राजकुमार श्रोणनं भगवान बुद्धांकडून दीक्षा घेतली आणि तो संन्यासी झाला. संन्यासी होण्याआधी त्यानं जीवनात कैक सुखं उपभोगली होती. भोगातच त्याचं जीवन गुरफटलेलं होतं. संन्यासी झाल्यानंतर मात्र त्यानं त्यागाची अति गाठली. इतर क्षिक्षु राजरस्यावरून चालले की कधीकाळी गालिच्यांवर चालणारा हा राजकुमार काट्यांनी भरलेल्या पायवाटेवरून चालू लागायचा. विश्रांतीसाठी इतर भिक्षु वृक्षांच्या सावलीत बसले की हा उन्हात उभा रहायचा.दिवसातून एकदा इतर जेवत असतपण भिक्षु बनल्यानंतर श्रोण कित्येक दिवसपर्यंत उपाशीच रहायचा. सहा महिन्यांत तो अगदी सुकून गेला. अशा कठिण दिनचर्येमुळं त्यचा देहही काळवंडला.
एके दिवशी भगवान बुद्ध त्याला म्हणाले, 'श्रोण! मी असं ऐकलंय की राजकुमार असताना तू वीणा वाजवायचास, अतिशय कुशल वीणावादक आहेस तू. खरंय का हे?' श्रोणनं उत्तर दिलं,'होय. लोक मला म्हणायचे की तू सुरेख वीणा वाजवतोस.' बुद्ध श्रोणला म्हणाले, 'मग मला एक सांग, वीणेच्या तारा ढिल्या पडल्या तर त्यांचयातून झंकार उमटेल का?' श्रोण हसला, म्हणाला - 'नाही गुरुदेव. वीणेच्या तारा ढिल्या पडल्या तर त्यांच्यातून झंकार निघणारच नाही.' बुद्ध म्हणाले, 'आणि जर जास्त ताण असेल तर?' श्रोण म्हणाला, 'जास्त ताणलेल्या तारांमधूनही सगीत उमटत नाही. कारण अती ताणलेल्या तारा स्पर्श होताच तुटतात.' पुढे तो म्हणाला, 'संगीत निर्माण होण्यासाठी तारा ताणलेल्या किंवा ढिल्या असलेल्या चालत नाही....' त्याला मध्येच थांबवून भगवान बुद्ध म्हणाले, 'वीणेचा नियम जीवनवीणेवरही लागू आहे, श्रोण. जीवनवीणेच्या तारा ताणलेल्या किंवा ढिल्या असतील तर संगीत निर्माण होत नाही. जीवनाचं संगीत अतीवर नव्हे, मध्यावरच - समेवरच साधता येतं.' ऐकलं आणि श्रोणला आपली चूक उमगली.
--------
No comments:
Post a Comment