Saturday, August 24, 2019

मरण नकोच


©संध्या पेडणेकर
एका जंगलात एक गरीब, म्हातारा लाकूडतोड्या राहत असे. तो जीवनाला खूप कंटाळला होता. खूप दुखी होता तो. दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतरही त्याला पोटाची खळगी भरण्यापुरतं अन्नही मिळत नसे. दिवसेंदिवस तो खंगत चालला होता. अशक्तपणामुळे त्याला काम करताना खूप त्रास व्हायचा. त्याची काळजी घेण्यासाठी त्याच्याबरोबर इतर कोणी नव्हतं.
एके दिवशी तो जंगलात लाकडे तोडायला गेला. कष्टामुळे अधून-मधून तो कण्हत होता. अचानक त्याच्या मनात आलं, कष्टात असं जगण्याऐवजी मला मृत्यू आला तर किती बरं होईल!
लाकूडतोड्याच्या मनात हे आलं आणि त्याला आपल्या मागे कोणीतरी उभं असल्याचा भास झाला. तो मागे वळून बघणार एवढ्यात कोणाचातरी भक्कम हात त्याच्या खांद्यावर आला.
लाकूडतोड्याचा थरकाप उडाला. त्याने मागे वळून पाहिलं पण तिथे कुणीच नव्हतं. मात्र त्याला आपल्या खांद्यावर कुणाच्यातरी हाताचा स्पर्श स्पष्ट जाणवत होता. कोणीतरी आहे असं त्याला खात्रीपूर्वक वाटलं. तो काही बोलण्याआधी ती अदृश्य व्यक्ती त्याला म्हणाली, मी मृत्यू. यम. आत्ताच तुला माझी आठवण आली ना? म्हणून मी तातडीने झालो. सांग, काय करू तुझ्यासाठी?’
यमाचं नाव ऐकलं आणि म्हाताऱ्या लाकूडतोड्याची घाबरगुंडी उडाली. त्याला खूप घाम फुटला. कसाबसा धीर एकवटून तो म्हणाला, हे मृत्यू देवता, मी बिचारा गरीब लाकूडतोड्या, तुमच्याकडे माझं काय काम असणार?’
यम त्याला म्हणाला, माझंही तुझ्याकडे काहीच काम नाहीये, पण आत्ता तू माझी आठवण काढलीस म्हणून मी हजर झालो.
थरथर कापत लाकूडतोड्या यमाला म्हणाला, हे मृत्यू देवता, माफ करा मला. माझ्याकडून चूक झाली. लाकडाचा हा भारा उचलायसाठी मला कोणीतरी मदतीला हवं होतं. म्हणून मला तुमची आठवण आली, पुन्हा कधीही माझ्याकडून अशी चूक होणार नाही. आणि चुकून जर माझ्या तोंडी तुमचं नाव आलं तरी एका गरीब लाकूडतोड्याची हाक ऐकून लगेच त्याच्या मदतीला धावत येण्याचे कष्ट तुम्ही घेऊ नका. मला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही, खूप सुखी आहे मी!’

No comments: