Monday, January 25, 2016

मनाचे मंदिर

©संध्या पेडणेकर/
एक संन्यासी आणि एक गणिका समोरासमोर रहात असत. दोघांचाही एकाच दिवशी मृत्यू झाला. वैकुठात देवदूत गणिकेला स्वर्गात आणि संन्याशाला नरकात घेऊन चालले. तेव्हा संन्याशानं तक्रार करत म्हटलं, अरे, काय करताय? मी संन्यासी आहे. जीवनभर मी मंदिरात राहिलो आणि देवभक्ती केली. आणि तुम्ही मला नरकात घेऊन चाललाय? आणि या पापिणीला, व्यभिचारिणीला स्वर्गात नेताय?’

देवदूतांनाही काहीतरी गडबड होतेय असं वाटलं. त्यांच्यापैकी एकानं जाऊन पुन्हा चौकशी केली. परत येऊन त्यानं म्हटलं, कोणतीही गफलत झालेली नाही. संन्याशाचा वैराग वरवरचा होता. मनात त्याला नेहमी असंच वाटत असे की मी इथे देवाच्या पूजेअर्चेत मग्न आहे आणि ही गणिका आनंदात मग्न आहे. सकाळी तो देवाच्या दाराची घंटा वाजवत असे पण त्याच्या मनात मात्र गणिकेच्या घरातली गाणीच गुंजारव करत राहिली. त्याने केलेल्या पूजेअर्चेला काहीही अर्थ नव्हता कारण त्याचं मन नेहमी गणिकेच्या घरी काय चाललं असेल या विकारी विचारांत मग्न असे.
आणि गणिकेचं अगदी याउलट होतं. सकाळी मंदिराची घंटा वाजली की तिचं मन भगवत्चरणी लीन होत असे. तिला आपल्या दुर्भाग्याचं वाईट वाटत असे. आपलं जीवन असंच व्यर्थ जाणार याचं तिला अतोनात दुःख होत असे. आपण कधीही परमात्म्याचं चिंतन करू शकणार नाही असं तिला वाटे. अशा प्रकारे संन्यासी मनानं जन्मभर गणिकेच्या घरी राहिला आणि गणिका मनानं मंदिरात रमली.
म्हणूनच, तो देवदूत म्हणाला, कोणतीही गफलत झालेली नाही. मनाशिवाय शरीराचं अस्तित्व ते काय. माणूस तिथेच असतो जिथे त्याचं मन असतं.

No comments: