Saturday, August 24, 2019

मरण नकोच


©संध्या पेडणेकर
एका जंगलात एक गरीब, म्हातारा लाकूडतोड्या राहत असे. तो जीवनाला खूप कंटाळला होता. खूप दुखी होता तो. दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतरही त्याला पोटाची खळगी भरण्यापुरतं अन्नही मिळत नसे. दिवसेंदिवस तो खंगत चालला होता. अशक्तपणामुळे त्याला काम करताना खूप त्रास व्हायचा. त्याची काळजी घेण्यासाठी त्याच्याबरोबर इतर कोणी नव्हतं.
एके दिवशी तो जंगलात लाकडे तोडायला गेला. कष्टामुळे अधून-मधून तो कण्हत होता. अचानक त्याच्या मनात आलं, कष्टात असं जगण्याऐवजी मला मृत्यू आला तर किती बरं होईल!
लाकूडतोड्याच्या मनात हे आलं आणि त्याला आपल्या मागे कोणीतरी उभं असल्याचा भास झाला. तो मागे वळून बघणार एवढ्यात कोणाचातरी भक्कम हात त्याच्या खांद्यावर आला.
लाकूडतोड्याचा थरकाप उडाला. त्याने मागे वळून पाहिलं पण तिथे कुणीच नव्हतं. मात्र त्याला आपल्या खांद्यावर कुणाच्यातरी हाताचा स्पर्श स्पष्ट जाणवत होता. कोणीतरी आहे असं त्याला खात्रीपूर्वक वाटलं. तो काही बोलण्याआधी ती अदृश्य व्यक्ती त्याला म्हणाली, मी मृत्यू. यम. आत्ताच तुला माझी आठवण आली ना? म्हणून मी तातडीने झालो. सांग, काय करू तुझ्यासाठी?’
यमाचं नाव ऐकलं आणि म्हाताऱ्या लाकूडतोड्याची घाबरगुंडी उडाली. त्याला खूप घाम फुटला. कसाबसा धीर एकवटून तो म्हणाला, हे मृत्यू देवता, मी बिचारा गरीब लाकूडतोड्या, तुमच्याकडे माझं काय काम असणार?’
यम त्याला म्हणाला, माझंही तुझ्याकडे काहीच काम नाहीये, पण आत्ता तू माझी आठवण काढलीस म्हणून मी हजर झालो.
थरथर कापत लाकूडतोड्या यमाला म्हणाला, हे मृत्यू देवता, माफ करा मला. माझ्याकडून चूक झाली. लाकडाचा हा भारा उचलायसाठी मला कोणीतरी मदतीला हवं होतं. म्हणून मला तुमची आठवण आली, पुन्हा कधीही माझ्याकडून अशी चूक होणार नाही. आणि चुकून जर माझ्या तोंडी तुमचं नाव आलं तरी एका गरीब लाकूडतोड्याची हाक ऐकून लगेच त्याच्या मदतीला धावत येण्याचे कष्ट तुम्ही घेऊ नका. मला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही, खूप सुखी आहे मी!’

Monday, January 25, 2016

मनाचे मंदिर

©संध्या पेडणेकर/
एक संन्यासी आणि एक गणिका समोरासमोर रहात असत. दोघांचाही एकाच दिवशी मृत्यू झाला. वैकुठात देवदूत गणिकेला स्वर्गात आणि संन्याशाला नरकात घेऊन चालले. तेव्हा संन्याशानं तक्रार करत म्हटलं, अरे, काय करताय? मी संन्यासी आहे. जीवनभर मी मंदिरात राहिलो आणि देवभक्ती केली. आणि तुम्ही मला नरकात घेऊन चाललाय? आणि या पापिणीला, व्यभिचारिणीला स्वर्गात नेताय?’

देवदूतांनाही काहीतरी गडबड होतेय असं वाटलं. त्यांच्यापैकी एकानं जाऊन पुन्हा चौकशी केली. परत येऊन त्यानं म्हटलं, कोणतीही गफलत झालेली नाही. संन्याशाचा वैराग वरवरचा होता. मनात त्याला नेहमी असंच वाटत असे की मी इथे देवाच्या पूजेअर्चेत मग्न आहे आणि ही गणिका आनंदात मग्न आहे. सकाळी तो देवाच्या दाराची घंटा वाजवत असे पण त्याच्या मनात मात्र गणिकेच्या घरातली गाणीच गुंजारव करत राहिली. त्याने केलेल्या पूजेअर्चेला काहीही अर्थ नव्हता कारण त्याचं मन नेहमी गणिकेच्या घरी काय चाललं असेल या विकारी विचारांत मग्न असे.
आणि गणिकेचं अगदी याउलट होतं. सकाळी मंदिराची घंटा वाजली की तिचं मन भगवत्चरणी लीन होत असे. तिला आपल्या दुर्भाग्याचं वाईट वाटत असे. आपलं जीवन असंच व्यर्थ जाणार याचं तिला अतोनात दुःख होत असे. आपण कधीही परमात्म्याचं चिंतन करू शकणार नाही असं तिला वाटे. अशा प्रकारे संन्यासी मनानं जन्मभर गणिकेच्या घरी राहिला आणि गणिका मनानं मंदिरात रमली.
म्हणूनच, तो देवदूत म्हणाला, कोणतीही गफलत झालेली नाही. मनाशिवाय शरीराचं अस्तित्व ते काय. माणूस तिथेच असतो जिथे त्याचं मन असतं.

Monday, January 4, 2016

मालक कोण अन् गुलाम कोण?

© संध्या पेडणेकर

http://classicalwisdom.com/diogenes-of-sinope
संतांच्या महानतेचे गोडवे त्यांच्या मृत्यूनंतर लोकांनी कितीही गायिले तरी जिवंतपणी संतांच्या वाट्याला बहुधा प्रचंड मनस्ताप, हालअपेष्टाच आलेल्या असतात. प्राचीनकाळी ग्रीक देशात असाच एक महान विद्वान फकीर होऊन गेला. त्याचं नाव डायोजनीज. लोक त्याचा सल्ला घेण्यासाठी दूरवरून यायचे. 
गरजेहून अधिक काही स्वतःच्या मालकीचे नसावे, किंबहुना कुणी आपल्या गरजेपेक्षा अधिक काही जवळ बाळगू नये असं डायोजनीजचं मत होतं. सिनोपे गावचा हा विद्वान अथेन्समध्ये आला तेव्हा त्याने तेथे राहाणाऱ्या आपल्या मित्रांना स्वतःसाठी खोली पाहायला सांगितली. पण त्याचे मित्र त्याच्यासाठी खोलीची व्यवस्था करू शकले नाहीत. तेव्हा अथेन्सच्या रस्त्यावर पडलेल्या दारूच्या एका रिकाम्या पिंपात डायोजनीजने आपली पथारी पसरली. तो जोवर अथेन्समध्ये राहिला तोवर त्या पिंपातच राहिला. जिथे जायचा तिथे तो ते पिंप लोटत न्यायचा. 
एकदा काही गुलामांच्या व्यापाऱ्यांची डायोजनीजवर नजर पडली. तो होताच सुंदर, भक्कम आणि उंचा-पुरा. याची गुलामांच्या बाजारात चांगली किंमत मिळेल असं वाटल्यावरून त्यांनी डायोजनीजला पकडलं आणि ते त्याला घेऊन निघाले. डायोजनीजने त्यांना विचारलं, 'कुठे नेताय मला?' व्यापाऱ्यांनी सांगितलं तसा तो त्यांना म्हणाला, 'चला, मी चलतो तुमच्याबरोबर.' बहुधा लोक त्यांच्यापासून दूर रहायचा प्रयत्न करत असत, पण डायोजनीज स्वतः त्यांच्याबरोबर निघाला तेव्हा त्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं.
बाजाराता त्याला उभं करून व्यापाऱ्यांनी जेव्हा 'कुणी हा गुलाम खरेदी करणार का?' असा पुकारा केला तेव्हा डायोजनीज त्यांना म्हणाला, 'तुम्ही कशाला पुकारा करता? मीच करतो.' मग त्यानं आवाज दिला, 'मालक हवाय का कुणाला, मालक?'
गुलामांच्या बाजारात मालकाच्या विक्रीचा पुकारा ऐकून तेथे गर्दी जमा झाली. 
डायोजनीजला पकडून आणणारे व्यापारी नाराज झाले. त्यांनी त्याला दटावलं, 'काय तमाशा चालवलाय?'
डायोजनीज त्यांना म्हणाला, 'मला भले कुणीही खरेदी करोत, मालक मात्र मीच रहाणार!'
गुलामांच्या बाजारात त्या दिवशी राजासुद्धा आपल्या लवाजम्यानिशी आला होता. गर्दी पाहून तो डायोजनीजला उभे केलेल्या चौथऱ्याजवळ आला. डायोजनीजचा उद्दामपणा पाहून त्याला राग आला आणि त्याने आपल्या लोकांना आज्ञा दिली, 'करा खरेदी याला, गुर्मी उतरवू याची.'
महालात आल्यावर राजा डायोजनीजला म्हणाला, 'थांब, आत्ता तुझ्या तंगड्या तोडतो, मग समजेल गुलाम कोण आणि मालक कोण.' राजानं आपल्या सेवकांना डायोजनीजचे पाय तोडायची आज्ञा दिली. 
डायोजनीज राजाला म्हणाला, 'तंगड्या तोडायच्या म्हणतोस तर तोड, पण आधी विचार कर, तू मला काम करण्यासाठी खरेदी केलंयस. बिन पायांचा गुलाम काय मेहनत करणार? तुला नाहक त्याला पोसावं लागेल.'
राजा विचारात पडला. त्याला वाटलं, 'खरंच सांगतोय हा. बिन पायाचा गुलाम काय कामाचा? 
राजानं आपल्या सेवकांना म्हटलं, 'जाऊ दे, नका तोडू त्याचे पाय.'  
डायोजनीज राजाला म्हणाला, 'पाहिलंस? आता सांग, मालक कोण आणि गुलाम कोण?'
--------------------------------- 
डायोजनीजबद्दल आणखी माहितीसाठी दुवा- http://www.ancient.eu/article/740/



Monday, April 6, 2015

अलेक्झांडर आणि डायोजनीज

© संध्या पेडणेकर

http://classicalwisdom.com/diogenes-of-sinope
जग जिंकल्यानंतर जगज्जेता अलेक्झांडर तत्ववेत्ता डायोजनीजला भेटायला गेला. तो गेला तेव्हा डायोजनीज सकाळच्या वेळी उन्ह अंगावर घेत वाळूत उघडा-वाघडा पडून होता. मोठमोठे राजे-महाराजे अलेक्झांडर आला की उभं राहून त्याचं स्वागत करत पण डायोजनीज उठलासुद्धा नाही. अपमानित झाल्यासारखं वाटून अलेक्झांडरला थोडं अस्वस्थ वाटलं. तरी तो म्हणाला, "आपल्याबद्दल बरंच ऐकलंय मी. म्हणून खूप दूरवरून मी आपल्याला भेटायला आलो. मला न घाबरणारे आपण पहिलेच. मी आलो म्हणून आपण उठून उभे सुद्धा नाही राहिलात. मी खूश आहे आपल्यावर. मी आपणासाठी काय करू ते सांगा."
डायोजनीज म्हणाला, "तू? माझ्यासाठी काय करणार तू?"
डायोजनीजचं बोलणं अलेक्झांडरला आवडलं नाही. तरीही डायोजनीजच्या निडरतेचं त्याला कौतुक वाटलं. थोडा वेळ गप्प उभा राहिल्यानंतर तो म्हणाला, "मी जगज्जेता आहे. आपणावर उपकार करण्यासाठी नाही आलो मी, आपल्याबद्दल मला वाटणारा आदर व्यक्त करण्यासाठी आलो. आपणासाठी काही करता आलं तर बरं वाटेल मला." 
अलेक्झांडरच्या या विनम्र वागण्याचा डायोजनीज वर काहीही परिणाम झाला नाही.  तो अलेक्झांडरला म्हणाला, "काही करायचंच म्हणतोस, तर बाबा जरा असा बाजूला होऊन उभा रहा. मला उन्ह शेकायचंय. तू मध्येच ऊन अडवून उभा आहेस. थोडा बाजूला सरकून उभा राहा. यापेक्षा अधिक तुला माझ्यासाठी काही करता येणार नाही आणि मला गरजही नाही कशाची."

Wednesday, April 1, 2015

सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार

नमस्कार मंडळी.
आपणा सर्वांकडून 'आरंभ' आणि ईसाहित्य द्वारा प्रकाशित आरंभ मधील कथांच्या 'सूज्ञकथा' संग्रहाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. मध्ये बराच काळ इतर लेखन कार्यामुळे ब्लॉग वर पोस्ट टाकता आल्या नाहीत. पण आता नियमीतपणाने ब्लॉग अपडेट होत राहील. बऱ्याच वाचकांच्या
मध्यंतरी साने गुरुजींच्या 'श्यामची आई'चा हिंदीत अनुवाद करण्याची संधी मिळाली. मराठीतील ही श्रेष्ठ कृती हिंदी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचं काम मी खूप आवडीनं केलं. हिंदी वाचकांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहाण्याची उत्सुकता आहे. आपल्या हिंदी भाषी मित्रपरिवारापर्यंत ही बातमी आपण पोहोचवाल याची खात्री आहेच. प्रभात प्रकाशनच्या वेबसाईटवरून हे पुस्तक मागवता येईल.
संपर्कासाठी माझा ईमेल-sandhyaship@gmail.com
प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत.  -संध्या पेडणेकर

Friday, November 21, 2014

एक तरी कथा अनुभवावी



विनामूल्य वितरणासाठी उपलब्ध @ http://www.esahity.com/

Friday, April 11, 2014

जागृत पथिक

© संध्या पेडणेकर
प्रवास करत असताना एकदा गौतम बुद्ध थकले. उन्ह मी म्हणत होतं. तशात पायी बरंच अंतर कापल्यामुळे त्यांना थकवा आला आणि नदीकाठच्या एका झाडाखाली ते आराम करण्यासाठी थांबले.
योगायोग असा की, त्याच वेळी बारा वर्षे ज्योतिषविद्या शिकून एक महापंडित त्याच रस्त्याने आपल्या गावी परतत होते.
नदीकाठच्या चिखलात त्यांना गौतम बुद्धाच्या पाऊलखुणा दिसल्या. पाहिलं आणि ते आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटलं, जे दिसतंय ते जर खरं असेल तर बारा वर्षं परिश्रमानं जे ज्ञान मिळवलं ते चूक ठरणार आणि ते ज्ञान जर खरं असेल तर- या टळटळीत दुपारी, अनवाण्या पायांनी, या दरिद्र परिसरातील जवळ जवळ सुकलेल्या नदीकाठी या पालांचा मालक काय करत असेल बरं? एरवी, ज्या सम्राटाच्या पावलांच्या या खुणा आहेत त्यांच्या पावलांना महालाबाहेरील धूळ शिवणंसुद्धा शक्य नसेल.
शिवाय, या एकाच व्यक्तीच्या पावलांच्या खुणा आहेत. सोबत वजीर नाही, सेनापती नाही, इतर कुणीही नाही... असंभव!
आपल्या ज्ञानासमोर हे एक आव्हान आहे असं त्या महापंडितांना वाटलं. त्यांनी ते आव्हान झेलायचं ठरवलं. कोडं उलगडण्यासाठी पाऊलखुणांचा मागोवा घेत ते त्या व्यक्तीच्या शोधात निघाले आणि गौतम बुद्धापर्यंत पोहोचले.
त्यांना पाहिलं आणि ते आणखी चक्रावले. सौंदर्य, आभा, सुगंधानं देहाभोवती प्रकाशवलय असणाऱ्या या व्यक्तीला खरं तर सम्राटच असायला हवं, पण...
जवळच असलेलं भिक्षापात्र, फाटलेली जुनी वस्त्रं, खपाटीला गेलेलं पोट, हाडांचा सापळा बनलेला देह पाहून महापंडित गोंधळले. त्यांना वाटलं, थकलेली, धुळीनं माखलेली आणि सध्या झाडाच्या खोडाला पाठ टेकून विसावलेली ही व्यक्ती सम्राट असायला हवी, पण इथे काही वेगळंच दृश्य दिसतंय.... असं कसं?
ते बुद्धाजवळ गेले आणि म्हणाले, बारा वर्षे कठिण परिश्रम करून मी ज्योतिषविद्या शिकलो. गुरुगृहातून बाहेर पडल्यावर मला भेटलेली पहिली व्यक्ती आपणच आहात आणि आपण मला प्रचंड बुचकळ्यात टाकलंय. आपल्या पावलांच्या खुणा सांगताहेत की आपण सम्राट आहात, पण आपल्याजवळील हे भिक्षापात्र, भर उन्हात आपलं असं झाडाखाली श्रांत बसणं... आपण भिक्षु आहात हे यावरून सिद्ध होतं. तरी आपल्या चेहऱ्यावर, डोळ्यांत जे तेज आहे ते पाहून वाटतं, आपण सम्राटच आहात. मोठ्या पेचात सापडलोय मी.
त्यांचं बोलणं ऐकून बुद्धाच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. ते म्हणाले, जोवर मी बंधनात अडकलेला होतो तोवर आपल्या भविष्यविद्येच्या अडाख्यांना माझं भाग्य बांधील होतं. पण आता मी मुक्त आहे. ग्लानीत जगत असलेल्यांबद्दलचे आपल्या भविष्यविद्येचे अडाखे तंतोतंत खरे ठरत असतील, पण मी ग्लानीत नाही, मी जागा झालोय. म्हणून माझ्या बाबतीत आपलं भविष्य लागू होणार नाही.
महापंडित गोंधळले, त्यांनी विचारलं, म्हणजे? आपण कोण आहात?’

भगवान त्याला म्हणाले, मी केवळ बुद्ध आहे. जागा झालेला आहे.

Sunday, February 2, 2014

अस्सल हिरा

© संध्या पेडणेकर
एका राजाच्या दरबारात हिऱ्यांचा एक व्यापारी आला. त्याच्याजवळ हिऱ्यांची एक अफलातून जोडी होती. अत्यंत चमकदार, सुंदर, नजर ठरू नये अशा त्या दोन हिऱ्यांपैकी एक हिरा अस्सल होता आणि दुसरा  नकली होता. अस्सल हिऱ्याची हुबेहूब नक्कल. व्यापारी राजाला म्हणाला की, या दोन हिऱ्यांपैकी अस्सल हिरा कोणता हे जो अचूक ओळखेल त्याला मी अस्सल हिरा बक्षीस देईन. दोन्ही हिरे हुबेहूब होते. ओळखणं खरोखर अतिशय अवघड काम होतं. शिवाय दरबाराच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता, त्यामुळेही कुणी पुढे यायला तयार होईना.
अचानक एक आंधळा पुढे आला. त्यानं राजाला विनंती केली, महाराज, आपली परवानगी असेल तर मी प्रयत्न करून पाहीन.
राजा आणि दरबारी बुचकळ्यात पडले. सगळे डोळस जिथे धास्तावले हे तिथे एक आंधळा अस्सल हिरा ओळखू शकेल का? असा प्रश्न सगळ्यांना पडला. पण राजानं आंधळ्याला परवानगी दिली. आंधळ्यानं पुढे होऊन हिऱ्यांना स्पर्श केला आणि एक हिरा उचलून धरत म्हणाला, हा आहे अस्सल हिरा.
राजा, दरबारी आणि हिऱ्यांच्या व्यापाऱ्यासह सगळेच चक्रावले, कारण आंधळ्या व्यक्तीनं अस्सल हिरा अचूक ओळखला होता.
व्यापाऱ्यानं कबूली दिली आणि आंधळ्याला तो हिरा बक्षीसही दिला.
राजानं आंधळ्याला विचारलं, अस्सल हिरा तू कसा ओळखलास?”
आंधळा म्हणाला, सोपं आहे महाराज. श्रेष्ठ व्यक्तींप्रमाणेच अस्सल हिऱ्यावरही वातावरणातील तापमानाचा परिणाम होत नसतो. मी दोन्ही हिरे हातात घेऊन पाहिले. एक हिरा गरम होता आणि दुसरा थंड. गरम वातावरणानं तापलेला हिरा खोटा आहे हे मी ओळखलं. त्यामुळे खरा, अस्सल हिरा ओळखणं अवघड राहिलं नाही.” राजासह इतर सर्वजणांना आंधळ्याच्या हुशारीचं कौतुक वाटलं. 

Wednesday, December 11, 2013

देवाची भेट

-संध्या पेडणेकर
पंजाबातील संत बुल्लेशाह यांनी एका माळ्याला आपला गुरु मानलं होतं.
बुल्लेशाह यांचं मूळ नाव अब्दुल्ला शाह होतं. अरबी, फारसी आणि कुराण यांचं उत्तम ज्ञान असल्याऱ्या त्यांच्या वडिलांना लोक आदरानं दरवेश मानायचे. ते एका मशीदीचे मौलवी होते. बुल्ले शाह यांचं शिक्षण ख्यातनाम गुरु हजरत गुलाम मुर्तजांकडे झालं. पण परमात्म्याच्या दर्शनाच्या ओढीनं त्यांना हजरत इनायत शाह कादरी यांच्यापर्यंत आणून पोहोचवलं. हजरत इनायत शाह जातीनं माळी होते. बुल्ले शाहांच्या घरातील लोक त्यांनी निम्न जातीच्या व्यक्तीला गुरु मानलं याबद्दल नाराज होते. पण बुल्ले शाह यांना त्याची पर्वा नव्हती. ईशसाधना हेच त्यांच्या जीवनाचं इतिकर्तव्य होऊन बसलं होतं.
बुल्ले शाह एकदा आपल्या गुरुंना भेटायला गेले. त्यावेळी त्यांचे गुरु बागेत काम करत होते. बुल्ले शाहनी त्यांना विचारलं, परमात्म्याच्या प्राप्तीचा काही उपाय सांगा.
आपल्या कामात गर्क असलेल्या गुरुंनी त्यांच्याकडे वळूनही न पाहाता म्हटलं,
"बुल्लिहआ रब दा की पौणा| एधरों पुटणा ते ओधर लाउणा|"
म्हणजे- परमात्म्याची भेट हवी तर करायचं काय, तर - इकडचं उपटा न् तिकडे लावा, बस।
थोडा वेळ विचार केल्यानंतर बुल्ले शाह म्हणाले, मला समजलं नाही.
गुरुंनी त्यांना विचारलं, देव कुठे असतो ते सांग. 

बुल्ले शाह म्हणाले, वर,  आकाशात.
गुरु त्यांना म्हणाले, मग उपट आकाशातून देवाला आणि लाव आपल्या हृदयात. आपल्या हृदयातील मीपणाचा भाव उपट आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये त्याची रोपणी कर. म्हणजे, सगळ्यांमध्ये तुला आपण स्वतःच असल्याचं जाणवेल. आपल्या हृदयात एव्हढं प्रेम निर्माण कर की सर्व जीवांमध्ये तुला स्वतः असल्याचं जाणवू दे.
---
हिंसेचं उत्तर हिंसा नव्हे ही बुल्ले शाह यांची प्रमुख शिकवण. यू ट्यूब वर बुल्ले शाह यांच्या काही प्रसिद्ध गाण्याच्या लिंक अशा-

Saturday, November 16, 2013

खरा ज्ञानी

©संध्या पेडणेकर
जनक राजानं एकदा पंडितांची सभा बोलावली. सभेत जगातील रथी-महारथींना बोलाविण्यात आलं. त्यांच्या चर्चेतून अंतिम सत्याबद्दल निर्णय व्हावा हा त्याचा हेतू होता. सत्याचं जो उत्तमरीत्या निरूपण करेल त्याला मुक्त हस्ते धन-धान्य दान देण्यात येईल अशी राजानं घोषणा केली होती. अपेक्षेनुसार चर्चेत भाग घेण्यासाठी दूरवरून विद्वान मंडळी आली.
अष्टावक्रला या सभेचं आमंत्रण नव्हतं. त्याच्या पित्याला मात्र आमंत्रण मिळालेलं होतं. त्यानुसार ते सभेत उपस्थितही झाले होते.
अचानक काही काम उद्भवल्यामुळे पित्याला बोलाविण्यासाठी अष्टावक्रला दरबारात जावं लागलं.
शरीराला आठ ठिकाणी बांक असलेल्या अष्टावक्रानं जेव्हा सभेत प्रवेश केला तेव्हा त्याला पाहून उपस्थित विद्वान मंडळींमध्ये हास्याचा लोट उसळला. काही जण त्याची टिंगल-टवाळीही करू लागले. सगळेच अष्टावक्रला पाहून हसू लागले. त्यांना असे हसताना पाहून अष्टावक्रही गदगदून हसू लागला. मात्र तो जेव्हा हसू लागला तेव्हा सारे चूप झाले. अष्टावक्र का हसतोय हे कुणाच्याच ध्यानात येईना.
जनक राजानं अष्टावक्रला विचारलं, हे लोक कशासाठी हसतायत हे मी समजू शकतो पण तू कशासाठी हसतोयस ते काही माझ्या ध्यानात येत नाहीय.
अष्टावक्र म्हणाला, आपण पंडित किंवा ज्ञानी लोकांऐवजी चांभारांना सभेत बोलावलंत हे लक्षात येऊन मी हसलो. या सगळ्यांना शरीर आणि चामडीच दिसते म्हणजे ते चांभारच नव्हेत का? राजन्, आपण यांच्याकडून परमज्ञान किंवा परम सत्याची अपेक्षा करताय म्हणजे वाळूचे कण रगडून तेलाची अपेक्षा करताय. आपणास खरंच सत्य जाणून घ्यायचं असेल तर आपण माझ्यापाशी यावं.

त्यानंतर राजा जनकाने अष्टावक्राला अनेक प्रश्न विचारले, जिज्ञासा प्रकट केल्या आणि अष्टावक्र ने त्यांचं निरसन केलं. जनक आणि अष्टावक्र यांच्यातील संवाद महागीता किंवा अष्टावक्र गीता या नावाने प्रसिद्ध आहे. ज्ञानमार्गावरील तो अत्यंत तर्कपूर्ण आणि स्पष्ट ग्रंथ मानला जातो. 

Tuesday, November 12, 2013

नेपोलियनचे प्रशंसक

©संध्या पेडणेकर
पॅरिसमधील एका बागेत सुंदर शुभ्र घोड्यावर बसलेल्या नेपोलियनचा पुतळा होता.

त्या बागेजवळच्या परिसरातील एका घरात एक पिता-पुत्र रहात असत.
ते नियमानं रोज त्या बागेत फेरफटका मारण्यासाठी येत.
बागेत आले की नेपोलियनच्या पुतळ्यासमोर बाप-लेक दोघांचीही पावले थबकत.
बाप-लेक दोघेही पुतळ्याकडे पाहात काही वेळ घालवत. मग घराकडे परतत.
बापाला वाटे, नेपोलियनच्या उमद्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव आपल्या मुलावर पडला तर उत्तमच आहे.
होता होता एके दिवशी त्यांची पॅरिसहून दुसऱ्या शहरात बदली झाली.
त्याला आणि मुलाला दोघांनाही या गोष्टीचं फार वाईट वाटलं की आता आपल्याला रोज रोज नेपोलियनला पाहाता येणार नाही.
निघण्याआधी एकदा शेवटचं म्हणून नेपोलियनच्या त्या पुतळ्याचं दर्शन घ्यायला दोघे आले.
बराच वेळ टक लावून पाहात राहिले.
मग मुलगा भारावलेल्या आवाजात म्हणाला, किती सुंदर पुतळा आहे हा बाबा, नेपोलियन खरंच खूप उमदा होता. पहायला हवं होतं त्याला जिवंतपणी. पण बाबा, हा त्याच्या पाठीवर बसलेला इसम कोण?!
:-)

Friday, September 20, 2013

सत्यवादी सॉक्रेटीस

©संध्या पेडणेकर.
सॉक्रेटीस नावाचा एक ग्रीक तत्ववेत्ता होऊन गेला. सत्य बोलल्याबद्दल त्याला विष दोऊन ठार मारण्यात आलं. खरं बोलणं हाच केवळ त्याचा अपराध होता. त्यानं राज्याविरुद्ध बंडाळी केली नव्हती. तो क्रांतीकारकही नव्हता. म्हणजे क्रांती करून राज्य उलथून टाकण्याचाही त्याचा प्रयत्न नव्हता. त्याचं लोकांना फक्त एव्हढंच सांगणं होतं की बाबांनो, खोट्याची कास नका धरू. खोट्याचाच राजमार्ग असणाऱ्या शहरात कुणाला सहन होणार हे
? न्यायालयात त्याच्यावर खटला गुदरला गेला, तो पटपट चालला आणि त्याला वीष देऊन ठार मारण्याची शिक्षा मिळाली. कोणतीही चालढकल न करता ती लागलीच अमलातही आणली गेली.
पण मनं सगळ्यांचीच निर्ढावलेली नसतात. सॉक्रेटीसचा शिष्यवर्ग होता. समाजातील काही लोकही त्याच्या बाजूनं होते. अर्थातच षंढ सहानुभूती कधी कुणाच्या उपयोगी पडत नसते. तशी या लोकांची सहानुभूतीही सॉक्रेटीसच्या कामी आली नाही. त्याला मुख्य न्यायाधीशानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. व्यवस्थेचा तो पाईक होता तरी निरपराध व्यक्तीला मृत्युदंड ठोठावताना त्याला अपराधी वाटत होतं. नाइलाज होता त्याचा कारण ज्यूरींचं बहुमत सॉक्रेटीसच्या विरोधात होतं. तरीही, आपल्या अधिकाराचा वापर करत मुख्य न्यायाधीशानं एक मार्ग काढला. तो सॉक्रेटीसला म्हणाला,
मी विनंती करतो की अथेन्स सोडून कायमचे निघून जायला तयार असाल तर आम्ही आपणास कोणताही दंड देणार नाही. अथेन्स सोडून निघून गेल्यानंतर आपणास जे वाटेल ते करायला आपण स्वतंत्र असाल, याबाबत अथेन्सवासियांची कोणतीही हरकत नसेल.
सॉक्रेटीस त्यांना म्हणाला, मी जिथे जाईन तिथे माझ्यावर खटला चालवला जाईल. सत्य जिथे जाईल तिथे लोक दुखावतीलच. अथेन्ससारख्या सुसंस्कृत शहरात सत्य जर असह्य होत असेल इतर कुठे ते सुसह्य ठरेल याची शक्यता नाही.
मुख्य न्यायाधीशांनी त्याला आणखी एक संधी देण्याचा प्रयत्न करत म्हटलं, मग असं करा, आपण अथेन्समध्येच रहा. म्हातारपणात आपणास आम्ही अथेन्सबाहेर काढू इच्छीत नाही. पण सत्य बोलणं बंद करा.

यावर सॉक्रेटीस म्हणाला, हे तर आणखी कठिण आहे. नव्हे अशक्य आहे. मी जगू शकणार नाही. सत्य माझा श्वास आहे. श्वास घेतल्याशिवाय कुणी जगू शकत नाही तद्वत मी सत्याची कास सोडू शकत नाही. जीवन उरो किंवा जावो, सत्याशिवाय त्याचं काय मोल? आपण मृत्युदंड ठोठवावा हेच माझ्यासाठी उत्तम ठरेल. ऩिदान लोक म्हणतील तरी की- त्यानं कोणतीही तडजोड स्वीकारली नाही, सत्यासाठी सॉक्रेटीस मेला. 
-------------- 
Painting - 'Death Of Socrates'
http://en.wikipedia.org/wiki/Trial_of_Socrates
http://en.wikipedia.org/wiki/Socrates

Friday, September 6, 2013

प्रेम जागवा

-संध्या पेडणेकर
जगातल्या प्रसिद्ध महिला संतांमध्ये सूफी संत राबियाचंही नाव येतं.
एकदा राबियाच्या घरी एक फकीर मुक्कामाला होता. धर्मग्रंथ वाचत असताना राबियानं एक ओळ पुसली हे त्यानं पाहिलं.
त्याला मोठं आश्चर्य वाटलं. धर्मग्रंथासारख्या पवित्र रचनेमध्ये राबिया खाडाखोड कशी काय करते?
त्यानं हा प्रश्न राबियाला विचारला.
राबियानं पुसलेली ओळ होती - सैतानाबद्दल घृणा बाळगा.
राबिया त्या फकीराला म्हणाली, "माझ्या मनात  परमात्म्याविषयी प्रेम जागं झालं आणि त्या प्रेमानं माझ्या मनाचा संपूर्ण पसारा व्यापला. आता माझ्या मनात घृणेसाठी जागाच नाही.
बहुधा असंच होत असावं. मनात परमात्म्याविषयी प्रेम जागं झालं की कुणाहीबद्दल घृणा बाळगता येतच नाही - अगदी सैतानाबद्द्द्लसुद्धा! त्यामुळे धर्मग्रंथातली ही ओळ मला अनावश्यक वाटली आणि म्हणून मी ती खोडली"

Saturday, August 10, 2013

पहिल्यांदा करण्याचं महत्व

-संध्या पेडणेकर
अमेरिकेचा शोध लावल्यानंतर कोलंबस मायदेशी परतला. 
राणीनं त्याचं भव्य स्वागत केलं. 
राजदरबारात त्याच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रम आयोजित केला. 
काही दरबारी कोलंबसचे घोर विरोधक होते. त्यांना अर्थातच हे आवडलं नाही. 
समारंभ सुरू असताना त्यांच्यापैकी काही म्हणाले, 'कोलंबसने काही खास कामगिरी बजावलीय असं आम्हाला वाटत नाही. पृथ्वी गोल आहे. कुणीही जरी गेलं असतं तरी त्याला अमेरिका मिळाली असतीच.'
बराच वेळ कोलंबस त्यांचे टोमणे ऐकत राहिला.
शेवटी समोरच्या थाळीत खाण्यासाठी ठेवलेल्या उकडलेल्या अंड्यांपैकी एक अंडं उचललं आणि तो म्हणाला, 'आपल्यापैकी कुणी हे अंडं टेबलावर सरळ उभं करून दाखवू शकेल का?'
कोलंबसने विचारल्यावर त्याच्या सगळ्या विरोधकांनी अंडं टेबलावर सरळ उभं करणं एक आव्हान समजून स्वीकारलं. पटापट थाळीतील अंडी उचलून ते प्रयत्नाला लागले.
पण कुणालाही अंडं टेबलावर उभं करता येईना.
शेवटी ते म्हणाले, "अंडं टेबलावर सरळ उभं राहूच शकत नाही. "
हसतच कोलंबसनं एक अंडं उचललं आणि जोरात टेबलावर आपटलं. त्यामुळे अंड्याच्या बुडाकडचा भाग चेपला आणि अंडं सरळ उभं राहिलं.
कोलंबस म्हणाला, "पाहा, मी अंडं उभं केलं."
यावर सगळेच दरबारी गलका करत म्हणू लागले, 'तू अंडं चेपवलंस. असं तर कुणीही अंडं उभं करू शकेल.'
कोलंबस म्हणाला, "पण कुणी केलं का? एकदा कुणी करून दाखवल्यानंतर करणं सोपं असतं. पहिल्यांदा कोण करतं यालाच महत्व असतं."

Monday, August 5, 2013

श्रीमती रूथ

-संध्या पेडणेकर
खलील जिब्रान यांची आणखी एक कथा –
एकदा तिघे पुरुष भ्रमण करत निघाले असता त्यांना दूर टेकडीवर एक सुंदर महाल दिसला.
लगेच त्यापैकी एक म्हणाला,  तुम्हाला ठाऊक आहे का, त्या महालात श्रीमती रूथ रहाते. चेटकीण आहे ती.
दुसरा म्हणाला, ते घर श्रीमती रूथचंच आहे पण तिच्याबद्दल तुम्हाला मिळालेली माहिती चुकीची आहे बरं. अहो, ती चेटकीण नाही एक सुंदर स्त्री आहे. अगदी स्वप्नाळू... नेहमी आपल्या स्वप्नांत चूर असते ती.
तिसरा म्हणाला – सुंदर आहेच पण मी असंही ऐकलंय की ती खूप क्रूर, कठोर आणि पाषाणहृदयी आहे. ही आसपासची सगळी जमीन तिचीच आहे. या जमिनीवर राबणाऱ्या कुळांचं ती अक्षरशः रक्त शोषून घेते म्हणे.
बोलता बोलता ते गावात पोहोचले. 
समोरून एक म्हातारा येत असलेला त्यांना दिसला. 
त्याला यांनी विचारलं, काहो बाबा, त्या टेकडीवरल्या महालात कोणी श्रीमती रूथ रहाते तिच्याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का?”
म्हाताऱ्यानं तिघांकडे पाहिलं न् मग म्हणाला, हो, श्रीमती रूथ तिथे रहायच्या. म्हणजे, मी आता नव्वद वर्षांचा आहे. माझ्या लहानपणी मी त्यांच्याबद्दल बरंच ऐकलं होतं. पण मी साधारण दहाएक वर्षांचा असेन तेव्हाच त्या वारल्या. तेव्हापासून हा त्यांचा महाल अगदी ओसाड पडलाय. फक्त घुबडं घुमतात तिथे. काही लोक म्हणतात की तेथे भुतं रहातात.

Saturday, August 3, 2013

रोग जाणून उपचार करा

-संध्या पेडणेकर
एकच उपचार सगळ्यांवर लागू होत नसतो. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते आणि प्रकृतीनुसार केलेले उपचारच रोगापासून मुक्ती मिळवून देतात. प्रकृतीविरुद्ध केलेले उपचार घातक ठरण्याचीही शक्यता असते. आजी एक गोष्ट सांगायची -
गणेश नावाच्या एका व्यक्तीच्या पोटात एके दिवशी अचानक खूप दुखू लागलं. वेदना असह्य झाल्या तेव्हा तो गावच्या वैद्याकडे गेला. वैद्यानं त्याला तपासलं पण नेमकं काय झालंय हे काही त्याला कळलं नाही. त्यानं गणेशाला तसं सांगितलं. म्हणाला - 'माफ कर बाळा मला, पण तुझ्या पोटात नेमकं कशामुळे दुखतंय हे काही माझ्या लक्षात येत नाहीय. मी तुझ्यावर उपचार करू शकत नाही.'
आधीच गणेश पोटदुखीनं हैराण झालेला होता. वैद्यबुवा नेमके काय म्हणाले हे त्याच्या लक्षात आलं नाही. अनुमानानं त्यानं आपल्यापरीनं अर्थ लावला की आपल्याला झालेल्या दुखण्यावर उपचार नाहीत! दुःखी मनानं तो घरी परतला.
त्याला कांद्याचं लोणचं खूप आवडायचं. त्याला वाटलं, एवीतेवी आपण आता मरणारच आहोत, तर निदान पोटभर कांद्याचं लोणचं खाऊन तरी मरू. त्यानं लोणच्याची बरणी शेजारी ठेवली, वाडगाभर लोणचं काढून घेतलं आणि खायला सुरवात केली. हां हां म्हणता त्यानं  बायकोनं वर्षभरासाठी करून ठेवलेलं लोणचं फस्त केलं.
आश्चर्य म्हणजे, लोणचं खाता खाता त्याची पोटदुखी थांबली केव्हा त्याला कळलंसुद्धा नाही.
दोन-तीन दिवसांनी वैद्यबुवांना गणेशच्या पोटदुखीची आठवण आली. ते गणेशला भेटले. गणेशची तब्बेत उत्तम असून तो कामात गुंतलेला आहे हे पाहून वैद्यबुवांना बरं वाटलं. त्यांनी विचारलं तेव्हा गणेशानं त्यांना कांद्याच्या लोणच्याची महिमा सांगितली. वैद्यबुवांना वाटलं, म्हणजे कारण लक्षात न आलेल्या पोटदुखीवर कांद्याचं लोणचं हा उपचार ठरू शकतो.
काही दिवसांनी वैद्यबुवांकडे राजेश पोटदुखीची तक्रार घेऊन आला. वैद्यबुवांनी त्याला तपासलं पण रोगाचं निदान त्यांना करता आलं नाही. त्यांनी राजेशला सांगितलं, एक किलो कांद्याचं लोणचं खरेदी कर आणि खा.
राजेशनं कांद्याचं लोणचं खरेदी केलं आणि खायला घेतलं.
थोडं लोणचं खाल्लं आणि त्याला पोटदुखीची असह्य उबळ आली.
वैद्यबुवांवर राजेशचा पूर्ण विश्वास होता. पोटदुखी सहन करूनही तो लोणचं खात राहिला. आणखी थोडं लोणचं खाल्लं आणि त्याची पोटदुखी शिगेला पोहोचली. शेवटी तो पोटदुखीनं मेला.
---   ---   ---   ---   ---   ---   ---   ---

Friday, March 29, 2013

नहि सत्यात्परो धर्मः!


-संध्या पेडणेकर
एकदा बरेचसे ब्राह्मण तत्वज्ञानी गौतमाला भेटायला आले. गौतमाच्या शिष्यांनी आपल्या गुरूला सांगितले,'आपल्या भेटीच्या अपेक्षेने ब्रह्मवादी तत्वज्ञानी आलेले आहेत. त्यांनी एक नवीन तत्वज्ञान स्थापित केलेले आहे. आणि या तत्वज्ञानातील मुख्य देव म्हणजे ब्रह्म होय असे त्यांचे म्हणणे आहे.  गुरुजी, आपणाला याविषयी काय सांगावयाचे आहे ते जाणण्याची आम्हा सार्‍यांची इच्छा आहे.'
गौतमांनी यावर जे उत्तर दिलं ते अत्यंत विचारार्ह आहे असे मला वाटते. गौतमांनी या ब्रह्मवाद्यांना प्रश्न केला, 'तुम्ही ब्रह्म पाहिले आहे का?'
उत्तर मिळाले, 'नाही.'
गौतमांनी विचारले, 'तुम्ही ब्रह्माबरोबर भाषण केले आहे का?'
पुन्हा उत्तर होते, 'नाही.'
गौतमांचा पुढचा प्रश्न होता, 'तुम्ही ब्रह्माविषयी काही ऐकले तरी आहे का?'
त्यांचे उत्तर तेच होते, 'नाही.'
गौतमांनी विचारले, 'तुम्ही ब्रह्माची चव घेऊन पाहिली आहे का?'
उत्तर होते, 'नाही.'
यावर गौतम ब्रह्मवाद्यांन्या म्हणाले, 'तुमच्या पंचज्ञानेंद्रियांनी व पंचकर्मेंद्रियांनी ब्रह्म काय आहे हे अनुभवले नाही म्हणता तर मग ब्रह्म आहे हे तरी तुम्ही कशावरून म्हणता?' यावर ब्रह्मवाद्यांना काही उत्तर देता आले नाही.
डॉ बाबासाहब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड 18, भाग 3, 243.
वडाला, मुंबई येथील सिद्धार्थ कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षिक समारंभ प्रसंगी दिलेल्या वक्तव्यातून.

Wednesday, November 14, 2012

विसोबा खेचर

-संध्या पेडणेकर
संत चरित्रांमध्ये विसोबांचे नाव विसोबा खेचर कसे पडले याबद्दल एका घटनेचा उल्लेख येतो.
आळंदीत रहाणार्‍या दुष्ट विसोबा ब्राह्मणाला ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाईबद्दल नेहमी द्वेष वाटायचा.
एकदा मुक्ताबाईला मांडे खायची इच्छा झाली.
मांडे बनविण्यासाठी मातीच्या तव्याची गरज होती. ज्ञानेश्वर तवा आणण्यासाठी कुंभाराकडे निघाले.
रस्त्यात त्यांना विसोबा भेटले. ज्ञानेश्वर कुंभाराकडे कशासाठी चालले आहेत हे कळले तेव्हा तेही त्यांच्यासोबत निघाले.
त्यांनी कुंभाराला ज्ञानेश्वरांना तवा देऊ दिला नाही.
दुखी मनाने ज्ञानेश्वर घरी परतले. मुक्ताबाईनं विचारलं, 'भांडं कुठाय?'
ज्ञानेश्वर तिला म्हणाले, 'तू तयारी कर, माझ्या पाठीवर मांडे भाज.'
तवा न मिळाल्याने घरी परतल्यानंतर होणारी भांडणे पाहाण्यासाठी ज्ञानेश्वरांमागोमाग विसोबासुद्धा येऊन लपून उभे होते.
मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे थापले, भाजले हे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
हा चमत्कार पाहून विसोबा आमूलाग्र बदलले. पुढे येत त्यांनी ज्ञानेश्वरांचे पाय धरले आणि माफी मागितली.
तवा न मिळण्यामागे विसोबांचं कारस्थान होतं हे  मुक्ताबाईला समजलं. रागानं ती म्हणाली, 'दूर हो खेचरा! आधी तवा मिळू दिला नाहीस आणि आता मांडे बनू देणार नाहीस का?'
ज्ञानेश्वरांनी मुक्ताईला शांत केलं. पण तेव्हापासून विसोबा झाले विसोबा खेचर. आजही त्यांना याच नावानं ओळखलं जातं. 

Monday, October 29, 2012

भीती कुणाची?

-संध्या पेडणेकर
एकदा टॉलस्टॉय भल्या पहाटे उठून चर्चमध्ये गेले.
आपण दरवेळी जातो तेव्हा देव भक्तांच्या गर्दीत असतो, आज आपण देवाला एकट्याला भेटू असा विचार त्यांनी केला.
पण ते जेव्हा चर्चमध्ये पोहोचले तेव्हा तेथे आधीच एक माणूस गुडघे टेकून बसला होता आणि देवाच्या मूर्तीबरोबर काहीतरी बोलत होता. तो बोलत असलेले काही शब्द टॉलस्टॉयच्या कानांवर पडले.
तो म्हणत होता, 'देवा मला माफ कर... सांगतानासुद्धा शरमिंधं व्हावं इतकी मी पापे केली आहेत. माफ कर मला...'
टॉलस्टॉयला वाटलं, किती महान व्यक्ती आहे ही. अगदी खुल्या दिलाने देवाकडे आपल्या हातून घडलेल्या पापांसाठी क्षमा मागतेय. पश्चातापानं बहुधा पोळून निघालेला दिसतोय.
तेव्हढ्यात त्या व्यक्तीची नज़र या माणसावर पडली. गोंधळून गेल्यासारखा वाटला तो क्षणभर. मग टॉलस्टॉयना म्हणाला, 'महाशय, देवाशी माझा जो संवाद चालला होता तो आपण ऐकला तर नाही?'
टॉलस्टॉय म्हणाले, 'हो, मला आपलं बोलणं ऐकू आलं आणि खरं सांगतो, धन्य वाटलं मला अगदी. आपल्या अपराधांची कबूली दिलीत आपण, मला आदर वाटतो आपल्याबद्दल.'
तो माणूस म्हणाला, 'ते सगळं ठीक आहे, पण कृपा करून आपण या गोष्टी इतर कुणाला सांगू नका. खरं तर या केवळ माझ्या आणि देवामधल्या गोष्टी. आपण ऐकल्या म्हणता तर ठीक आहे, पण कृपया इतर कुणालाही सांगू नका. आणि सांगितल्या तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा...   '
टॉलस्टॉयनी आश्चर्यानं विचारलं, 'पण आत्ता आपण देवासमोर आपल्या अपराधांबद्दल पश्चाताप व्यक्त करत होतात, आणि आता...'
तो माणूस म्हणाला, 'त्या केवळ माझ्या आणि देवामधल्या गोष्टी होत्या. जगासाठी नव्हत्या त्या.'
टॉलस्टॉयना वाटलं, असं आहे तर, म्हणजे लोक  इतर लोकांनाच घाबरतात, देवाला नाही!
---

Thursday, October 25, 2012

स्वतःपासून सुरवात


-संध्या पेडणेकर
युद्धाचे दिवस. राजाचे सैनिक सगळीकडे विखुरलेले होते. ते ज्या गावात जात त्या गावातल्या लोकांना इच्छा असो वा नसो त्यांच्या राहाण्या-खाण्याची व्यवस्था करावी लागे. लोकांमध्ये देशभक्तीची उणीव होती असे नव्हे. सैनिकांचे वागणे, त्यांचा क्रूरपणा आणि अकारण नासधूस करण्याची सवय यामुळे लोक त्यांच्यापासून चार हात लांब रहाणेच पसंत करीत असत.
एके दिवशी सैनिकांच्या अधिकार्यानं एका शेतकर्‍याला विचारलं, ‘गावात कुणाच्या शेतात पीक चांगलं उभं आहे ते सांग. आता आठवडाभरापर्यंत आमचा येथेच मुक्काम रहाणार आहे. आम्हाला आपल्या खाण्या-पिण्याची आणि घोड्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करायचीय.’
शेतकरी पेचात पडला. सांगितले नाही तर सैनिकांच्या तावडीत सापडणार, ते आपल्याला यथेच्छ बुकलणार आणि सांगायचं तर ज्या शेतकर्‍याबद्दल सांगायचं त्याच्या संपूर्ण शेतावर सैनिकांचा नांगर फिरणार. वर्षभर मग त्याच्या घरातले लोक काय खाणार? त्यांच्या इतर गरजा कशा पूर्ण होणार?
चालता चालता त्याने मनाशी एक निर्णय घेतला.
गावकर्‍यांच्या शेतांतून ते फिरत होते. सैनिकांनी बर्‍याच शेतांकडे बोट दाखवून तेथील पीक चांगले असल्याचं सांगितलं पण दरवेळी आपल्याला इथली जास्त माहिती असल्याचं सांगत त्या शेतकर्‍यानं त्यांना पुढे नेलं. दरवेळी तो म्हणायचा, 'यापेक्षा चांगलं पीक कुठे उभं आहे ते मला ठाऊक आहे, पुढे चला.'
शेवटी सगळे एका शेतापाशी पोहोचले. समोर उभ्या पिकाकडे बोट दाखवून शेतकरी म्हणाला की, या शेतातलं पीक सर्वात चांगलं आहे.
सैनिक अधिकारी भडकला. म्हणाला, ‘वेड लागलं का रे तुला? यापेक्षा कैक पटींनी चांगल्या पिकांची शेतं आपण मागे टाकून आलो की. असं का केलंस?'
शेतकरी सैनिकांच्या अधिकार्‍याला म्हणाला, 'शेतकर्‍यांना त्यांच्या पिकाची किंमत तुम्ही देणार नाही हे मला ठाऊक होतं. अशावेळी मी इतर कुणाचं नुकसान कसं करणार? हे पीकच शेतकर्‍यांची वर्षभराची कमाई. यावरच ते आपल्या संसाराचा गाडा रेटतात. त्यांची ही कमाई मी कशी काय हिरावू देणार? आणि  मी खोटं बोललो नाहीय. हे माझं शेत आहे. माझ्या दृष्टीनं याच शेतातलं पीक सर्वात जास्त चांगलं आहे.'
शेतकर्‍याचं बोलणं ऐकून सैनिक अधिकारी शरमिंधा झाला. त्याने शेतकर्‍याला त्याच्या पिकाची किंमत तर दिलीच, शिवाय, न घाबरता त्याने जी उत्तरे दिली त्यासाठी त्याला बक्षीसही दिले.
---