-संध्या पेडणेकर
नागार्जुन एक फकीर होते. एक राणी त्यांच्या
व्यक्तीमत्वावर भाळली. एके दिवशी साहस एकवटून तिने नागार्जुनांना आपल्या महालात येण्याचे
आमंत्रण दिले. त्यांच्या सानिध्यात काही क्षण घालविण्याची तिची इच्छा होती. त्यांचे
अभाव दूर करण्यासाठी त्यांना काहीतरी देण्याचीही तिची इच्छा होती.
नागार्जुनांनी राणीचं आमंत्रण स्वीकारलं. राणीच्या
महालात ते तिचा पाहुणचार स्वीकारण्यासाठी गेले. त्यांच्या येण्यानं राणी आनंदली. तिने त्यांचे
स्वागत केले. त्यांची उत्तम सरबराई राखली.
संध्याकाळ झाली तशी नागार्जुनांनी राणीचा निरोप
घेतला. निरोप देताना राणी अत्यंत नम्रतेनं त्यांना म्हणाली, ‘महाराज, मला आपणाकडून काही
हवंय.’
काय हवंय?, असं नागार्जुनांनी राणीला विचारलं.
राणी म्हणाली, ‘आपण आपलं भिक्षापात्र जर मला दिलंत तर.... ’
पटकन नागार्जुनांनी राणीला आपलं भिक्षापात्र
दिलं. राणीनं मग त्यांना एक रत्नजडित स्वर्णपात्र दिलं. ती म्हणाली, ‘त्या पात्राऐवजी आपण हे
पात्र घ्या. मी दररोज आपल्या भिक्षापात्राची पूजा करेन.’
राजमहालातून बाहेर पडताच नागार्जुनांच्या
हातातील त्या मौल्यवान पात्रावर एका चोराची नजर खिळली. तो त्यांचा पाठलाग करू
लागला. एकांत मिळताच त्यांच्या हातून ते पात्र हिसकावून घेण्याचा त्याचा विचार
होता.
थोडं तर चालून गेल्यानंतर नागार्जुनांनी हातातील
ते पात्र फेकून दिलं.
तत्क्षणी चोरानं ते उचललं.
त्याला वाटलं, काय माणूस आहे हा! एव्हढं बहुमूल्य पात्र
यानं सरळ फेकून दिलं?
काही का असेना, आपल्याला ते मिळालं ना, झालं तर. मग त्याच्या मनात विचार आला, आपण निदान यासाठी त्याचे आभार मानायला हवेत.
काही का असेना, आपल्याला ते मिळालं ना, झालं तर. मग त्याच्या मनात विचार आला, आपण निदान यासाठी त्याचे आभार मानायला हवेत.
पुढे होऊन त्यानं नागार्जुनांना रोखलं. म्हणाला,
‘महाराज, मला आपले आभार मानायचे आहेत. आपल्यासारखे लोकही या जगात आहेत यावर
आत्तापर्यंत माझा अजिबात विश्वास नव्हता. मला आपली पायधूळ घेण्याची परवानगी द्या. ’
नागार्जुन हसतच त्याला म्हणाले, ‘जरूर.’
चोरानं खाली वाकून त्यांच्या पायांवर हात ठेवला
आणि तो आपल्या कपाळी लावला. त्या क्षणी त्याच्या कृतज्ञ हृदयात त्या पुसटशा
स्पर्शानं जे भाव जागृत झाले त्यामुळे तो व्याकुळला. नागार्जुनांना त्यानं
विचारलं, ‘बाबा, मला आपल्यासारखं व्हायचं असेल तर किती जन्म घ्यावे लागतील?’
नागार्जुन त्याला म्हणाले, ‘किती जन्म? तुझी इच्छा असेल तर तसं
आत्ता, या क्षणीही घडू शकतं.’
त्या क्षणानंतर चोर चोर राहिला नाही. पुढे तो
नागार्जुनांचा शिष्य बनला.