Showing posts with label भगवान बुद्ध. Show all posts
Showing posts with label भगवान बुद्ध. Show all posts

Friday, April 11, 2014

जागृत पथिक

© संध्या पेडणेकर
प्रवास करत असताना एकदा गौतम बुद्ध थकले. उन्ह मी म्हणत होतं. तशात पायी बरंच अंतर कापल्यामुळे त्यांना थकवा आला आणि नदीकाठच्या एका झाडाखाली ते आराम करण्यासाठी थांबले.
योगायोग असा की, त्याच वेळी बारा वर्षे ज्योतिषविद्या शिकून एक महापंडित त्याच रस्त्याने आपल्या गावी परतत होते.
नदीकाठच्या चिखलात त्यांना गौतम बुद्धाच्या पाऊलखुणा दिसल्या. पाहिलं आणि ते आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटलं, जे दिसतंय ते जर खरं असेल तर बारा वर्षं परिश्रमानं जे ज्ञान मिळवलं ते चूक ठरणार आणि ते ज्ञान जर खरं असेल तर- या टळटळीत दुपारी, अनवाण्या पायांनी, या दरिद्र परिसरातील जवळ जवळ सुकलेल्या नदीकाठी या पालांचा मालक काय करत असेल बरं? एरवी, ज्या सम्राटाच्या पावलांच्या या खुणा आहेत त्यांच्या पावलांना महालाबाहेरील धूळ शिवणंसुद्धा शक्य नसेल.
शिवाय, या एकाच व्यक्तीच्या पावलांच्या खुणा आहेत. सोबत वजीर नाही, सेनापती नाही, इतर कुणीही नाही... असंभव!
आपल्या ज्ञानासमोर हे एक आव्हान आहे असं त्या महापंडितांना वाटलं. त्यांनी ते आव्हान झेलायचं ठरवलं. कोडं उलगडण्यासाठी पाऊलखुणांचा मागोवा घेत ते त्या व्यक्तीच्या शोधात निघाले आणि गौतम बुद्धापर्यंत पोहोचले.
त्यांना पाहिलं आणि ते आणखी चक्रावले. सौंदर्य, आभा, सुगंधानं देहाभोवती प्रकाशवलय असणाऱ्या या व्यक्तीला खरं तर सम्राटच असायला हवं, पण...
जवळच असलेलं भिक्षापात्र, फाटलेली जुनी वस्त्रं, खपाटीला गेलेलं पोट, हाडांचा सापळा बनलेला देह पाहून महापंडित गोंधळले. त्यांना वाटलं, थकलेली, धुळीनं माखलेली आणि सध्या झाडाच्या खोडाला पाठ टेकून विसावलेली ही व्यक्ती सम्राट असायला हवी, पण इथे काही वेगळंच दृश्य दिसतंय.... असं कसं?
ते बुद्धाजवळ गेले आणि म्हणाले, बारा वर्षे कठिण परिश्रम करून मी ज्योतिषविद्या शिकलो. गुरुगृहातून बाहेर पडल्यावर मला भेटलेली पहिली व्यक्ती आपणच आहात आणि आपण मला प्रचंड बुचकळ्यात टाकलंय. आपल्या पावलांच्या खुणा सांगताहेत की आपण सम्राट आहात, पण आपल्याजवळील हे भिक्षापात्र, भर उन्हात आपलं असं झाडाखाली श्रांत बसणं... आपण भिक्षु आहात हे यावरून सिद्ध होतं. तरी आपल्या चेहऱ्यावर, डोळ्यांत जे तेज आहे ते पाहून वाटतं, आपण सम्राटच आहात. मोठ्या पेचात सापडलोय मी.
त्यांचं बोलणं ऐकून बुद्धाच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. ते म्हणाले, जोवर मी बंधनात अडकलेला होतो तोवर आपल्या भविष्यविद्येच्या अडाख्यांना माझं भाग्य बांधील होतं. पण आता मी मुक्त आहे. ग्लानीत जगत असलेल्यांबद्दलचे आपल्या भविष्यविद्येचे अडाखे तंतोतंत खरे ठरत असतील, पण मी ग्लानीत नाही, मी जागा झालोय. म्हणून माझ्या बाबतीत आपलं भविष्य लागू होणार नाही.
महापंडित गोंधळले, त्यांनी विचारलं, म्हणजे? आपण कोण आहात?’

भगवान त्याला म्हणाले, मी केवळ बुद्ध आहे. जागा झालेला आहे.

Wednesday, March 21, 2012

अंगुलीमाल

-संध्या पेडणेकर
बौद्ध त्रिपिटकात अंगुलीमालची कथा आहे.
अंगुलीमाल अतिशय क्रूर होता. तो जंगलात रहायचा आणि जाणा-येणार्‍या वाटसरूंना आधी लुटायचा आणि मग ठार मारून त्यांच्या बोटांची माळ गळ्यात बांधायचा. एक हजार लोकांना मारून त्यांच्या बोटांची माळ गळ्यात बांधायची त्यानं प्रतिज्ञा केली होती. त्यामुळेच त्याचं नाव अंगुलीमाल पडलं होतं. त्यानं नऊशे नव्याण्णव लोकांना ठार मारलं होतं. प्रतिज्ञा पूर्ण होण्यासाठी फक्त एकाचीच उणीव होती.
त्या दरम्यान भगवान बुद्ध भ्रमण करत त्या भागात पोहोचले होते. ज्या रस्त्यावर  अंगुलीमालशी गाठ पडायची शक्यता होती त्या रस्त्यानं ते निघाले तेव्हा गावकर्‍यांनी त्यांना पुढे न जाण्याविषयी सांगितलं. बौद्ध भिक्षुंनीही त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.
भगवान बुद्ध म्हणाले,  'मला माहीत नसतं तर कदाचित मी दुसर्‍या मार्गानं गेलोही असतो, पण आता अजिबात नाही. या वाटेनं मलाच गेलं पाहिजे. इतर कुणी जाणार नाही.'
भगवान बुद्ध निघाले. सोबत भिक्षुही निघाले पण नेहमी बुद्धांची सावली होऊन चालणारे शिष्य घाबरून चार पावलं मागेच चालत होते. बुद्ध एकटेच अंगुलीमालच्या भेटीला निघाले.
त्यांना येताना पाहून अंगुलीमाल दुरूनच ओरडला, 'भिक्षु, आहेस तिथेच थांब! मी कोण आहे हे कदाचित तुला माहीत नाही असं दिसतंय!'
त्याचं बोलणं ऐकून भगवान बुद्ध हसले.  म्हणाले, 'तुलाही कदाचित मी कोण आहे हे माहीत नाही असं दिसतंय! खरं तर, आपण कोण हे ही तुला ठाऊक नाहीय!'
गौतम बुद्धांचं उत्तर ऐकून अंगुलीमाल चपापला. एवढ्या आत्मविश्वासानं बोलणारा माणूस त्यानं याआधी पाहिला नव्हता.
तेवढ्यात गौतम बुद्ध त्याच्या पुढ्यात येऊन उभे राहिले. म्हणाले, 'हे पाहा, कसलीही घाई नाही. मला तू निवांतपणे कधीही मारू शकतोस. पण मारण्याआधी माझी एक छोटीशी इच्छा पूर्ण कर. या झाडाची काही पानं मला तोडून आणून दे.'
अंगुलीमाल वृक्षाची मोठी फांदीच तोडून घेऊन आला.
भगवान बुद्ध त्याला म्हणाले, 'माझी अर्धी इच्छा पूर्ण झाली. आता उरलेली इच्छाही पूर्ण कर. ही पानं पुन्हा झाडाला जोड.'
अंगुलीमाल म्हणाला, 'तुटलेली फांदी पुन्हा झाडाला जोडणार कशी?'
भगवान बुद्ध त्याला म्हणाले, 'जोडू शकत नाहीस तर तोडण्याचं काम का करतोस? एवढ्या लोकांना मारलंस तू, पण एखाद्या मुंगीला तरी जिवंत करता येतं का तुला? ज्याला आपण पुन्हा जिवंत करू शकत नाही त्याला मारण्याचा अधिकार आपल्याकडे आहे का?'
भगवान बुद्धांचं बोलणं ऐकून अंगुलीमालला आपली चूक जाणवली. त्याच्या हातून फरसा निखळला. आणि त्यानं भगवान बुद्धांच्या पायांवर लोटांगण घातलं.

---