Showing posts with label विष. Show all posts
Showing posts with label विष. Show all posts

Friday, September 20, 2013

सत्यवादी सॉक्रेटीस

©संध्या पेडणेकर.
सॉक्रेटीस नावाचा एक ग्रीक तत्ववेत्ता होऊन गेला. सत्य बोलल्याबद्दल त्याला विष दोऊन ठार मारण्यात आलं. खरं बोलणं हाच केवळ त्याचा अपराध होता. त्यानं राज्याविरुद्ध बंडाळी केली नव्हती. तो क्रांतीकारकही नव्हता. म्हणजे क्रांती करून राज्य उलथून टाकण्याचाही त्याचा प्रयत्न नव्हता. त्याचं लोकांना फक्त एव्हढंच सांगणं होतं की बाबांनो, खोट्याची कास नका धरू. खोट्याचाच राजमार्ग असणाऱ्या शहरात कुणाला सहन होणार हे
? न्यायालयात त्याच्यावर खटला गुदरला गेला, तो पटपट चालला आणि त्याला वीष देऊन ठार मारण्याची शिक्षा मिळाली. कोणतीही चालढकल न करता ती लागलीच अमलातही आणली गेली.
पण मनं सगळ्यांचीच निर्ढावलेली नसतात. सॉक्रेटीसचा शिष्यवर्ग होता. समाजातील काही लोकही त्याच्या बाजूनं होते. अर्थातच षंढ सहानुभूती कधी कुणाच्या उपयोगी पडत नसते. तशी या लोकांची सहानुभूतीही सॉक्रेटीसच्या कामी आली नाही. त्याला मुख्य न्यायाधीशानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. व्यवस्थेचा तो पाईक होता तरी निरपराध व्यक्तीला मृत्युदंड ठोठावताना त्याला अपराधी वाटत होतं. नाइलाज होता त्याचा कारण ज्यूरींचं बहुमत सॉक्रेटीसच्या विरोधात होतं. तरीही, आपल्या अधिकाराचा वापर करत मुख्य न्यायाधीशानं एक मार्ग काढला. तो सॉक्रेटीसला म्हणाला,
मी विनंती करतो की अथेन्स सोडून कायमचे निघून जायला तयार असाल तर आम्ही आपणास कोणताही दंड देणार नाही. अथेन्स सोडून निघून गेल्यानंतर आपणास जे वाटेल ते करायला आपण स्वतंत्र असाल, याबाबत अथेन्सवासियांची कोणतीही हरकत नसेल.
सॉक्रेटीस त्यांना म्हणाला, मी जिथे जाईन तिथे माझ्यावर खटला चालवला जाईल. सत्य जिथे जाईल तिथे लोक दुखावतीलच. अथेन्ससारख्या सुसंस्कृत शहरात सत्य जर असह्य होत असेल इतर कुठे ते सुसह्य ठरेल याची शक्यता नाही.
मुख्य न्यायाधीशांनी त्याला आणखी एक संधी देण्याचा प्रयत्न करत म्हटलं, मग असं करा, आपण अथेन्समध्येच रहा. म्हातारपणात आपणास आम्ही अथेन्सबाहेर काढू इच्छीत नाही. पण सत्य बोलणं बंद करा.

यावर सॉक्रेटीस म्हणाला, हे तर आणखी कठिण आहे. नव्हे अशक्य आहे. मी जगू शकणार नाही. सत्य माझा श्वास आहे. श्वास घेतल्याशिवाय कुणी जगू शकत नाही तद्वत मी सत्याची कास सोडू शकत नाही. जीवन उरो किंवा जावो, सत्याशिवाय त्याचं काय मोल? आपण मृत्युदंड ठोठवावा हेच माझ्यासाठी उत्तम ठरेल. ऩिदान लोक म्हणतील तरी की- त्यानं कोणतीही तडजोड स्वीकारली नाही, सत्यासाठी सॉक्रेटीस मेला. 
-------------- 
Painting - 'Death Of Socrates'
http://en.wikipedia.org/wiki/Trial_of_Socrates
http://en.wikipedia.org/wiki/Socrates

Tuesday, March 27, 2012

सूडाची आग

-संध्या पेडणेकर
पंचतंत्रात भरुंड नावाच्या एका पक्षाची गोष्ट आहे.
भरुंडला दोन डोकी होती. म्हणजे धड एकच, पण त्या धडावर दोन माना, त्या मानांवर दोन डोकी, आणि या दोन डोक्यांवर प्रत्येकी दोन डोळे, दोन तोंडं, दोन चोची आणि दोन कान.
आपल्या या दोन डोक्यांच्या शरीरामुळे भरुंड इतरांमध्ये उठून दिसायचा. त्यामुळं तो नेहमी वेगळ्याच ताठ्यात असायचा. स्वतःला नेहमी इतरांपेक्षा श्रेष्ठ मानायचा.
एकदा भरुंडचं एक तोंड एक फळ खात होतं. खाता खाता ते तोंड उद्गारलं, 'वाः! किती स्वादिष्ट आहे हे फळ. अमृततुल्य चव आहे या फळाची. तोंडात सुखाची नुसतं कारंजं फुटतंय. चंदनाच्या की पारिजातकाच्या झाडाचं असेल?... कोणत्या झाडाचं फळ आहे कुणास ठाऊक. आधी मला हे खाऊन संपवू दे.'
मग ते डोकं फळ खाण्यात अगदी पूर्णपणे रंगून गेलं.
पण त्याचं बोलणं ऐकून इकडे दुसर्‍या डोक्याच्या तोंडाला पाणी सुटलं. दुसर्‍या डोक्यानं पहिल्या डोक्याला म्हटलं, 'मलासुद्धा चव घेऊ दे ना रे, थोडं दे मला.'
पहिल्या डोक्यानं म्हटलं, 'मी खाल्लं काय न् तू खाल्लं काय, सारखंच आहे. शेवटी फळ पोटातच जाणार ना? खाऊ दे मला. चवच घ्यायची म्हणतोयस तर तुला देऊन काय उपयोग, तू आणि मी एकच तर आहोत.' बोलता बोलता पहिल्या डोक्यानं पूर्ण फळ एकट्यानं फस्त केलं.
तेव्हापासूनच पहिल्या डोक्याबद्दलचा राग दुसर्‍या डोक्यात धुमसू लागला. सूड उगविण्याची संधी कधी मिळते याची दुसरं डोकं वाट पाहू लागलं.
एके दिवशी दुसर्‍या डोक्याला एक विषारी फळ मिळालं. ते फळ त्यानं पहिल्या डोक्याला दाखवलं आणि म्हटलं, 'स्वार्थी डोक्या, हे फळ किती विषारी आहे हे ठाऊक आहे का तुला? खाल्लं की पार गारद होणार खाणारा. आता मी हे फळ एकट्यानं खाणार आणि तुला चांगली अद्दल घडवणार.'
पहिल्या डोक्यानं दुसर्‍या डोक्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. परोपरीनं त्याला पटवण्याचा प्रयत्न केला की बाबारे, तू हे फळ खाल्लंस तर आपल्या दोघांचेही प्राण निघून जाणार.
पण दुसर्‍या डोक्याला सूड उगवायचा होता. सुडाच्या आगीत तो अगदी आंधळा झाला होता.
त्यानं पहिल्या डोक्याचं म्हणणं अजिबात ऐकलं नाही आणि ते विषारी फळ खाल्लं.
अशा रीतीनं दोन डोक्यांचा तो पक्षी मरण पावला.
सूडाच्या आगीत सर्वस्वाची राखरांगोळी होते.