Friday, September 14, 2012

कबीराचे गुरु

-संध्या पेडणेकर
कबीरानं गंगेच्या घाटावर स्वामी रामानंदांकडून दीक्षा मिळवल्याबद्दल सांगितलं जातं. सकाळच्या वेळी ज्या वाटेनं स्वामी रामानंद गंगास्नानासाठी जात असत त्या वाटेवर निजून कबीरानं दीक्षा मिळविली होती. चुकून रामानंदांचा पाय कबीराला लागला आणि  त्यांच्या तोंडून 'राम, राम' हे शब्द निघाले. अशा प्रकारे,  नकळत कबीराला रामानंदांकडून दीक्षा मिळाली होती.
दीक्षा घेतल्यानंतर कबीराला ज्ञानप्राप्ती झाली. त्यांच्या वाणीत विशेष गोडवा आला. गंगेकाठी ते जेव्हा कीर्तन करत तेव्हा लोक आपसूक त्यांच्या कीर्तनाला येऊन बसत. त्यांच्या कीर्तनाला गर्दी वाढू लागली.
हे पाहून काशीचे पंडित नाराज झाले. त्यांच्यापैकी कित्येकजणांनी वेदाभ्यास केलेला होता, पण त्यांचं कीर्तन ऐकायला कुणीही येत नसे. त्यामुळे कबीरानं केलेल्या कीर्तनाला लोक जमलेले पाहून त्यांना कबीराचा हेवा वाटू लगला.
पंडितांनी मग कबीरांना समजावण्याचा प्रयत्न केला, 'तू गृहस्थ आहेस, मुलं-बाळंही आहेत. शिवाय तुझा कुणी गुरूही नाही. म्हणून तू कथा सांगू नयेस.'
कबीर म्हणाले, 'माझे कुणी गुरू नाहीत असं आपलं जे म्हणणं आहे ते चुकीचं आहे. मी ही विद्या गुरूकडूनच शिकलो. गुरूकृपेविना ज्ञानप्राप्ती होणं शक्य तरी आहे का?'
कबीराचं म्हणणं ऐकून पंडित मंडळींना आश्चर्य वाटलं. त्यांनी कबीरांना त्यांच्या गुरूचं नाव विचारलं. कबीरांनी सांगितलं की स्वामी रामानंद माझे गुरू आहेत.
पंडित मग स्वामी रामानंदांकडे गेले. स्वामी रामानंदांकडे त्यांनी विचारणा केली की, आपण वैष्णव संप्रदायाचे कट्टर समर्थक आहात. कबीराचा धर्म कोणता हे सुद्धा कुणाला धड ठावूक नाही. त्याला आपण दीक्षा दिलीत हे कसं काय? हे आचरण धर्माविरुद्ध नव्हे काय?
रामानंदांना याबद्दल काहीही माहिती नव्हतं. त्यांनी विचारलं, 'कोण कबीर? त्याला मी दीक्षा दिली? कधी?'
संपूर्ण काशी शहरात मग- 'गुरू खरं बोलतोय की शिष्य खरं बोलतोय?' याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. वृत्त रामानंदांच्या कानावर आलं आणि ते तापले. त्यांनी कबीराला बोलावलं न् विचारलं, 'तुझे गुरू कोण?'
कबीरानं सांगितलं, 'आपणच माझे गुरू!'
स्वामी रामानंदांनी हे ऐकलं आणि पायीची खडाऊ हातात घेऊन कबीराच्या डोक्यावर हाणली. त्यांना मारता मारता ते बोलू लागले, 'मी तुला दीक्षा दिली का? मला खोटं पाडतोस? राम राम राम!....'
कबीरानं स्वामी रामानंदांच्या पायांवर लोटांगण घातलं. म्हणाला, 'गुरुदेव, गंगेच्या काठी आपण दिलेली दीक्षा जर खोटी तर मग आत्ता आपण देत असलेली दीक्षा तरी खरी आहे ना? आपले हात माझ्या डोक्यावर आशिर्वादांची बरसात करत आहेत. आपल्या मुखातून माझ्यासाठी रामनामाचा मंत्र मला मिळत आहे.'
कबीराचं बोलणं ऐकून रामानंदांना संतोष झाला. कबीराला त्यांनी आपला शिष्य मानलं.
----

No comments: