Wednesday, December 11, 2013

देवाची भेट

-संध्या पेडणेकर
पंजाबातील संत बुल्लेशाह यांनी एका माळ्याला आपला गुरु मानलं होतं.
बुल्लेशाह यांचं मूळ नाव अब्दुल्ला शाह होतं. अरबी, फारसी आणि कुराण यांचं उत्तम ज्ञान असल्याऱ्या त्यांच्या वडिलांना लोक आदरानं दरवेश मानायचे. ते एका मशीदीचे मौलवी होते. बुल्ले शाह यांचं शिक्षण ख्यातनाम गुरु हजरत गुलाम मुर्तजांकडे झालं. पण परमात्म्याच्या दर्शनाच्या ओढीनं त्यांना हजरत इनायत शाह कादरी यांच्यापर्यंत आणून पोहोचवलं. हजरत इनायत शाह जातीनं माळी होते. बुल्ले शाहांच्या घरातील लोक त्यांनी निम्न जातीच्या व्यक्तीला गुरु मानलं याबद्दल नाराज होते. पण बुल्ले शाह यांना त्याची पर्वा नव्हती. ईशसाधना हेच त्यांच्या जीवनाचं इतिकर्तव्य होऊन बसलं होतं.
बुल्ले शाह एकदा आपल्या गुरुंना भेटायला गेले. त्यावेळी त्यांचे गुरु बागेत काम करत होते. बुल्ले शाहनी त्यांना विचारलं, परमात्म्याच्या प्राप्तीचा काही उपाय सांगा.
आपल्या कामात गर्क असलेल्या गुरुंनी त्यांच्याकडे वळूनही न पाहाता म्हटलं,
"बुल्लिहआ रब दा की पौणा| एधरों पुटणा ते ओधर लाउणा|"
म्हणजे- परमात्म्याची भेट हवी तर करायचं काय, तर - इकडचं उपटा न् तिकडे लावा, बस।
थोडा वेळ विचार केल्यानंतर बुल्ले शाह म्हणाले, मला समजलं नाही.
गुरुंनी त्यांना विचारलं, देव कुठे असतो ते सांग. 

बुल्ले शाह म्हणाले, वर,  आकाशात.
गुरु त्यांना म्हणाले, मग उपट आकाशातून देवाला आणि लाव आपल्या हृदयात. आपल्या हृदयातील मीपणाचा भाव उपट आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये त्याची रोपणी कर. म्हणजे, सगळ्यांमध्ये तुला आपण स्वतःच असल्याचं जाणवेल. आपल्या हृदयात एव्हढं प्रेम निर्माण कर की सर्व जीवांमध्ये तुला स्वतः असल्याचं जाणवू दे.
---
हिंसेचं उत्तर हिंसा नव्हे ही बुल्ले शाह यांची प्रमुख शिकवण. यू ट्यूब वर बुल्ले शाह यांच्या काही प्रसिद्ध गाण्याच्या लिंक अशा-