© संध्या पेडणेकर
एका राजाच्या
दरबारात हिऱ्यांचा एक व्यापारी आला. त्याच्याजवळ हिऱ्यांची एक अफलातून जोडी होती.
अत्यंत चमकदार, सुंदर, नजर ठरू नये अशा त्या दोन हिऱ्यांपैकी एक हिरा अस्सल होता
आणि दुसरा नकली होता. अस्सल हिऱ्याची
हुबेहूब नक्कल. व्यापारी राजाला म्हणाला की, या दोन हिऱ्यांपैकी अस्सल हिरा कोणता
हे जो अचूक ओळखेल त्याला मी अस्सल हिरा बक्षीस देईन. दोन्ही हिरे हुबेहूब होते. ओळखणं
खरोखर अतिशय अवघड काम होतं. शिवाय दरबाराच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता, त्यामुळेही
कुणी पुढे यायला तयार होईना.
अचानक एक आंधळा पुढे
आला. त्यानं राजाला विनंती केली, “महाराज, आपली परवानगी असेल
तर मी प्रयत्न करून पाहीन.”
राजा आणि दरबारी
बुचकळ्यात पडले. सगळे डोळस जिथे धास्तावले हे तिथे एक आंधळा अस्सल हिरा ओळखू शकेल
का? असा प्रश्न सगळ्यांना पडला. पण राजानं आंधळ्याला परवानगी दिली. आंधळ्यानं
पुढे होऊन हिऱ्यांना स्पर्श केला आणि एक हिरा उचलून धरत म्हणाला, “हा
आहे अस्सल हिरा.”
राजा, दरबारी आणि हिऱ्यांच्या व्यापाऱ्यासह सगळेच चक्रावले,
कारण आंधळ्या व्यक्तीनं अस्सल हिरा अचूक ओळखला होता.
व्यापाऱ्यानं कबूली दिली आणि आंधळ्याला तो हिरा बक्षीसही
दिला.
राजानं आंधळ्याला विचारलं, “अस्सल हिरा तू
कसा ओळखलास?”
आंधळा म्हणाला, “सोपं आहे महाराज. श्रेष्ठ व्यक्तींप्रमाणेच अस्सल
हिऱ्यावरही वातावरणातील तापमानाचा परिणाम होत नसतो. मी दोन्ही हिरे हातात घेऊन
पाहिले. एक हिरा गरम होता आणि दुसरा थंड. गरम वातावरणानं तापलेला हिरा खोटा आहे हे
मी ओळखलं. त्यामुळे खरा, अस्सल हिरा ओळखणं अवघड राहिलं नाही.” राजासह इतर सर्वजणांना आंधळ्याच्या हुशारीचं कौतुक वाटलं.
No comments:
Post a Comment