Monday, August 27, 2012

संवेदनशीलता हवीच

-संध्या पेडणेकर 
फार मोठं नव्हतं, पण समीरचा उदरनिर्वाह त्याच्या छोट्याश्या गॅरेजच्या कमाईवरच चालायचं. लहानपणापासून समीरला वेगाचं भयंकर वेड.
थोडा हात चालला तेव्हा त्यानं एक मस्तपैकी गाडी खरेदी केली स्वतःसाठी. अगदी वार्‍याबरोबर शर्यत लावायची त्याची गाडी. आपल्या गाडीची तो खूप काळजी घेत असे.
समीरचा लहानपणीचा एक मित्र रघू एकदा अचानक त्याला भेटायला आला. समीरच्या गाडीचं त्यालाही खूप कौतुक वाटलं, पण राहून राहून त्या गाडीला पडलेली छोटीशी खोक आणि तेथील उडालेला रंग त्याला बुचकळ्यात टाकत होता. शेवटी त्यानं समीरला विचारलंच. म्हणाला, 'समीर, अरे किती प्रेम आहे तुझं स्वतःच्या गाडीवर. हे गॅरेजही तुझंच आहे. मनात आणलं तर पटकन ही खोक तू भरून काढू शकशील. गाडीला लागलेलं हे गालबोट तू तसंच का ठेवलंयस?'
समीर म्हणाला, 'मला वाटलंच होतं तू हा प्रश्न विचारशील असं. अरे यामागे एक छोटीशी गोष्ट आहे.'
ते दोघे जेव्हा त्या गाडीत बसून फेरफटका मारायला निघाले तेव्हा समीरनं रघूला ती गोष्ट सांगितली.
'अरे, तेव्हा मी ही गाडी नवीनच खरेदी केली होती. असा सुंसाट निघालो होतो तिला पळवत. दूरवर रस्त्याजवळच्या झुडुपात काहीतरी हालतंय असं मला वाटलं. पण गाडीचा वेग कमी करून पाहायची मला अजिबात इच्छा नव्हती. मी भरधाव गाडी दामटत पुढे चाललो आणि तेवढ्यात एक वीट दाणकन् येऊन कारच्या दरवाजावर आदळली.'
'आपल्या नव्या गाडीला कुणी वीट फेकून मारलं हे लक्षात आलं आणि मी तिरमिरलो. त्याच तिरीमिरीत मी दार उघडलं आणि समोर रडत उभ्या असलेल्या मुलावर उखडलो, म्हटलं, काय रे ए गाढवा, का मारलीस ती वीट? माझ्या नव्या गाडीची काच फुटली आणि तिचा रंगही खरवडलाय पाहा...'
'रडत रडतच तो मुलगा मला म्हणाला, काका, मी काय करू? मी वीट भिरकावली नसती तर तुम्ही गाडी थांबवली नसतीत. कित्येक गाड्यांना मी हात दाखवला पण कुणीही गाडी थांबवली नाही. अहो, माझा मोठा भाऊ पांगुळगाड्यावरून पडलाय, मला पेलवत नाहीय त्याला उचलून पुन्हा व्हीलचेयरमध्ये बसवणं.प्लीज... मला तोडी मदत कराल का?'
'तेव्हा माझी नजर बाजूला गेली आणि मी थंड पडलो. रघ्या, खरं सांगतो रे, लाज वाटली मला त्याच्याकडे लक्ष न देता गाडी पुढे दामटल्याची. त्या घटनेची आठवण मनात कायम रहावी, इतरांनाही आपली गरज असू शकते हे नेहमी लक्षात असावं म्हणून मी गाडीला पडलेली खोक दुरुस्त केली नाही आणि त्या ठिकाणी उडालेला रंग परत लावला नाही.'

Tuesday, August 21, 2012

श्रद्धा आणि तर्क

-संध्या पेडणेकर
एकदा एक सिद्ध पुरुष आपल्या शिष्यावर प्रसन्न झाले. म्हणाले, 'आज मी तुला परिस देतो.'
ते दोघेही परिस आणण्यासाठी निघाले.
गावाबाहेर आल्यावर एका निर्जन ठिकाणी सिद्ध पुरुषाने शिष्याला एके ठिकाणी खोदायला सांगितलं. शिष्यानं जमीन खोदली तेव्हा त्याला तिथे  लोखंडाची, गंज चढलेली एक छोटी डबी दिसली.
याच डबीत परिस आहे असं सिद्ध पुरुषानं शिष्याला सांगितलं.
शिष्य मोठा विद्वान होता. त्याला आपल्या ज्ञानाबद्दल सार्थ अभिमानही होता.
त्याला वाटलं की, हा जर खरा परिस असता तर त्याच्या  स्पर्शानं लोखंडाची ही डबी सोन्याची नसती का झाली? डबी अजूनही लोखंडाचीच आहे म्हणजे हा काही परिस नव्हे.
डबी उघडून पहायचे कष्टही त्याने घेतले नाहीत. गुरुचा अनादर होऊ नये म्हणून त्यानं ती डबी स्वतःजवळ ठेवली पण गुरुबद्दलचा त्याच्या मनातील आदर थोडा उणावलाच होता.
गुरुपासून त्याची वाट वेगळी निघाली तेव्हा आधी त्यानं ती डबी भिरकावून दिली.
तो पुढे निघणार तेवढ्यात त्याचं भिरकावून दिलेल्या त्या डबीकडे लक्ष गेलं.
डबी सोन्याची झाली होती आणि झळाळत होती.
त्यानं डबी उचलून घेतली. ती उघडी होती.
त्याच्या लक्षात आलं की डबीला आतून मखमलीचा अस्तर लावलेला होता आणि त्या अस्तरामुळेच परिसाचा लोखंडाच्या डबीला स्पर्श झालेला नव्हता.
त्यानं डबी भिरकावली तेव्हा ती उघडली असावी आणि परिसाचा डबीला स्पर्श झाला असावा.
त्यानं डबीत परिस शोधला पण तो घरंगळत कुठेतरी जाऊन पडला असावा. खूप शोधूनही शिष्याला परिस काही मिळाला नाही. अविश्वास आणि श्रद्धाविहीन तर्कामुळे तो परिसाला मुकला होता.

Saturday, August 18, 2012

रिकामे हात

-संध्या पेडणेकर
अलेक्झांडरची शवयात्रा निघाली.
त्याची शवयात्रा पाहाण्यासाठी लाखो लोक जमले होते.  तिरडीच्या दोन्ही बाजूंनी अलेक्झांडरचे दोन हात लटकत होते. सगळ्यांनाच या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटलं कारण अलेक्झांडर मोठा सम्राट होता, त्याची तिरडीसुद्धा लोकांनी इतक्या हलगर्जीपणानं बांधावी? असे कसे त्याचे दोन्ही हात अधांतरी लटकू दिले? कुणाच्याच कसं लक्षात नाही आलं?
पण मग हळूहळू लोकांना समजलं की हा हलगर्जीपणा नव्हता. खुद्द अलेक्झांडरचीच तशी इच्छा होती. त्यानं मरण्यापूर्वी सांगितलं होतं की माझी अंतीम यात्रा काढताना माझे दोन्ही हात लोकांना दिसतील असे तिरडीबाहेरच ठेवावे. त्यामुळे, जगज्जेता अलेक्झांडरसुद्धा शेवटी रिकाम्या हातीच गेला, जन्मभर विजयासाठी केलेला सगळा प्रपंच निरर्थकच होता हे लोकांना कळेल.
मरण्यापूर्वी काही वर्षांआधी अलेक्झांडर एका ग्रीक फकीराला डायोजनीसला भेटायला गेला होता. त्यावेळी डायोजनीसने अलेक्झांडरला विचारलं होतं, 'संपूर्ण जग जिंकून घेतल्यानंतर काय करायचं याबद्दल तू विचार केलायस का अलेक्झांडर?' डायोजनीसचा प्रश्न ऐकून अलेक्झांडरनं उदास स्वरात उत्तर दिलं, 'मला खूप चिंता वाटते. कारण, दुसरं जग नाहीय. तेव्हा, खरंच, हे जग जिंकून घेतल्यानंतर पुढे मी काय करावं?'
खरं तर अजून त्यानं संपूर्ण जग जिंकलेलंच नव्हतं, पण तरीही, जग जिंकून घेण्याची महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यानंतरही त्याची वासना बुभुक्षितच रहाणार होती!
मोठा जुगारी होता अलेक्झांडर. स्वतःजवळचं सगळं त्यानं डावावर लावलं आणि मोठमोठ्या लढाया जिंकून मोठमोठे ढीग लावले धन-संपदेचे.
त्याच अलेक्झांडरला मृत्यूपूर्वी जणू साक्षात्कार झाला.
रिकाम्या हाताने येतो आणि माणूस रिकाम्या हातीच जातो.
 आपल्याला झालेला साक्षात्कार लोकांपर्यंत पोहोचावा अशी त्याची इच्छा होती. लोकांनीही आपले रिकामे हात पाहावे, जाताना अलेक्झांडर सोबत काहीही घेऊन जाऊ शकला नाही हे लोकांना कळावं अशी त्याची इच्छा होती..... मरणातही बरंच काही जिंकून नेलं त्यानं. 

Wednesday, August 8, 2012

तत्वमसि श्वेतकेतु

-संध्या पेडणेकर
बरीच वर्षे विद्यार्जन केल्यानंतर श्वेतकेतु घरी परतला. वडिलांनी त्याला विचारलं, 'विद्यार्जन पूर्ण झालं म्हणतोस तर मग ब्रह्मज्ञान मिळवलंस का? कारण त्याविना इतर सर्व विद्या व्यर्थच.'
श्वेतकेतु वडिलांना म्हणाला, 'माझ्या गुरुदेवांना जर त्याबद्दल माहिती असती तर त्यांनी मला अवश्य ब्रह्मज्ञान दिलं असतं. कारण ज्या ज्या विद्या त्यांना अवगत होत्या त्या सर्व त्यांनी मला दिल्या. ते स्वतः मला म्हणाले की, श्वेतकेतु, तुला शिकवण्यासारखं माझ्यापाशी आता काहीही शिल्लक राहिलं नाही. आता तू स्वगृही परतू शकतोस.'
श्वेतकेतूचं म्हणणं ऐकल्यावर उद्दालक - श्वेतकेतुचे वडील - त्याला म्हणाले, 'म्हणजे ही विद्या शिकवण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली म्हणायची. ठीक आहे, बाहेर जा आणि एक फळ तोडून आण झाडावरून.'
श्वेतकेतु झाडावरून फळ तोडून घेऊन आला.
वडील त्याला म्हणाले, 'काप ते फळ.'
श्वेतकेतूनं फळ कापलं. फळात खूप बिया होत्या.
वडील त्याला म्हणाले, 'यातील एक बीज निवड.'
श्वेतकेतूनं बीज निवडलं तेव्हा वडिलांनी त्याला विचारलं, 'एवढ्याश्या बीजातून प्रचंड वृक्ष बनू शकेल का?'
श्वेतकेतु म्हणाला, 'हो तर, बीजातूनच वृक्षाचा जन्म होतो.'
वडील त्याला म्हणाले, 'म्हणजे, यातच वृक्ष लपलेला असायला हवा. तू ते बीज चीर. त्यात लपलेला वृक्ष आपण शोधून काढू.'
श्वेतकेतूनं बीज कापलं पण त्यात काहीही नव्हतं. तिथे केवळ शून्य होतं. श्वेतकेतू वडिलांना म्हणाला, 'यात तर काहीही नाहीय.'
उद्दालक त्याला म्हणाले, 'जे दिसत नाही, जे अदृश्य आहे त्यातूनच एक विशाल वृक्ष निर्माण होतो. आपणही अशाच शून्यातून जन्माला आलो.'
यावर श्वेतकेतूनं विचारलं, 'म्हणजे, मीसुद्धा त्या महाशून्यातूनच जन्माला आलो का?'
श्वेतकेतूच्या प्रश्नाला उत्तर देताना त्याचे वडील उद्दालक त्याला म्हणाले, 'तत्वमसि श्वेतकेतु - होय श्वेतकेतु, तू सुद्धा याच महाशून्यातून आला आहेस.तू त्याचाच एक भाग आहेस.'
वडिलांचं ते वाक्य  ऐकलं आणि श्वेतकेतूला ज्ञानप्राप्ती झाली असं म्हणतात.



Wednesday, August 1, 2012

जीवनाचे गणित

-संध्या पेडणेकर
एक होती गोम.
गोम म्हणजे शंभर पायांचा कीडा.
ती वेगानं सरपटत कुठेतरी चालली होती.
एका सशाची तिच्यावर नजर पडली.
ससा पाहातच राहिला. त्याला वाटलं,  ही गोम चालते तरी कशी? अबब! किती तिचे ते पाय. आधी कोणता पाय उचलायचा, मागनं कोणता पाय उचलायचा हे कसं कळत असेल तिला? भयंकर कठिण आहे बुवा. किती गणितं करावी लागत असतील हिला.
सशानं तिला हाक मारली. म्हणाला, 'अगं थांब. कुठे इतक्या लगबगीनं चाललीस? असं सांग, की तुझे इतके पाय आहेत तर त्यापैकी कोणता पाय कधी उचलायचा हे तुला कसं कळतं? चालताना कधी तुझी त्रेधा तिरपीट नाही उडत? कधी एकदम दहा पावलं उचलली असं वगैरे झालं का? तारांबळ होत असेल ना तुझी अगदी? खरं सांग, पायात पाय अडकून कधी पडली-बिडली होतीस की नाही? नाही? कम्मालचए. ए, मला शिकव ना हे गणित.'
खरं तर गोमेनं आपल्या पायांबद्दल असा आणि इतका विचार कधी केलाच नव्हता.
ती सुर सुर चालायची. जन्मली तेव्हापासूनच.
तिला आठवतं तेव्हापासूनच तिचे असे शंभर पाय होते.
कधी तिच्या मनात हा प्रश्न उठलाच नाही की आपल्याला इतके पाय कसे काय?
पहिल्यांदाच तिने खाली पाहिलं आणि ती घाबरली. तिला वाटलं - इतके पाय! शंभर! आपल्याला तर शंभरपर्यंत आकडेसुद्धा नीटपणे मोजता येत नाहीत.
ती सशाला म्हणाली, 'याबद्दल मी कधी विचारच केला नव्हता. आता तू लक्षात आणून दिलंयस तर करेन विचार. निरीक्षण-परीक्षण करेन आणि जो उलगडा होईल तो सांगेन तुला.'
पण मग ती गोम पुन्हा पहिल्यासारखी चालू शकली नाही.
थोडं अंतर कापलं आणि ती गळाठली.
आता ती चालत कुठे होती, आता तर तिला शंभर पायांचं गणित सोडवायचं होतं.
एवढीशी गोम आणि शंभर पाय! एव्हढीशी तिची ती अक्कल आणि एव्हढं मोठं गणित!
हे प्रचंड गणित ती सोडवणार तरी कशी?