Tuesday, July 31, 2012

काल्पनिक बंधनात अडकलेले मन

-संध्या पेडणेकर
एकदा वाळवंटातील एका सरायमध्ये एक मोठा काफिला आला. काफिल्यातील सारे प्रवासी दिवसभराच्या प्रवासानं खूप थकले होते.
उंटांच्या मालकाने नोकरांना आज्ञा दिली आणि त्यानुसार उंटांच्या गळ्यात दोरखंड बांधले गेले. मग ते दोरखंड अडकविण्यासाठी खुंट्या गाडताना एकाच्या लक्षात आलं की एका उंटाचा दोरखंड आणि खुंटी दोन्ही हरवलेत.
उंटाला मोकळं कसं सोडणार, कारण रात्री तो चालत दूर निघून जाईल आणि हरवेल असं त्याला वाटलं. त्याने ही गोष्ट आपल्या मालकाला सांगितली. काफिल्याचा मालकाने सरायच्या मालकाकडे रात्रीपुरता दोरखंड आणि खुंटी मागितली. सरायच्या मालकानं दिलगिरी व्यक्त करत सांगितलं की, 'खुंट्या किंवा दोरखंड आमच्याकडे नाहीत. पण तुम्ही असं का नाही करत? - तुम्ही खुंटी गाडल्यासारखं करा, उंटाच्या गळ्यात दोरखंड अडकवल्याचा अभिनय करा आणि उंटाला झोपून जायला सांगा.'
हा उपाय लागू होईल हे त्या काफिल्याच्या मालकाला  पटेना, पण दुसरा इलाज नव्हता त्यामुळे त्यानं सरायच्या मालकाचं म्हणणं मान्य केलं. त्यानं खुंटी गाडण्याचा, दोरखंड उंटाच्या गळ्यात अडकवण्याचा अभिनय तंतोतंत केला आणि इतर उंटांसारखंच त्या उंटालाही झोपायला सांगितलं.
आश्चर्य म्हणजे, तोवर ताटकळत उभा असलेला उंट मालकाची आज्ञा ऐकून खाली बसला आणि झोपी गेला.
हे पाहून काफिल्याच्या मालकाला थोडं हायसं वाटलं.
सकाळी पुढल्या टप्प्याच्या प्रवासासाठी निघताना इतर सर्व उंटांच्या गळ्यात अडकवलेले दोरखंड काढले गेले, खुंट्या उखडून काढल्या गेल्या. सगळे उंट पुढल्या प्रवासासाठी  सज्ज झाले. पण काल्पनिक दोरखंडाने जखडलेला उंट ढिम्म उभा राहिना.
काफिल्याचा मालक त्रासला. सरायच्या मालकापुढे त्यानं तक्रारीच्या सुरात गार्‍हाणं मांडलं. म्हणाला, 'काय चेटूक केलंत तुम्ही माझ्या उंटावर, आता तो उठून उभा राहायलासुद्धा तयार नाहीय. मी पुढच्या प्रवासाला निघणार कसा?'
सरायच्या म्हातार्‍या मालकानं म्हटलं, 'आधी त्याच्या गळ्यात बांधलेला दोर काढा आणि तो दोर बांधलेली खुंटी जमिनीतून काढा.'
काफिल्याच्या मालकानं बुचकळ्यात पडत म्हटलं, 'पण त्याच्या गळ्यात कोणताही दोरखंड नाही आणि तो कोणत्याही खुंटीला बांधलेला नाही...'
सरायच्य मालकानं म्हटलं, 'तुमच्या दृष्टीनं नाहीय. उंटाल मात्र आपण बांधले गेलेलो आहोत असंच वाटतंय. जा, खुंटी उपटा. दोरखंड काढा.'
काफिल्याच्या मालकानं मग उभे राहायला तयार नसलेल्या त्या उंटाजवळ  येऊन त्याच्या गळ्यातील दोरखंड काढल्याचा अभिनय केला, खुंटी उपटल्याचा अभिनय केला.
आश्चर्य! अंग झटकत तो उंट उठून उभा राहिला आणि इतर उंटांसोबत पुढच्या प्रवासाला निघण्यास सज्ज झाला.
काफिल्यातील लोकांना याचं खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी सरायच्या मालकाला यामागील रहस्य काय असं विचारलं तेव्हा तो हसत त्यांना म्हणाला, ' बाबांनो, उंटच नव्हे तर माणसांचंही असंच असतं. काल्पनिक खुंट्यांना सगळे अडकलेले असतात. खरं तर, उंटांबद्दल मला काहीच अनुभव नाही, माणसांच्या अनुभवावरूनच मी तुम्हाला हा सल्ला दिला होता.'

Tuesday, July 24, 2012

साचलेलं ज्ञान म्हणजे कचरा

-संध्या पेडणेकर
झेन फकीर रिंझाईंशी संबंधीत एक घटना सांगितली जाते.
ते एका टेकडीवर रहात असत.
एकदा एक पंडित त्यांना भेटायला आले.
चढण चढण्याचा त्यांना सराव नसावा, कारण पोहोचले तेव्हा त्यांना चंगलीच धाप लागलेली होती.
पण त्यांच्या मनात प्रश्नांनी नुसता धुमाकूळ माजवलेला होता.
आल्या आल्या त्यांनी रिंझाईंवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली - ईश्वर आहे की नाही हे मला जाणून घ्यायचंय. शिवाय, आत्मा आहे की नाही? ध्यान म्हणजे काय? बुद्धत्व म्हणजे काय? संबोधिची घटना... या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायचंय.
त्यांचा उतावीळपणा पाहून रिंझाईंना मौज वाटली. ते म्हणाले, 'आपण नुकतेच पोहोचताहात.  थोडी विश्रांती घ्या. मी आपल्यासाठी गरम चहा आणतो. चहा पिऊ, नंतर करू चर्चा, कसं?'
रिंझाई चहा घेऊन आले. पंडितांच्या हाती कप दिला आणि त्यात ते चहा ओतू लागले. कप भरला. पण रिंझाई थांबले नाहीत. चहा कपातून ओसंडू लागला. पंडित म्हणाले, 'अहो थांबा. कप भरलाय. त्यात थेंबभर चहाची जागाही उरलेली नाही. आणखी चहा कपात रहाणार कसा?'
रिंझाई म्हणाले, 'मला वाटलं होतं तुम्ही पोपटपंची करणारे पोकळ पंडित असाल बहुतेक, पण नाही, तुमच्यात थोडी अक्कल आहे असं दिसतं. कप भरलेला असेल तर त्यात आणखी चहा ओतता येत नाही हे तुम्हाला समजतं. मग जरा विचार करून सांगा, आपला प्याला रिकामा आहे का? समजा भेटलाच ईश्वर, तर त्याला आत्मसात करू शकाल आपण? बुद्धत्वाला उगवू देण्यासाठी तुमच्या अंतःकरणाचं आकाश मोकळं आहे का? तुमच्या अंतःकरणात इतकं ज्ञान साचलंय की समाधीचा एखादा थेंबही त्यात सामवू शकणार नाही. साचलेलं ज्ञान म्हणजे कचरा, त्याचा निचरा झाल्याशिवाय स्वच्छ समाधी लागणार कशी? बुद्धत्व येणार कुठून? तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी नक्की देईन, पण तुम्ही ती ग्रहण करू शकाल का?'

Tuesday, July 10, 2012

या शरीराची किंमत काय?

-संध्या पेडणेकर
एकदा प्रसिद्ध संत जलालुद्दीन रूमी यांना दरोडेखोरांनी पकडलं. त्याकाळी गुलामगिरीची पद्धत होती. ते रूमींना गुलामांच्या बाजारात विकण्यासाठी घेऊन निघाले.
रूमी धट्टे-कट्टे आणि उंचे-पुरे होते. डाकूंना वाटलं की गुलामांच्या बाजारात या कैद्याची चांगली किंमत मिळेल.
बाजाराच्या रस्त्यात एक माणूस त्यांना भेटला. तो गुलाम खरेदी करायला निघाला होता. बाजारापर्यंत जाण्याचा त्रास वाचेल म्हणून दरोडेखोरांनी त्या माणसाला रूमींची किंमत काय द्याल असं विचारलं. तो माणूस म्हणाला, 'मी याचे दोन हजार दीनार द्यायला तयार आहे, बोला, विकणर का?'
डाकू खूश झाले. पण रूमी त्यांना म्हणाले, 'थांबा, घाई करू नका. थोडं पुढे चला. योग्य किंमत देणारा भेटेल.'
डाकूंनी त्यांचं म्हणणं मान्य केलं. ते पुढे चालले.
पुढे त्यांना एक व्यापारी भेटला. रूमींना पाहून तो डाकूंना म्हणाला, 'मी याचे तीन हजार दीनार देईन. बोला, विकणार का?'
आता त्या दरोडेखोरांच्या मनात खूप हाव निर्माण झाली. त्यांनी आपसात मसलत करत म्हटलं, 'हा फकीर अगदी खरं बोलला बरं.' त्यांनी मग काय करावं असं पुन्हा रूमींनाच विचारलं. पण रूमी त्यांना म्हणाले, 'आत्ता नाही.'
पुढे त्यांना एक सम्राट भेटला. तो पाच हजार दीनार द्यायला तयार होता. डाकूंनी एवढ्या रकमेची कल्पनासुद्धा केली नव्हती. रग्गड झाली किंमत असं वाटून त्यांनी लगेच रूमींना विकायचं ठरवलं. त्यांना वाटलं,'सम्राटापेक्षा जास्त किंमत देऊन याला विकत घेणारा आपल्याला कोण भेटणार?'
पण पुन्हा रूमींनी त्यांना अडवलं. म्हणाले, 'नको, एवढ्यात नका विकू मला. अजून माझी खरी किंमत करणारा आला नाहीय. थोडा धीर धरा.'
डाकूंना राहवत नव्हतं, पण लोभ आवरेना. शिवाय आतापर्यंत रूमींनी म्हटलेलं खरं ठरलं होतं. शेवटी त्यांनी रूमींचं ऐकायचं ठरवलं.
ते पुढे चालले. समोरून डोक्यावर गवताचा भारा घेऊन एक माणूस येत होता. डाकू फकीराला विकायला नेत आहेत हे समजलं तसं त्यानं डाकूंना विचारलं, 'विकणार का याला?'
त्याला झिडकारत डाकू म्हणाले, 'हो, पण तू याची काय किंमत देणार? चल नीघ.'
डोक्यावरचा भारा खाली टाकत तो म्हणाला, 'गवताचा हा भारा देईन याच्या बदल्यात.'
ते ऐकून रूमी लगेच म्हणाले, 'ठीक. बरोब्बर किंमत लावली. या शरीराची हीच किंमत योग्य आहे. हा माणूस शरीराची खरी किंमत जाणतो, यालाच हे शरीर विका.'
Rumi Quote

पराजित नेपोलियन

-संध्या पेडणेकर
पराजित नेपोलियनला सेंट हेलेना नावाच्या एका बेटावर नजरबंदीत ठेवलं होतं. त्यांच्यासोबत त्यांचे खाजगी डॉक्टरही होते. विजयमोहिमेतही हे डॉक्टर नेपोलियनसोबत राहिले होते. साधारण कैदी बनून जीवन कंठावं लागणार्‍या नेपोलियनला पाहून त्यांना खूप वाईट वाटत असे.
एके दिवशी डॉक्टर आणि नेपोलियन बेटावर फेरफटका मारण्यासाठी निघाले. एका छोट्याशा पाऊलवाटेवरून ते दोघे चालले होते. तेवढ्यात समोरून डोक्यावर गवताचा भारा घेतलेली एक स्त्री आली. भारा एवढा मोठा होता की त्याखाली तिचा अर्धाअधिक चेहरा झाकला गेला होता.  ती नीट पाहू शकत नव्हती.
डॉक्टर ओरडून तिला म्हणाला, 'दूर हो, दूर हो. पाउलवाटेवरनं कोण चाललंय याची कल्पना तरी आहे का तुला?'
गवत वाहून नेणार्‍या त्या स्त्रीच्या लक्षात काही येण्याअगोदर नेपोलियनने हात धरून डॉक्टरना थोडं बाजूला नेलं. ती स्त्री नेपोलियनच्या इतक्या जवळून पुढे गेली की तिच्य डोक्यावरच्या भार्‍यातील गवताच्या काही काड्यांचा नेपोलियनच्या शरीराला स्पर्श झाला.
डॉक्टरना खूप वाईट वाटलं, पण नेपोलियनवर याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी डॉक्टरांची समजूत घालत म्हटलं, 'गड्या, संपले ते स्वप्नभारले दिवस. आता जरा जागा हो. डोंगराला म्हटलं की सरक, नेपोलियन येतोय तर त्याला सरकावं लागलं असतं असे ते दिवस आता पालटले. आता गवत वाहून नेणार्‍यांसाटीसुद्धा आपल्याला सरकावं हे लागेलच.'
जय आणि पराजयाचा खरा अर्थ नेपोलियन जाणून होता.
एका कामगार स्त्रीसाठी नेपोलियनना आपला मार्ग वळवावा लागला याची डॉक्टरना मात्र चुटपुट लागून राहिली.
---

Friday, July 6, 2012

दान काय देणार?

-संध्या पेडणेकर
ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्ध घरी परतले. अकरा वर्षांनंतर ते घरी परतले होते. त्यांनी घर सोडलं त्यावेळी त्यांचा मुलगा राहुल एक वर्षाचा होता. ते परतले तेव्हा तो बारा वर्षांचा झाला होता.
यशोधरा - गौतम बुद्धांची पत्नी - त्यांच्यावर खूप रागावलेली होती. गौतम बुद्धांवर नजर पडताच तिने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली - 'एवढासुद्धा भरंवसा वाटला नाही का तुम्हाला माझ्याबद्दल? 'मी चाललो', असं जर मला म्हटलं असतंत तर मी तुम्हाला रोखून ठेवेन असं तुम्हाला वाटलं होतं का? मी क्षत्राणी आहे हे तुम्ही कदाचित विसरला होतात तेव्हा. आम्ही जर पतीला टिळा लावून रणांगणावर पाठवू शकतो तर तुम्हाला सत्याचा शोध घेण्यासाठी पाठवू शकले नसते का मी? तुम्ही माझा अपमान केला.'
कित्येक लोकांनी बुद्धांना बर्‍याच प्रकारचे प्रश्न विचारले होते पण यशोधरेच्या प्रश्नांनी  बुद्धांना निरुत्तर केलं.
पुढे यशोधरेनं बुद्धांना विचारलं, 'जंगलात जाऊन तुम्ही जे मिळवलं ते तुम्हाला इथे राहून मिळालं नसतं का?' याचं उत्तरही बुद्ध होकारार्थी देऊ शकले नाहीत कारण सत्य तर सर्व ठिकाणी विद्यमान असतं.
पण यशोधरेनं त्यानंतर जे केलं ते वर्मी घाव घालणारं होता. यशोधरेनं आपल्या मुलाला - राहुलला पुढे केलं आणि ती त्याला म्हणाली, 'पाहा, हे समोर हातात भिक्षापात्र घेऊन जे उभे आहेत ना, तेच तुझे वडील आहेत. तू एक दिवसाचा होतास तेव्हा हे तुला सोडून पळून गेले होते. त्यानंतर हे आत्ता परतले. आता जातील तेव्हा देव जाणे पुन्हा कधी भेट होईल. तू त्यांच्याकडून आपला वारसा मागून घे. तुला देण्यासाठी यांच्याजवळ जे काय आहे ते मागून घे.'
बुद्धांजवळ त्याला देण्यासाठी काय असणार? यशोधरा सूड उगवून घेत होती, मनात साठलेला राग शब्दांवाटे व्यक्त करत होती. आपण विचारलेल्या प्रश्नामुळे परिस्थितीला अचानक वेगळी कलाटणी मिळेल याची 
तिला अजिबात कल्पना नव्हती.
तिचं बोलणं संपतं न संपतं तो बुद्धांनी आपलं भिक्षापात्र राहुलला दिलं. ते म्हणाले, 'बेटा, मला जे मिळालं ते मी तुला देतो. या व्यतिरिक्त तुला देण्याजोगं माझ्याजवळ काहीही नाही. तू संन्यासी हो!' 

ऐकलं आणि यशोधरेच्या डोळ्यांना आसवांची धार लागली.
बुद्ध म्हणाले, 'समाधीच माझी संपदा आहे. संन्यास घेण्यानंच ती वाटता येते. खरं तर, तुलाही घेऊन जावं म्हणूनच मी आलो होतो. ज्या संपदेचा मी धनी झालो तिची 
तू ही धनी व्हावंस असं मला वाटतं.'
राहूलने पित्याची इच्छा पूर्ण केली
आपण क्षत्राणी आहेत हे यशोधरेनंही सिद्ध करून दाखवलं. बुद्धांकडून दीक्षा घेऊन ती सुद्धा भिक्षुंमध्ये मिसळून गेली. इतकी, की त्यानंतर बौद्ध शास्त्रांमध्ये तिचा कुठेही उल्लेख आढळून येत नाही.