Monday, January 30, 2012

ब्रह्मर्षी विश्वामित्र

विश्वामित्र स्वतःला ब्रह्मर्षी म्हणवून  घेऊ इच्छीत होते पण वशिष्ठ मुनी त्यांना नेहमी राजर्षीच म्हणायचे. वशिष्ठांनी ब्रह्मर्षी म्हटल्याशिवाय लोक त्यांना ब्रह्मर्षी कसे म्हणणार? वशिष्ठांकडून मान्यता मिळेपर्यंत लोकही विश्वामित्रांना ब्रह्मर्षी मानायला तयार नव्हते. त्यामुळे तेढ वाढतच गेली. गोष्ट इतक्या गंभीर थराला गेली की एक दिवस विश्वामित्र तलवार घेऊन ब्रह्मर्षींच्या आश्रमात पोहोचले. आज काय तो सोक्षमोक्ष लावायचाच असा त्यांनी पक्का निर्धार केला होता. आज वशिष्ठांनी आपल्याला जर ब्रह्मर्षी म्हटलं नाही तर, त्यांची मान धडावेगळी करायचा निर्णयच त्यांनी घेतला होता.
वशिष्ठ विश्वामित्रांना ब्रह्मर्षी म्हणायला तयार नव्हते कारण त्यांना वाटे की, विश्वामित्राच्या मनात आपल्या तपस्येबद्दल गर्वाची भावना आहे.
विश्वामित्र जेव्हा वशिष्ठांच्या आश्रमात पोहोचले तेव्हा वशिष्ठ मुनी आणि त्यांच्या  शिष्यांमध्ये चर्चा चाललेली होती.  विश्वामित्र जवळच्या झाडीत लपून बसले आणि संधीची वाट पाहू लागले. संधी मिळाली की वार करायचा असं त्यांनी ठरवलं होतं.
तेवढ्यात एका शिष्यानं  वशिष्ठांना  प्रश्न विचारला, 'विश्वामित्रांनी एवढी कठोर तपस्या केली तरी आपण त्यांना ब्रह्मर्षी का म्हणत नाही?' त्यावर वशिष्ठ म्हणाले, 'विश्वामित्र श्रेष्ठ तपस्वी आहेत यात शंकाच नाही. ते ब्रह्मर्षी होतील अशी मला आशा वाटतेही. पण म्हणून मी त्यांना आधीपासून ब्रह्मर्षी म्हणणार नाही. ते जेव्हा त्या पदाला पोहोचतील तेव्हाच मी त्यांना ब्रह्मर्षी म्हणेन. अजूनही त्यांच्यात क्षत्रियाची घमेंड शिल्लक आहे. तलवार अजून त्यांच्या हातून सुटली नाहीय. ज्या दिवशी त्यांच्या हातून तलवार सुटेल त्या दिवशी मी त्यांना ब्रह्मर्षी म्हणेन. मी काही त्यांचा दुस्वास करत नाही.'
गुरुशिष्यातील हा संवाद झाडीमागे लपलेल्या विश्वामित्रांनी ऐकला. वशिष्ठ आपल्याबद्दल इतक्या प्रेमानं बोलत असतील यावर त्यांचा विश्वासच बसेना.  त्यांच्या हातून तलवार गळून पडली. धावत जाऊन त्यांनी वशिष्ठांचे पाय पकडले. वशिष्ठांनी त्यांना उठवलं, म्हणाले, 'ब्रह्मर्षी, उठा!' वशिष्ठांच्या तोंडून आपल्यासाठी ब्रह्मर्षी शब्द ऐकून विश्वामित्रांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ते वशिष्ठांना म्हणाले, 'ब्रह्मर्षी म्हणवून घेण्यासाठी मी लायक नाही. आज मी काय करायला आलो होतो हे तुम्हाला माहीत नाही.' वशिष्ठ म्हणाले, 'तुम्ही काय करण्यासाठी आला होतात ते महत्वाचं नाही, तुम्ही काय केलंत हे महत्वाचं. अहंकार सोडून तुम्ही विनम्र झालात. अहंकाराचा पूर्णपणे त्याग करणं म्हणजे ब्राह्मण होणं. म्हणूनच आज मी तुम्हाला ब्रह्मर्षी म्हटलं.'
-संध्या पेडणेकर

No comments: