Monday, January 25, 2016

मनाचे मंदिर

©संध्या पेडणेकर/
एक संन्यासी आणि एक गणिका समोरासमोर रहात असत. दोघांचाही एकाच दिवशी मृत्यू झाला. वैकुठात देवदूत गणिकेला स्वर्गात आणि संन्याशाला नरकात घेऊन चालले. तेव्हा संन्याशानं तक्रार करत म्हटलं, अरे, काय करताय? मी संन्यासी आहे. जीवनभर मी मंदिरात राहिलो आणि देवभक्ती केली. आणि तुम्ही मला नरकात घेऊन चाललाय? आणि या पापिणीला, व्यभिचारिणीला स्वर्गात नेताय?’

देवदूतांनाही काहीतरी गडबड होतेय असं वाटलं. त्यांच्यापैकी एकानं जाऊन पुन्हा चौकशी केली. परत येऊन त्यानं म्हटलं, कोणतीही गफलत झालेली नाही. संन्याशाचा वैराग वरवरचा होता. मनात त्याला नेहमी असंच वाटत असे की मी इथे देवाच्या पूजेअर्चेत मग्न आहे आणि ही गणिका आनंदात मग्न आहे. सकाळी तो देवाच्या दाराची घंटा वाजवत असे पण त्याच्या मनात मात्र गणिकेच्या घरातली गाणीच गुंजारव करत राहिली. त्याने केलेल्या पूजेअर्चेला काहीही अर्थ नव्हता कारण त्याचं मन नेहमी गणिकेच्या घरी काय चाललं असेल या विकारी विचारांत मग्न असे.
आणि गणिकेचं अगदी याउलट होतं. सकाळी मंदिराची घंटा वाजली की तिचं मन भगवत्चरणी लीन होत असे. तिला आपल्या दुर्भाग्याचं वाईट वाटत असे. आपलं जीवन असंच व्यर्थ जाणार याचं तिला अतोनात दुःख होत असे. आपण कधीही परमात्म्याचं चिंतन करू शकणार नाही असं तिला वाटे. अशा प्रकारे संन्यासी मनानं जन्मभर गणिकेच्या घरी राहिला आणि गणिका मनानं मंदिरात रमली.
म्हणूनच, तो देवदूत म्हणाला, कोणतीही गफलत झालेली नाही. मनाशिवाय शरीराचं अस्तित्व ते काय. माणूस तिथेच असतो जिथे त्याचं मन असतं.

Monday, January 4, 2016

मालक कोण अन् गुलाम कोण?

© संध्या पेडणेकर

http://classicalwisdom.com/diogenes-of-sinope
संतांच्या महानतेचे गोडवे त्यांच्या मृत्यूनंतर लोकांनी कितीही गायिले तरी जिवंतपणी संतांच्या वाट्याला बहुधा प्रचंड मनस्ताप, हालअपेष्टाच आलेल्या असतात. प्राचीनकाळी ग्रीक देशात असाच एक महान विद्वान फकीर होऊन गेला. त्याचं नाव डायोजनीज. लोक त्याचा सल्ला घेण्यासाठी दूरवरून यायचे. 
गरजेहून अधिक काही स्वतःच्या मालकीचे नसावे, किंबहुना कुणी आपल्या गरजेपेक्षा अधिक काही जवळ बाळगू नये असं डायोजनीजचं मत होतं. सिनोपे गावचा हा विद्वान अथेन्समध्ये आला तेव्हा त्याने तेथे राहाणाऱ्या आपल्या मित्रांना स्वतःसाठी खोली पाहायला सांगितली. पण त्याचे मित्र त्याच्यासाठी खोलीची व्यवस्था करू शकले नाहीत. तेव्हा अथेन्सच्या रस्त्यावर पडलेल्या दारूच्या एका रिकाम्या पिंपात डायोजनीजने आपली पथारी पसरली. तो जोवर अथेन्समध्ये राहिला तोवर त्या पिंपातच राहिला. जिथे जायचा तिथे तो ते पिंप लोटत न्यायचा. 
एकदा काही गुलामांच्या व्यापाऱ्यांची डायोजनीजवर नजर पडली. तो होताच सुंदर, भक्कम आणि उंचा-पुरा. याची गुलामांच्या बाजारात चांगली किंमत मिळेल असं वाटल्यावरून त्यांनी डायोजनीजला पकडलं आणि ते त्याला घेऊन निघाले. डायोजनीजने त्यांना विचारलं, 'कुठे नेताय मला?' व्यापाऱ्यांनी सांगितलं तसा तो त्यांना म्हणाला, 'चला, मी चलतो तुमच्याबरोबर.' बहुधा लोक त्यांच्यापासून दूर रहायचा प्रयत्न करत असत, पण डायोजनीज स्वतः त्यांच्याबरोबर निघाला तेव्हा त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं.
बाजाराता त्याला उभं करून व्यापाऱ्यांनी जेव्हा 'कुणी हा गुलाम खरेदी करणार का?' असा पुकारा केला तेव्हा डायोजनीज त्यांना म्हणाला, 'तुम्ही कशाला पुकारा करता? मीच करतो.' मग त्यानं आवाज दिला, 'मालक हवाय का कुणाला, मालक?'
गुलामांच्या बाजारात मालकाच्या विक्रीचा पुकारा ऐकून तेथे गर्दी जमा झाली. 
डायोजनीजला पकडून आणणारे व्यापारी नाराज झाले. त्यांनी त्याला दटावलं, 'काय तमाशा चालवलाय?'
डायोजनीज त्यांना म्हणाला, 'मला भले कुणीही खरेदी करोत, मालक मात्र मीच रहाणार!'
गुलामांच्या बाजारात त्या दिवशी राजासुद्धा आपल्या लवाजम्यानिशी आला होता. गर्दी पाहून तो डायोजनीजला उभे केलेल्या चौथऱ्याजवळ आला. डायोजनीजचा उद्दामपणा पाहून त्याला राग आला आणि त्याने आपल्या लोकांना आज्ञा दिली, 'करा खरेदी याला, गुर्मी उतरवू याची.'
महालात आल्यावर राजा डायोजनीजला म्हणाला, 'थांब, आत्ता तुझ्या तंगड्या तोडतो, मग समजेल गुलाम कोण आणि मालक कोण.' राजानं आपल्या सेवकांना डायोजनीजचे पाय तोडायची आज्ञा दिली. 
डायोजनीज राजाला म्हणाला, 'तंगड्या तोडायच्या म्हणतोस तर तोड, पण आधी विचार कर, तू मला काम करण्यासाठी खरेदी केलंयस. बिन पायांचा गुलाम काय मेहनत करणार? तुला नाहक त्याला पोसावं लागेल.'
राजा विचारात पडला. त्याला वाटलं, 'खरंच सांगतोय हा. बिन पायाचा गुलाम काय कामाचा? 
राजानं आपल्या सेवकांना म्हटलं, 'जाऊ दे, नका तोडू त्याचे पाय.'  
डायोजनीज राजाला म्हणाला, 'पाहिलंस? आता सांग, मालक कोण आणि गुलाम कोण?'
--------------------------------- 
डायोजनीजबद्दल आणखी माहितीसाठी दुवा- http://www.ancient.eu/article/740/