल्याबद्दल.'
तो माणूस म्हणाला, 'ते सगळं ठीक आहे, पण कृपा करून आपण या गोष्टी इतर कुणाला सांगू नका. खरं तर या केवळ माझ्या आणि देवामधल्या गोष्टी. आपण ऐकल्या म्हणता तर ठीक आहे, पण कृपया इतर कुणालाही सांगू नका. आणि सांगितल्या तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा...   '
टॉलस्टॉयनी आश्चर्यानं विचारलं, 'पण आत्ता आपण देवासमोर आपल्या अपराधांबद्दल पश्चाताप व्यक्त करत होतात, आणि आता...'
तो माणूस म्हणाला, 'त्या केवळ माझ्या आणि देवामधल्या गोष्टी होत्या. जगासाठी नव्हत्या त्या.'
टॉलस्टॉयना वाटलं, असं आहे तर, म्हणजे लोक  इतर लोकांनाच घाबरतात, देवाला नाही!
---

Thursday, October 25, 2012

स्वतःपासून सुरवात


-संध्या पेडणेकर
युद्धाचे दिवस. राजाचे सैनिक सगळीकडे विखुरलेले होते. ते ज्या गावात जात त्या गावातल्या लोकांना इच्छा असो वा नसो त्यांच्या राहाण्या-खाण्याची व्यवस्था करावी लागे. लोकांमध्ये देशभक्तीची उणीव होती असे नव्हे. सैनिकांचे वागणे, त्यांचा क्रूरपणा आणि अकारण नासधूस करण्याची सवय यामुळे लोक त्यांच्यापासून चार हात लांब रहाणेच पसंत करीत असत.
एके दिवशी सैनिकांच्या अधिकार्यानं एका शेतकर्‍याला विचारलं, ‘गावात कुणाच्या शेतात पीक चांगलं उभं आहे ते सांग. आता आठवडाभरापर्यंत आमचा येथेच मुक्काम रहाणार आहे. आम्हाला आपल्या खाण्या-पिण्याची आणि घोड्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करायचीय.’
शेतकरी पेचात पडला. सांगितले नाही तर सैनिकांच्या तावडीत सापडणार, ते आपल्याला यथेच्छ बुकलणार आणि सांगायचं तर ज्या शेतकर्‍याबद्दल सांगायचं त्याच्या संपूर्ण शेतावर सैनिकांचा नांगर फिरणार. वर्षभर मग त्याच्या घरातले लोक काय खाणार? त्यांच्या इतर गरजा कशा पूर्ण होणार?
चालता चालता त्याने मनाशी एक निर्णय घेतला.
गावकर्‍यांच्या शेतांतून ते फिरत होते. सैनिकांनी बर्‍याच शेतांकडे बोट दाखवून तेथील पीक चांगले असल्याचं सांगितलं पण दरवेळी आपल्याला इथली जास्त माहिती असल्याचं सांगत त्या शेतकर्‍यानं त्यांना पुढे नेलं. दरवेळी तो म्हणायचा, 'यापेक्षा चांगलं पीक कुठे उभं आहे ते मला ठाऊक आहे, पुढे चला.'
शेवटी सगळे एका शेतापाशी पोहोचले. समोर उभ्या पिकाकडे बोट दाखवून शेतकरी म्हणाला की, या शेतातलं पीक सर्वात चांगलं आहे.
सैनिक अधिकारी भडकला. म्हणाला, ‘वेड लागलं का रे तुला? यापेक्षा कैक पटींनी चांगल्या पिकांची शेतं आपण मागे टाकून आलो की. असं का केलंस?'
शेतकरी सैनिकांच्या अधिकार्‍याला म्हणाला, 'शेतकर्‍यांना त्यांच्या पिकाची किंमत तुम्ही देणार नाही हे मला ठाऊक होतं. अशावेळी मी इतर कुणाचं नुकसान कसं करणार? हे पीकच शेतकर्‍यांची वर्षभराची कमाई. यावरच ते आपल्या संसाराचा गाडा रेटतात. त्यांची ही कमाई मी कशी काय हिरावू देणार? आणि  मी खोटं बोललो नाहीय. हे माझं शेत आहे. माझ्या दृष्टीनं याच शेतातलं पीक सर्वात जास्त चांगलं आहे.'
शेतकर्‍याचं बोलणं ऐकून सैनिक अधिकारी शरमिंधा झाला. त्याने शेतकर्‍याला त्याच्या पिकाची किंमत तर दिलीच, शिवाय, न घाबरता त्याने जी उत्तरे दिली त्यासाठी त्याला बक्षीसही दिले.
---

Friday, October 19, 2012

वैराग्यातील उणीव

-संध्या पेडणेकर
पुराणात राजा भर्तृहरींबद्दल एक कथा आहे. त्यांना वैराग्य आलं तेव्हा त्यांनी आपल्या राज्याचा त्याग केला. त्यावेळी पार्वतीने शंकरासमोर त्यांच्या त्यागाची वाखाणणी केली. पण शंकर म्हणाले, 'त्यांच्या त्यागात उणीवा आहेत.'
पार्वतीनं विचारलं, 'कोणत्या उणीवा?'
शंकर म्हणाले, 'भर्तृहरीनं राज्याचा त्याग भले केला असेल, पण संन्याशाच्या जीवनाची सुरवात करताना त्यांनी काही वस्तू सोबत घेतल्या. राजमहालातून निघताना त्यांनी पाण्याचं भांडं, उशी आणि हवा ढाळण्यासाठी पंखा सोबत घेतला.' यावर पार्वती निरुत्तर झाली.
काही काळानंतर साधनेच्या क्रमात वैराग्याची खोली वाढत गेली हळूहळू या तिन्ही वस्तूंची त्यांना असलेली गरज संपली.  पार्वतीने त्यांच्या वैराग्याबद्दल विचारलं तेव्हाही शंकर म्हणाले, 'अजूनही उणीव आहे.'
पार्वतीनं विचारलं, 'आता कुठली उणीव आहे? वैराग्याबद्दलचे आपले अनुभव लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते वैराग्यशतक लिहिताहेत, भिक्षा मागणंही त्यांनी सोडून दिलंय. मिळालं तर खातात, नाही मिळालं तर काही खातही नाहीत.  बराच काळपर्यंत खायला काही मिळालं नाही तर पिंडदानासाठी आलेल्या पिठाच्या भाकर्‍या थापून त्या चितेच्या आगीवर भाजून खातात. अजून त्यांच्या वैराग्यात उणीव आहे असं म्हणता तर ती कोणती ते सांगा.'
ही गोष्ट सांगून समजण्यासारखी नाही हे शंकराच्या लक्षात आलं होतं. ते म्हणाले, चला आपण प्रत्यक्षच पाहू. मग दोघेही वेष पालटून भर्तृहरीसमोर आले. शंकरानं वृद्धाचा आणि पार्वतीनं वृद्धेचा वेष घेतला होता. त्यांनी भर्तृहरीकडे भिक्षा मागितली.
भर्तृहरींना गेले तीन दिवस भिक्षा मिळाली नव्हती. त्यादिवशी त्यांना थोडं पीठ मिळालं होतं त्याच्या भाकर्‍या ते भाजत होते. त्यांनी या वृद्ध जोडप्याला बसवलं आणि सार्‍या भाकर्‍या त्यांना दिल्या.
यावर त्यांच्या वैराग्याच्या पूर्ततेबद्दल पार्वतीने नजरेनंच शंकराला विचारलं.
त्यावर शंकर नजरेनंच उत्तरले, 'नाही'.
वृद्ध दांपत्यामध्ये चाललेली नजरेच्या खुणांची देवघेव भर्तृहरींच्या नजरेतून निसटली नव्हती. त्यांनी कुतूहलानं विचारलं तेव्हा पार्वतीनं केलेल्या पृच्छेबद्दल सांगताना शंकर म्हणाले, 'या विचारताहेत की,  यानं सगळ्या भाकर्‍या आपल्याला दिल्या. आता हा काय खाणार? आपण याला काही भाकर्‍या देऊया.'
ते ऐकलं आणि भर्तृहरींचा अहंकार डिवचला गेला. ते म्हणाले, 'आपण मला ओळखत नाही. एवढ्या मोठ्या साम्राज्याचा मोह बाळगला नाही तर या चार भाकर्‍यांचा मोह  मी काय बाळगणार? न्या सगळ्या भाकर्‍या, आणि अगदी शांत चित्तानं आपली भूक भागवा. यातच माझा संतोष सामावलेला आहे.'
शंकर काही बोलणार त्याआधी पार्वती म्हणाली, 'आलं माझ्या लक्षात. भर्तृहरीनं लौकीक वस्तूंचा त्याग केला पण त्यांच्या मनात अजूनही यशाची आसक्ती आणि अहंकार ठाण मांडून आहेत. भगवन्, बरोबर आहे आपलं, यांच्या वैराग्यात उणीवा आहेत.'
---

Wednesday, October 10, 2012

जुगाराचा अड्डा आणि स्मशान

-संध्या पेडणेकर
एकदा चीनचे प्रसिद्ध तत्ववेत्ते कन्फ्यूशियस यांना भेटायला एक माणूस आला. तो त्यांना म्हणाला, 'मला तपस्या करायचीय.'
कन्फ्यूशियस त्याला म्हणाले, 'ठीक आहे. पण मला असं वाटतं की ध्यानधारणा शिकण्याआधी तू दोन ठिकाणांना भेट द्यावीस. असं कर, तू जुगाराच्या अड्यावर जा. तेथे लोक काय करतात ते लक्ष देऊन पाहा. स्वतः काहीही करायचं नाही, फक्त पाहायचं. आणि ते पाहून तुला काय वाटलं ते मला सांगायचं.'
दोन महिन्यांनंतर तो माणूस कन्फ्यूशियसना भेटायला आला. म्हणाला, 'लोक वेडे आहेत.'
कन्फ्यूशियस त्याला म्हणाले, 'ठीक आहे, आता मी साधनेचं दुसरं सूत्र तुला देतो. आता पुढचे दोन महिने तू स्मशानात जाऊन बस. तेथे जळणारी मढी पाहा.'
दोन महिन्यांनंतर तो माणूस पुन्हा परतला. म्हणाला, 'आपण माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. माझे डोळे उघडले. हे जीवन एक मोठा जुगार आहे  आणि त्याचा शेवट स्मशानात होतो, हे मला समजलं.'
कंन्फ्यूशियस त्याला म्हणाले, 'जीवनाचं रहस्य तू जाणलंस. आता तू ध्यानधारणेच्या अंतर्यात्रेसाठी निघू शकतोस.'
---

Friday, October 5, 2012

जाळं आपलं न् शिकारही स्वतःचीच


-संध्या पेडणेकर
एकदा एक म्हातारा एका खेडेगावातील रस्त्यावरून हळूहळू चालला होता. त्याचा लांब-ढगळ झगा, शुभ्र पांढर्‍या आणि लांबलचक दाढी-मिश्या, सुरकुत्यांनी भरलेला चेहरा तिथल्या लहान मुलांना गमतीदार वाटला असावा. एक-एक करत चांगला दहा-बारा मुलांचा घोळका म्हातार्‍याच्या मागे मागे चालू लागला. मुलांमध्ये आणि वानरांमध्ये तसा फारसा फरक नसतो. मुकाट चालतील तर ती मुलं कसली? हळूहळू त्यांचा वात्रटपणा जागा झाला. त्यांनी म्हातार्‍याला हैराण करायला सुरवात केली. शेवटी जेव्हा ते म्हातार्‍यावर रस्त्यावरचे खडे उचलून फेकू लागले तेव्हा म्हातार्‍यानं ठरवलं की खूप झालं.
म्हाताराही बनेल होता. मुलांनी पिच्छा सोडावा म्हणून त्यानं मुलांना एक लोणकढी थाप ठोकली.
मागे वळून त्यानं मुलांना जवळ बोलावलं आणि म्हणाला, मी कुठे निघालोय ते तुम्हाला ठाऊक आहे का? अरे बाळांनो, आज आपला राजा सगळ्यांना मेजवानी देतोय. तुम्हाला ठाऊक नाही का? मी असा हळूहळू चालत निगालोय, पोहोचेपर्यंत मेजवानी संपू नये म्हणजे झालं!’
मग जिभल्या चाटत म्हातार्‍यानं मागल्या वेळी राजानं मेजवानीत काय काय पक्वान्नं खाऊ घातली होती त्याचं रसभरीत वर्णन केलं. त्या पक्वान्नांचा सुगंध, तेथील एकूण थाटमाट, मिठाया, सरबतं वगैरेंचं त्यानं केलेलं वर्णन ऐकून मुलांनी त्याचा पिच्छा सोडून तेथून पोबारा केला.
म्हातार्‍यानं सुटकेचा श्वास सोडला आणि तो पुढे निघाला.
वयोमानामुळे तो अगदी हळूहळू चालत होता.
थोडं अंतर चालून गेला असेल-नसेल तो गावातली काही मंडळी लगबगीनं राजमहालाच्या दिशेनं चालल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानं सहज विचारलं तेव्हा गावकर्‍यांनी त्याला सांगितलं की राजा मेजवानी देतोय म्हणून आम्ही सगळे त्या मेजवानीत सामील होण्यासाठी निघालो आहेत.
आणखी थोडं पुढे गेल्यावर त्याला आणखी काही लोक राजमहालाच्या दिशेनं जाताना दिसले. राजा खरोखर मेजवानी तर देत नसेल ना? –असा विचार त्या म्हातार्‍याच्या मनात आला.
आणखी थोडं अंतर चालल्यानंतर त्याला राजमहालाकडे निगालेले णखी काही लोक भेटले. ते सगळे मेजवानीत सामील होण्यासाठी निघाले आहेत हेही त्याला समजलं.
म्हातारा बावचळला. त्याला वाटलं, खरंच राजा मेजवानी देत असणार. नाहीतर इतके लोक राजवाड्याकडे का बरं गेले असते? आपणही जाऊन पाहावं. बरेच दिवस झाले पक्वान्नं खाऊन. नसेल मेजवानी देत राजा तरी फार फार तर काय होणार? तर, माझी फेरी फुकट जाणार. आपल्याला असं काय मोठं महत्वाचं काम करायचंय सध्या? यावेळच्या मेजवानीचा काय थाटमाट आहे ते तरी पाहू की!
म्हातार्‍याची पावलं आपसुक राजवाड्याच्या दिशेला वळली.