©संध्या पेडणेकर
जनक राजानं एकदा पंडितांची सभा बोलावली. सभेत
जगातील रथी-महारथींना बोलाविण्यात आलं. त्यांच्या चर्चेतून अंतिम सत्याबद्दल
निर्णय व्हावा हा त्याचा हेतू होता. सत्याचं जो उत्तमरीत्या निरूपण करेल त्याला
मुक्त हस्ते धन-धान्य दान देण्यात येईल अशी राजानं घोषणा केली होती. अपेक्षेनुसार चर्चेत
भाग घेण्यासाठी दूरवरून विद्वान मंडळी आली.
अष्टावक्रला या सभेचं आमंत्रण नव्हतं. त्याच्या
पित्याला मात्र आमंत्रण मिळालेलं होतं. त्यानुसार ते सभेत उपस्थितही झाले होते.
अचानक काही काम उद्भवल्यामुळे पित्याला
बोलाविण्यासाठी अष्टावक्रला दरबारात जावं लागलं.
शरीराला आठ ठिकाणी बांक असलेल्या अष्टावक्रानं
जेव्हा सभेत प्रवेश केला तेव्हा त्याला पाहून उपस्थित विद्वान मंडळींमध्ये
हास्याचा लोट उसळला. काही जण त्याची टिंगल-टवाळीही करू लागले. सगळेच अष्टावक्रला
पाहून हसू लागले. त्यांना असे हसताना पाहून अष्टावक्रही गदगदून हसू लागला. मात्र
तो जेव्हा हसू लागला तेव्हा सारे चूप झाले. अष्टावक्र का हसतोय हे कुणाच्याच
ध्यानात येईना.
जनक राजानं अष्टावक्रला विचारलं, ‘हे लोक कशासाठी हसतायत हे
मी समजू शकतो पण तू कशासाठी हसतोयस ते काही माझ्या ध्यानात येत नाहीय.’
अष्टावक्र म्हणाला, ‘आपण पंडित किंवा ज्ञानी लोकांऐवजी चांभारांना सभेत बोलावलंत
हे लक्षात येऊन मी हसलो. या सगळ्यांना शरीर आणि चामडीच दिसते म्हणजे ते चांभारच
नव्हेत का? राजन्, आपण यांच्याकडून परमज्ञान किंवा परम सत्याची अपेक्षा करताय म्हणजे
वाळूचे कण रगडून तेलाची अपेक्षा करताय. आपणास खरंच सत्य जाणून घ्यायचं असेल तर आपण
माझ्यापाशी यावं.’
त्यानंतर राजा जनकाने अष्टावक्राला अनेक प्रश्न
विचारले, जिज्ञासा प्रकट केल्या आणि अष्टावक्र ने त्यांचं निरसन केलं. जनक आणि
अष्टावक्र यांच्यातील संवाद ‘महागीता’ किंवा ‘अष्टावक्र गीता’ या नावाने प्रसिद्ध आहे. ज्ञानमार्गावरील तो अत्यंत
तर्कपूर्ण आणि स्पष्ट ग्रंथ मानला जातो.