एका गावात एक माणूस रहायचा. त्याच्या घरापासून जवळच एक पर्वत होता. जवळ जाऊन, फिरून तो पर्वत पाहायची त्या माणसाची खूप इच्छा होती. कारण तो पर्वत यात्रेकरूंची इच्छा पूर्ण करतो अशी ख्याती होती. खूप दूरवरून लोक खास त्या पर्वताची यात्रा करण्यासाठी येत असत.
या माणसाच्या घरापासून तो पर्वत जवळच होता. फक्त 15 मैलांच्या अंतरावर. मनात आणलं तर सकाळी निघून तो संध्याकाळी घरी परतू शकला असता. पण जाऊ कधीतरी अशा विचारानं त्याचं जाणं नेहमी टळत गेलं. मग त्याला वाटू लागलं की, अशानं ज्या पर्वताची यात्रा करण्यासाठी लोक दूरवरून येतात त्या पर्वताची यात्रा आपण त्याच्या इतक्या जवळ असूनही कधीही करू शकणार नाही.
शेवटी एकदा त्यानं निर्धार केला. आज रात्री आपण पर्वतावर जायचंच.
रात्री सारी कामं आटोपल्यावर त्यानं कंदील पेटवला आणि तो घेऊन यात्रेला निघाला.
गावाबाहेर येता येता त्याच्या मनात विचार आला - आपल्याला पंधरा मैल चालायचंय. या कंदिलाचा उजेड जेमतेम चार पावलांपर्यंत जातोय. अशा गडद अंधारात, एवढ्याशा कंदिलाच्या प्रकाशात आपण कुठवर पोहोचू शकू? आपण या अंधारात गडप होऊन जाऊ. हा विचार मनात आला आणि तो एवढा निराश झाला हातातील कंदील शेजारी ठेवून त्यानं जमिनीवर बसकण मारली.
काय करावं त्याला काही सुचेना. तेवढ्यात त्याला एक साधू त्या मार्गानं येताना दिसला. जवळ आल्यावर साधूनं त्या माणसाला विचारलं, 'काय झालं? तू अगदी निराश झालेला दिसतोयस.' तो माणूस म्हणाला, 'मी अभागी आहे हेच खरं. कित्येक वर्षांपासून या पर्वताची यात्रा करायची ठरवत होतो पण कधी घरातून निघायची सवडच झाली नाही. आज शेवटी निर्धारानं निघालो तर माझ्या या कंदिलानं दगा दिला. एव्हढासा कंदील, त्यातून प्रकाशही किती मंद निघतोय.'
साधू त्याला म्हणाला, 'तू माझ्याबरोबर चल.'
तो मग साधूसोबत निघाला.
पाहातो तर काय, प्रकाशही त्याच्यासोबत पुढे चालला होता. जसजसा तो पुढे जायचा तसतसा प्रकाशही पुढे पुढे सरकायचा. त्याच्या वाटेवरील अंधार सरला होता. त्यानं साधूचे आभार मानले.
साधू म्हणाला, 'सरळ सोपी गोष्ट आहे. तू चार पावलं चाललास की उजेडही चार पावलं पुढे चालेल. बसल्याठिकाणी हिशोब लावत राहिलास तर हाती काहीही यायचं नाही. अरे वेड्या, पंधरा मैलच काय, या कंदिलाच्या प्रकाशात तू हजारो मैलांचं अंतर सुखेनैव कापू शकतोस.'
---