© संध्या पेडणेकर
प्रवास करत असताना एकदा गौतम बुद्ध थकले. उन्ह
मी म्हणत होतं. तशात पायी बरंच अंतर कापल्यामुळे त्यांना थकवा आला आणि नदीकाठच्या एका झाडाखाली ते आराम करण्यासाठी थांबले.
योगायोग असा की, त्याच वेळी बारा वर्षे ज्योतिषविद्या शिकून एक महापंडित
त्याच रस्त्याने आपल्या गावी परतत होते.
नदीकाठच्या चिखलात त्यांना गौतम बुद्धाच्या पाऊलखुणा दिसल्या. पाहिलं आणि ते आश्चर्यचकित झाले. त्यांना
वाटलं, जे दिसतंय ते जर खरं असेल तर बारा वर्षं
परिश्रमानं जे ज्ञान मिळवलं ते चूक ठरणार आणि ते ज्ञान जर खरं असेल तर- या टळटळीत
दुपारी, अनवाण्या पायांनी, या दरिद्र परिसरातील जवळ जवळ
सुकलेल्या नदीकाठी या पावलांचा मालक काय करत असेल बरं? एरवी, ज्या सम्राटाच्या पावलांच्या या खुणा आहेत त्यांच्या
पावलांना महालाबाहेरील धूळ शिवणंसुद्धा शक्य नसेल.
शिवाय, या एकाच व्यक्तीच्या पावलांच्या खुणा
आहेत. सोबत वजीर नाही, सेनापती नाही, इतर कुणीही नाही... असंभव!
आपल्या ज्ञानासमोर हे एक आव्हान आहे असं त्या महापंडितांना
वाटलं. त्यांनी ते आव्हान झेलायचं ठरवलं. कोडं उलगडण्यासाठी पाऊलखुणांचा मागोवा
घेत ते त्या व्यक्तीच्या शोधात निघाले आणि गौतम बुद्धापर्यंत पोहोचले.
त्यांना पाहिलं आणि ते आणखी चक्रावले. सौंदर्य,
आभा, सुगंधानं देहाभोवती प्रकाशवलय असणाऱ्या या व्यक्तीला खरं तर सम्राटच असायला
हवं, पण...
जवळच असलेलं भिक्षापात्र, फाटलेली जुनी वस्त्रं,
खपाटीला गेलेलं पोट, हाडांचा सापळा बनलेला देह पाहून महापंडित गोंधळले. त्यांना
वाटलं, थकलेली, धुळीनं माखलेली आणि सध्या झाडाच्या खोडाला पाठ टेकून विसावलेली ही
व्यक्ती सम्राट असायला हवी, पण इथे काही वेगळंच दृश्य दिसतंय.... असं कसं?
ते बुद्धाजवळ गेले आणि म्हणाले, “बारा वर्षे कठिण परिश्रम
करून मी ज्योतिषविद्या शिकलो. गुरुगृहातून बाहेर पडल्यावर मला भेटलेली पहिली
व्यक्ती आपणच आहात आणि आपण मला प्रचंड बुचकळ्यात टाकलंय. आपल्या पावलांच्या खुणा
सांगताहेत की आपण सम्राट आहात, पण आपल्याजवळील हे भिक्षापात्र, भर उन्हात आपलं असं
झाडाखाली श्रांत बसणं... आपण भिक्षु आहात हे यावरून सिद्ध होतं. तरी आपल्या
चेहऱ्यावर, डोळ्यांत जे तेज आहे ते पाहून वाटतं, आपण सम्राटच आहात. मोठ्या पेचात
सापडलोय मी.”
त्यांचं बोलणं ऐकून बुद्धाच्या चेहऱ्यावर स्मित
झळकलं. ते म्हणाले, “जोवर मी बंधनात अडकलेला होतो तोवर आपल्या भविष्यविद्येच्या
अडाख्यांना माझं भाग्य बांधील होतं. पण आता मी मुक्त आहे. ग्लानीत जगत असलेल्यांबद्दलचे
आपल्या भविष्यविद्येचे अडाखे तंतोतंत खरे ठरत असतील, पण मी ग्लानीत नाही, मी जागा
झालोय. म्हणून माझ्या बाबतीत आपलं भविष्य लागू होणार नाही.”
महापंडित गोंधळले, त्यांनी विचारलं, ‘म्हणजे? आपण कोण आहात?’
भगवान त्याला म्हणाले, ‘मी केवळ बुद्ध आहे. जागा
झालेला आहे.’