Monday, September 10, 2012

भाग्याची हाक ओळखा


-संध्या पेडणेकर
सूफी संत हुजबिरी नेहमी म्हणत, माणूस हाती आलेल्या संधी दवडत असतो आणि मग उगीच भाग्याला दोष लावत बसतो.
एकदा एक माणूस त्यांना म्हणाला, मी नाही मानत असं. आता माझंच उदाहरण घ्या ना. जन्म गेला माझा, भाग्याच्या हाकेकडे कधीपासून कान लावून बसलोय मी. भाग्यानं जर संधी दिली असती तर मी ती कधीही दवडली नसती, पण आमचं कुठलं आलंय एवढं भाग्य.
हुजबिरी त्याला म्हणाले, असं आहे गड्या, मी आता जरा नदीच्या पलीकडच्या गावी चाललोय. संध्याकाळी नदीकाठच्या पारावर बसलेला असेन मी. तू ये तिकडे, आपण या विषयावर बोलू.  
संध्याकाळी भेटण्याचं कबूल करून तो माणूस निघून गेला. हुजबिरींनी मग आपल्या शिष्यांना त्याच्या येण्याच्या मार्गावर सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं मडकं ठेवायला आणि स्वतः आसपास रहायला सांगितलं.
ठरल्याप्रमाणे संध्याकाळी तो माणूस पुलावरून चालत पलीकडे नदीकाठच्या झाडाखाली लोकांशी बोलत बसलेल्या हुजबिरींना भेटायला आला. गंमत अशी की पुलावर जिथे मडकं ठेवलेलं होतं त्याआधी दहा पावलं त्यानं चक्क डोळे मिटून घेतले. पुलावरचं उरलेलं अंतर त्यानं डोळे बंद ठेवूनच ओलांडलं. हे पाहून तिथे उभे असलेले इतर लोकही चकित झाले. सगळ्यांना वाटलं, कमाल झाली. अगदी त्या मडक्याजवळ आल्यावरच याला नेमकी डोळे बंद करायची बुद्धी कशी सुचली?
तो माणूस हुजबिरींसमोर आला तेव्हा त्याच्या मागोमाग सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं ते मडकं घेऊन हुजबिरींचे शिष्यही आले.
हुजबिरींनी त्या माणसाला विचारलं, तू असे चालता चालता अचानक डोळे का बंद केलेस?
तो माणूस म्हणाला, तसं खास काही नाही, मला वाटलं, डोळे बंद करून पुलावरून चालताना कसं वाटतं ते जरा पाहावं, म्हणून...
हुजबिरी त्याला म्हणाले, सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं हे मडकं पाहिलंस का? केवळ तुला मिळावं म्हणून मी ते तुझ्या रस्त्यात ठेवलं होतं. उचललं असतंस तर तुझ्या सगळ्या आर्थिक विवंचना मिटल्या असत्या. पण माझं मन मात्र साशंकच होतं. जन्मभर चालून आलेल्या संधी तू दवडल्यास तर आता या संधीचं तू काय सोनं करणार असं वाटलं होतं मला. आणि तू तेच सिद्ध केलंस. काय तर म्हणे, डोळे बंद करून चालून पाहावं!

No comments: