Thursday, January 26, 2012

इप्सितसाध्यासाठी नेमकेपणा हवाच

-संध्या पेडणेकर
ईसाप एकदा असाच जाणार्‍या-येणार्‍यांकडे पाहात रस्त्याच्या कडेला बसला होता. एक माणूस त्याच्याजवळ आला आणि त्यानं ईसापला विचारलं, 'काहो, गावातलं मंदिर इथून कितीसं दूर आहे? मला जायचंय मंदिरात, पोचायला साधारण किती वेळ लागेल?' ईसापनं एकदा त्या माणसावर नजर टाकली आणि कपडे झटकत तो उठून उभा राहिला. यात्रेकरू संकोचला. त्याला वाटलं, उगाच आपण याला त्रास दिला. शिवाय, याची उत्तर देण्याची इच्छा आहे की नाही कुणास ठाऊक. काही बोलतच नाहीय हा.  तो चालू लागला. ईसापही त्याच्यासोबत चालू लागला. गोंधळलेला यात्रेकरू त्याला म्हणाला, 'अहो, मला सोबतीची गरज नाहीय. कशाला उगाच तसदी घेता. नुसतं सांगितलंत तरी चालेल.' ईसापने त्याचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि तो त्या यात्रेकरूसोबत चालत राहिला. पंधरा-एक मिनिटं चालल्यानंतर ईसापनं यात्रेकरूला थांबवलं. म्हणाला, 'तुम्हाला मंदिरापर्तयंत पोहोचायला साधारण पंधरा मिनिटं लागतील.'यात्रेकरूला वाटलं, विक्षिप्तच आहे वल्ली. तो म्हणाला, 'आपण हे मला तिथे बसल्या बसल्यासुद्धा सांगू शकला असतात. उगाच मैलभर पायपीट घडली आपल्याला.' ईसाप त्याला म्हणाला, 'बाबा रे, तुझअया चालण्याचा वेग मला जोवर ठाऊक नव्हता तोवर इप्सित स्थळी तू किती वेळात पोहोचणार हे मी कसा सांगणार?'
ध्येय कधी गाठणार हे तुम्ही त्याच्या दिशेनं किती वेगात निघाला आहात यावरच अवलंबून असतं.
---

No comments: