Friday, June 15, 2012

चाणाक्ष गाढव

-संध्या पेडणेकर
व्यवहारचातुर्याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल अशी ही  ईसापनीतीतील एक गोष्ट.
एकदा एक सिंह, एक लांडगा आणि एक गाढव एकत्र शिकारीसाठी निघाले. तिघांनी मिळून भरपूर शिकार केली आणि मांसाचा ढीग जमवला.
मग सिंह लांडग्याला म्हणाला, 'तू या मांसाचे तीन समान वाटे कर. आपण तिघांनी मिळून शिकार केली तेव्हा प्रत्येकाला समान वाटा मिळायला हवा.'
लांडग्यानं सिंहाच्या म्हणण्याचं शब्दशः पालन केलं आणि मांसाचे तीन समान वाटे केले.
सिंहाला राग आला आणि त्यानं तत्क्षणी लांडग्यावर झेप टाकून त्याची मानगूट पिरगळली आणि मेलेल्या लांडग्यालाही मांसाच्या ढिगार्‍यावर टाकलं.
मग सिंह गाढवाकडे वळून म्हणाला, 'मांसाचे वाटे करायची जबाबदारी आता मी तुझ्यावर सोपवतो. समान दोन वाटे कर, आपल्या दोघांसाठी.'
गाढवानं मेलेल्या जनावरांच्या मांसामधून एक कावळा उचलला आणि बाजूला काढून ठेवला. मग मोठ्या ढिगाकडे इशारा करत तो सिंहाला म्हणाला, 'महाराज, हा आपला वाटा.'
सिंह एकदम खूश झाला. तो गाढवाला म्हणाला, 'वाः वाः, शहाणा आहेस. वाटण्या करण्याची कला कुठे शिकलास तू?'
गाढवानं सिंहानं केलेल्या प्रशंसेचा मान तुकवून स्वीकार केला. मग मनोमन तो बोलला,'या मेलेल्या लांडग्यानं मला सिंहासोबत केलेल्या शिकारीची वाटणी कशी करायची ते शिकवलं.'
---

Friday, June 1, 2012

क्षमा

-संध्या पेडणेकर 
कुरुक्षेत्रावर घडलेल्या युद्धानंतरच्या रात्री अश्वत्थाम्याने पांडवांच्या शिबिरास आग लावली. आगीपासून प्राण वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्यांचा त्याने बाण मारून वध केला. महाभारताच्या युद्धातून पांडवपक्षाचं जे काही सैन्यबळ वाचलं होतं त्याचा पार धुव्वा उडाला आणि पांडव वंशापैकी त्यावेळी जे कुणी शिबिरात होते ते सुद्धा मारले गेले. 
युद्धात विजय मिळाल्यानंतर पाच पांडव आणि सात्यकी यांना घेऊन कृष्ण इतर ठिकाणी गेला होता त्यामुळे ते तेवढे वाचले. पांडवांच्या सैन्यात आता एवढेच लोक उरले होते.
सकाळी जेव्हा ते शिबिरात परतले तेव्हा तिथे त्यांना अर्धवट जळालेल्या प्रेतांचा खच पडलेला दिसला. 
महाराणी द्रौपदीच्या पाचही पुत्रांचे क्षतविक्षत मृतदेह तेथे पडलेले होते. द्रौपदीच्या व्यथेचं वर्णन काय सांगावं....
अर्जुनानं द्रौपदीला धीर दिला. तो म्हणाला, यांच्या मारणार्‍या नराधमाचं - त्या अश्वत्थाम्याचं धडावेगळं शीर पाहिल्यानंतरच तू आज स्नान कर.'
आपल्या रथात बसून श्रीकृष्णाबरोबर अर्जुन अश्वत्थाम्याला शोधण्यासाठी निघून गेला.
अश्वत्थ्याम्यानं अर्जुनाला पाहिलं तेव्हा तो प्राणभयानं पळू लागला. पण अर्जुनानं त्याचा पाठलाग केला आणि त्याला बंदी बनवलं. त्यानं अश्वत्थाम्याला द्रौपदीसमोर आणून उभं केलं.
अश्वत्थाम्यावर नजर पडताच भीम म्हणाला, 'तात्काळ याला ठार मारलं पाहिजे.'
सगळ्यांचाच राग उफाळलेला होता.
पण द्रौपदीनं सगळ्यांना सबूरीनं घेण्यास सांगितलं. द्रौपदी म्हणाली, 'माझे पुत्र मारले गेले त्यामुळे पुत्रशोक म्हणजे काय हे मी चांगलं जाणते. याची माता कृपी आपल्या गुरुपत्नी आहेत. माझ्यासारखं पुत्रवियोगाचं दुःख त्याना सहन करावं लागू नये असं मला वाटतं. आपल्याला उत्तम शस्त्रविद्या देणार्‍या गुरु द्रोणांचं त्यांच्या या पुत्रात आम्हाला दर्शन होतं. याच्याशी निष्ठूरपणानं वागणं आपल्याला शक्य नाही. सोडून द्या, जाऊ दे याला.'
जिच्या पाच मुलांची प्रेतं समोर पडलेली असताना आणि त्यांचा वध करणारा समोर बंदी होऊन उभा असताना द्रौपदीनं  त्याला केलेली क्षमा खरोखर धन्य होय.
---