Saturday, September 29, 2012

जैशी व्यक्ती तैशी सजा!

-संध्या पेडणेकर
एका राज्याच्या तीन अधिकार्‍यांनी राज्यकारभारात मोठा घोटाळा केला.
राजानं तिघांनाही बोलावलं.
त्यांच्यापैकी एकाला राजा म्हणाला, 'मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती.'
दुसर्‍या व्यक्तीला राजानं एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
तिसर्‍या व्यक्तीला नगरातून धिंड काढून फटके लगावण्याची आणि वीस वर्षे कारावासाची शिक्षा फर्मावली.
दरबारी गोंधळले. एकाच गुन्ह्यासाठी तीन व्यक्तींना तीन प्रकारची शिक्षा?
त्यांनी बिचकत बिचकत राजाला विचारलं, 'एकाच अपराधासाठी तिघांना तीन प्रकारच्या शिक्षा हे न्यायसंगत नाही.'
राजा त्यांना म्हणाला, 'शिक्षा देताना मी- जशी व्यक्ती तशी शिक्षा -  हेच तत्व समोर ठेवलं होतं. पहिली व्यक्ती अतिशय सज्जन होती. त्याला मी कोणतीही शिक्षा दिली नाही तरी त्यानं घरी गेल्यानंतर आत्महत्या केली. दुसरी व्यक्ती थोड्या जाड चमडीची होती म्हणून तिला मी एक वर्षाची शिक्षा सुनावली.'
एक दरबारी म्हणाला, 'महाराज, तिसर्‍याला मात्र आपण खूपच कठोर शिक्षा दिलीत.'
त्याचं बोलणं ऐकून राजा हसला, म्हणाला, 'कारागृहात जाऊन तुम्ही एकदा त्या व्यक्तीला भेटा. म्हणजे त्याला दिलेल्या शिक्षेचं औचित्य तुमच्या लक्षात येईल.'
काही दरबारी मग त्याला भेटण्यासाठी कारागृहात गेले. शिक्षा मिळालेल्या आपल्या पूर्व सहकार्‍याला ते भेटले. मिळालेल्या शिक्षेचं त्याच्या चेहर्‍यावर अजिबात वैषम्य नव्हतं. नगरातून धिंड काढल्याचं, कोडे खाल्याचं त्याला  काहीही वाटलं नसावं, कारण तो तिथेही अगदी मजेत होता. भेटायला आलेल्या दरबार्‍यांना तो म्हणाला, 'फक्त वीस वर्षांचीच तर बाब आहे! शिवाय मी इतकं कमावून ठेवलंय की माझ्या सात पिढ्यांनी जरी हात-पाय हालवले नाहीत तरी काही एक कमी पडणार नाही. आणि, या कारागृहातही तसा कुणाचा त्रास नाहीच. आरामात आहे मी अगदी. '
दरबार्‍यांनी विचारलं, 'शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, सगळ्यांसमोर तुम्हाला कोडे मारले गेले, सगळीकडे तुमची बदनामी झाली...'
त्याला मध्येच अडवत ती व्यक्ती म्हणाली,'बदनामी झाली म्हणून काय झालं? शेवटी मला प्रसिद्धीच मिळाली ना? आज शहरभर माझ्याबद्दलच चर्चा करत असतील लोक!'
राजानं योग्य निवाडा केला होता हे दरबार्‍यांना पटलं.
---

Friday, September 14, 2012

कबीराचे गुरु

-संध्या पेडणेकर
कबीरानं गंगेच्या घाटावर स्वामी रामानंदांकडून दीक्षा मिळवल्याबद्दल सांगितलं जातं. सकाळच्या वेळी ज्या वाटेनं स्वामी रामानंद गंगास्नानासाठी जात असत त्या वाटेवर निजून कबीरानं दीक्षा मिळविली होती. चुकून रामानंदांचा पाय कबीराला लागला आणि  त्यांच्या तोंडून 'राम, राम' हे शब्द निघाले. अशा प्रकारे,  नकळत कबीराला रामानंदांकडून दीक्षा मिळाली होती.
दीक्षा घेतल्यानंतर कबीराला ज्ञानप्राप्ती झाली. त्यांच्या वाणीत विशेष गोडवा आला. गंगेकाठी ते जेव्हा कीर्तन करत तेव्हा लोक आपसूक त्यांच्या कीर्तनाला येऊन बसत. त्यांच्या कीर्तनाला गर्दी वाढू लागली.
हे पाहून काशीचे पंडित नाराज झाले. त्यांच्यापैकी कित्येकजणांनी वेदाभ्यास केलेला होता, पण त्यांचं कीर्तन ऐकायला कुणीही येत नसे. त्यामुळे कबीरानं केलेल्या कीर्तनाला लोक जमलेले पाहून त्यांना कबीराचा हेवा वाटू लगला.
पंडितांनी मग कबीरांना समजावण्याचा प्रयत्न केला, 'तू गृहस्थ आहेस, मुलं-बाळंही आहेत. शिवाय तुझा कुणी गुरूही नाही. म्हणून तू कथा सांगू नयेस.'
कबीर म्हणाले, 'माझे कुणी गुरू नाहीत असं आपलं जे म्हणणं आहे ते चुकीचं आहे. मी ही विद्या गुरूकडूनच शिकलो. गुरूकृपेविना ज्ञानप्राप्ती होणं शक्य तरी आहे का?'
कबीराचं म्हणणं ऐकून पंडित मंडळींना आश्चर्य वाटलं. त्यांनी कबीरांना त्यांच्या गुरूचं नाव विचारलं. कबीरांनी सांगितलं की स्वामी रामानंद माझे गुरू आहेत.
पंडित मग स्वामी रामानंदांकडे गेले. स्वामी रामानंदांकडे त्यांनी विचारणा केली की, आपण वैष्णव संप्रदायाचे कट्टर समर्थक आहात. कबीराचा धर्म कोणता हे सुद्धा कुणाला धड ठावूक नाही. त्याला आपण दीक्षा दिलीत हे कसं काय? हे आचरण धर्माविरुद्ध नव्हे काय?
रामानंदांना याबद्दल काहीही माहिती नव्हतं. त्यांनी विचारलं, 'कोण कबीर? त्याला मी दीक्षा दिली? कधी?'
संपूर्ण काशी शहरात मग- 'गुरू खरं बोलतोय की शिष्य खरं बोलतोय?' याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. वृत्त रामानंदांच्या कानावर आलं आणि ते तापले. त्यांनी कबीराला बोलावलं न् विचारलं, 'तुझे गुरू कोण?'
कबीरानं सांगितलं, 'आपणच माझे गुरू!'
स्वामी रामानंदांनी हे ऐकलं आणि पायीची खडाऊ हातात घेऊन कबीराच्या डोक्यावर हाणली. त्यांना मारता मारता ते बोलू लागले, 'मी तुला दीक्षा दिली का? मला खोटं पाडतोस? राम राम राम!....'
कबीरानं स्वामी रामानंदांच्या पायांवर लोटांगण घातलं. म्हणाला, 'गुरुदेव, गंगेच्या काठी आपण दिलेली दीक्षा जर खोटी तर मग आत्ता आपण देत असलेली दीक्षा तरी खरी आहे ना? आपले हात माझ्या डोक्यावर आशिर्वादांची बरसात करत आहेत. आपल्या मुखातून माझ्यासाठी रामनामाचा मंत्र मला मिळत आहे.'
कबीराचं बोलणं ऐकून रामानंदांना संतोष झाला. कबीराला त्यांनी आपला शिष्य मानलं.
----

Monday, September 10, 2012

भाग्याची हाक ओळखा


-संध्या पेडणेकर
सूफी संत हुजबिरी नेहमी म्हणत, माणूस हाती आलेल्या संधी दवडत असतो आणि मग उगीच भाग्याला दोष लावत बसतो.
एकदा एक माणूस त्यांना म्हणाला, मी नाही मानत असं. आता माझंच उदाहरण घ्या ना. जन्म गेला माझा, भाग्याच्या हाकेकडे कधीपासून कान लावून बसलोय मी. भाग्यानं जर संधी दिली असती तर मी ती कधीही दवडली नसती, पण आमचं कुठलं आलंय एवढं भाग्य.
हुजबिरी त्याला म्हणाले, असं आहे गड्या, मी आता जरा नदीच्या पलीकडच्या गावी चाललोय. संध्याकाळी नदीकाठच्या पारावर बसलेला असेन मी. तू ये तिकडे, आपण या विषयावर बोलू.  
संध्याकाळी भेटण्याचं कबूल करून तो माणूस निघून गेला. हुजबिरींनी मग आपल्या शिष्यांना त्याच्या येण्याच्या मार्गावर सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं मडकं ठेवायला आणि स्वतः आसपास रहायला सांगितलं.
ठरल्याप्रमाणे संध्याकाळी तो माणूस पुलावरून चालत पलीकडे नदीकाठच्या झाडाखाली लोकांशी बोलत बसलेल्या हुजबिरींना भेटायला आला. गंमत अशी की पुलावर जिथे मडकं ठेवलेलं होतं त्याआधी दहा पावलं त्यानं चक्क डोळे मिटून घेतले. पुलावरचं उरलेलं अंतर त्यानं डोळे बंद ठेवूनच ओलांडलं. हे पाहून तिथे उभे असलेले इतर लोकही चकित झाले. सगळ्यांना वाटलं, कमाल झाली. अगदी त्या मडक्याजवळ आल्यावरच याला नेमकी डोळे बंद करायची बुद्धी कशी सुचली?
तो माणूस हुजबिरींसमोर आला तेव्हा त्याच्या मागोमाग सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं ते मडकं घेऊन हुजबिरींचे शिष्यही आले.
हुजबिरींनी त्या माणसाला विचारलं, तू असे चालता चालता अचानक डोळे का बंद केलेस?
तो माणूस म्हणाला, तसं खास काही नाही, मला वाटलं, डोळे बंद करून पुलावरून चालताना कसं वाटतं ते जरा पाहावं, म्हणून...
हुजबिरी त्याला म्हणाले, सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं हे मडकं पाहिलंस का? केवळ तुला मिळावं म्हणून मी ते तुझ्या रस्त्यात ठेवलं होतं. उचललं असतंस तर तुझ्या सगळ्या आर्थिक विवंचना मिटल्या असत्या. पण माझं मन मात्र साशंकच होतं. जन्मभर चालून आलेल्या संधी तू दवडल्यास तर आता या संधीचं तू काय सोनं करणार असं वाटलं होतं मला. आणि तू तेच सिद्ध केलंस. काय तर म्हणे, डोळे बंद करून चालून पाहावं!